1
देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून, देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम!
माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वत:ला अत्यंत सुदैवी समजा,
कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो.
आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे.
म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.
पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे.
अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल.
कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.
गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा.
आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारख नाहीसा होतो.
सूर्य त्याच्या प्रखर उष्णतेसह वर येतो आणि झुडपे वाळून जातात. मोहोर गळून पडतो व त्याचा लोभसवाणा पेहराव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात असताना नाहीसा होईल.
धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे.
कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.
तर प्रत्येक जण त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो.
मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.
माझ्या प्रिय बंधूंनो, स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते.
सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा.
कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही.
म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वत:ची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंत:करणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.
देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वत:ची फसवणूक करता.
जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे.
तो मनुष्या स्वत:कडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.
जर एखादा मनुष्य स्वत:ला धार्मिक समजतो आणि तरी स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वत:ला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.
अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वत:ला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो. अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
2
माझ्या बंधूंनो, गौरवी प्रभु येसू ख्रिस्तावरील विश्वासाची व पक्षपातीपणाची सांगड घालू नका.
समजा एक मनुष्य सोन्याची अंगठी व सुंदर कपडे घालून तुमच्या सभेला आला व एक गरीब मनुष्य अव्यवस्थित कपडे घालून आला.
आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.”
तर या बाबतीत तुम्ही दोघांत पक्षपातीपणा दाखविलात की नाही? आणि तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना बाळगणारे न्यायाधीश ठरलात की नाही?
माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवरोज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का?
पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हाला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय?
ख्रिस्ताच्या उत्तम नावाची, जे नाव तुम्हाला देण्यात आले त्याची निंदा हेच श्रीमंत लोक करीत नाहीत का?
जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्ावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता.
पण जर तुम्ही पक्षपात करता, तर तुम्ही पाप करता आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो.
कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो.
कारण “व्यभिचार करू नको” असे जो म्हणाला, “तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करतो तर तुम्ही नियमशास्त्र मोडता.
अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल.
जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!
माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही. शकेल का?
जर एखादा बंधु किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्रसुद्धा मिळत नसेल
आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो?
त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल.
पण एखादा म्हणेल, “तुझ्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे काम आहे.” कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव, आणि माझा विश्वास मी माझ्या कृतीने दाखवीन.
तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.
अरे मूढ माणास, कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे काय?
आपला पूर्वज अब्राहाम याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय?
तू पाहतोस की त्याच्या कृतीमध्ये विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला.
आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की, “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.” आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले.
केवळ विश्वासामुळे नव्हे, तर त्याच्या कृतीमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो, हे तुम्ही पाहता.
त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले नाही काय?
म्हणून, ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे, त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे.
3
माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.
मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे.
आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचे संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेऊ शकतो.
किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते.
त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते. फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते!
होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती तरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिरा या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे.
पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. ती फार चंचल, भयंकर, हिंस्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली असते.
आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो!
एकाच तोंडातून आशीर्वाद निघतात व शापही निघतात. माझ्या बंधूंनो, हे असे असू नये.
एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही.
माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही.
तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे.
पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे.
कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे.
कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात.
पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शातिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते.
जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
4
तुमच्यामध्ये भांडणे व झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय?
तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही.
आणि जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वत:च्या सुखासाठी वापरता.
अप्रामाणिक लोकांनो, तुम्हाला हे माहीत नाही का की, जगाशी मैत्री हे देवाबरोबरचे वैर आहे. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो.
पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो.
पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”
म्हणून स्वत:ला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल.
देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.
दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो.
तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
बंधूंनो, एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि तो नियमशास्त्राचा न्याय करतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही व तुम्ही न्यायाधीश आहात.
नियामशास्त्र देणारा न्यायाधीश फक्त एकच आहे. फक्त देवच तारण करण्यास व नाश करण्यास समर्थ आहे. तू जो तुझ्या शेजाऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वत:ला कोण समजतोस?
ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.”
तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल. अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात.
त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.”
पण तुम्ही तर घमेंड बाळगता आणि बढाई मारता आणि अशी बढाई मारणे वाईट आहे.
म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.
5
श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे!
पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वारच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.
जगात असताना तुम्ही ऐषरामात जगला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात.
जे लोक तुम्हांला काहीही विरोध करीत नाही अशा निरपराध लोकांना तुम्ही दोषी ठरविले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा.
त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.
याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.
तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.
म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची सोडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.
- Holder of rights
- Multilingual Bible Corpus
- Citation Suggestion for this Object
- TextGrid Repository (2025). Marathi Collection. James (Marathi). James (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8E9-4