1

भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.
पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले.
पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.
तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” स्तोत्र.2:7 देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल.” 2 शमुवेल 7:14
आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.” अनुवाद 32:43
देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.” स्तोत्र. 104:4
पण पुत्राविषयी तो असे म्हणतो, “तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.” स्तोत्र. 45:6-7
आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.” स्तोत्र. 102:25-27
तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, “तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोत्र. 110:1
सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?

2

त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.
कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि तिरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत.
पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे: “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावास?
थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” स्तोत्र. 8:4-6 देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही.
परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही.
येशू म्हणतो, “मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” स्तोत्र. 22:22
तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17 आणि तो पुन्हा म्हणतो, “येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18
म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.

3

म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे.
ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता.
ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.
कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे.
देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली.
परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत.
म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
तर आपली अंत:करणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो, ‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’
म्हणून रागाच्या भरात मी शप वाहून म्हणालो, ‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’” स्तोत्र. 95:7-11
सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंत:करणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात.
उलट, ‘आज’ म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंत:करणे कठीण होऊ नयेत.
कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर
पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे: “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत; तशी आपली अंत:करणे कठीण करू नका.” स्तोत्र. 95:7-8
ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते?
आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.

4

ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
कारम आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’” स्तोत्र. 95:11 जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसा बद्दल असे बोलला आहे की: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्राति घेतली.”
आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत”
ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला: “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंत:करणे कठीण करु नका.” स्तोत्र. 95:7-8
कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे.
कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वत:च्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.
आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.
म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्क म धरू या.
कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.
म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.

5

प्रत्येक मुख्या याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो.
प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वत: दुबळा असतो.
आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वत:च्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वत:हून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.” स्तोत्र. 2:7
दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाप्रमाणे तू अनंतकाळासाठी याजक आहेस” स्तोत्र. 110:4
येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.
जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला
व मलकीसदेेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमीक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हांला दूधाची गरज आहे, सकस अन्राची नव्हे!
कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते. कारण अजून तो बाळच असतो.
परंतु याउलट सकस अन्र हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेट ओळखण्यास तयार झालेली असतात.

6

म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ.
पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीची शिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्र्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्र्च्त्ताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये.
आणि जर देवाची इच्छा असेल तर आपण पूर्ण ख्रिस्तीपणापर्यंत जाऊ.
ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे.
तसेच देवाच्या वचनाची गोडी अनुभवली आहे, व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याचा अनुभव आहे आणि
त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळविणे अशक्य आहे, कारण त्याच्या स्वत:च्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.
जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.
पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.
बंधूंजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल.
कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वत:च्याच नावाने शपथ वाहिली.
तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.”
म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते.
आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
आम्हांला ही आशा जणू काय भक्क म, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते,
जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.

7

हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला.
व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राच्या प्रतिमेशी तो हुबेहूब मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला.
आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा.
मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्याला (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्र्ेाष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.
एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देत.
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.
कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते.
कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याचकीय सेवा केलेली नाही.
हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.
आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारख येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने येशूला याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले.
कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस”
जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता.
कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हांला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले.
पण येशू जेव्हा याजक, बनला तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की, “प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मत बदलणार नाही: ‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’” स्तोत्र. 110:4
याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे.
तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे पुढे ते याजकपद चालवू शकले नाही.
त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो.
म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वत:ला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे.
कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन देण्यात आल्यामुळे पुत्र हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.

8

आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की: असा मुख्य याजक आम्हांला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
आणि कोणत्याही मानवनिर्मित मंडपात नव्हे, तर प्रभु परमेश्वारने बनविलेल्या खऱ्याखुऱ्या मंदिराच्या परमपवित्रस्थानात तो मुख्य याजकाची सेवा करतो.
प्रत्येक मुख्य याजक जो नेमलेला असतो, त्याला दाने व अर्पणे सादर करावी लागतात, म्हणून आपल्या ह्या मुख्य याजकालादेखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते.
जर तो पृथ्वीवर असता तर तो मुख्य याजकदेखील झाला नसता. कारण तेथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत.
ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवीला त्या सूचनांबरहुकूम प्रत्येक गोष्ट कर.”
परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.
जर पूर्वीचा करार दोषविरहित असता तर त्याच्या जागी दुसऱ्या कराराची गरज भासली नसती.
परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएल लोकांबरोबर नवा करार करीन व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.
तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन. त्यांची पापे विसरून जाईन.” यिर्मया 31:31-34
या कराराला नवीन करार म्हटले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला. जे जुने ते निकामी ठरते व नाहीसे होऊन जाते.

9

पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते.
कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात.
दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत.
पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकवेदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वत:साठी (स्वत:च्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही.
हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्र व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत.
पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील,
बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वत:चेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वत:च एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात,
तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वत:चे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आप्लाया वचनानुसार अनंतकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावितो, त्यांच्याकरिता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाराचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते.
कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही.
म्हणून रक्त सांडल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता.
कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमीजी लोकार आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.
तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.”
त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेशाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले.
खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही.
म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात.
कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
जे त्याचे स्वत:चे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही.
तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वत:चे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वत:ला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यासानासमोर येणे नेमून ठेवलेले असते,
तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पपारूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.

10

कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही.
जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते.
पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात.
कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही.
म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
होमार्पणांनी व पापार्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
मग मी म्हणालो, ‘हा मी आहे! नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’” स्तोत्र. 40:6-8
पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.)
मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली.
देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो.
प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे.
कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले.
पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
“त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात ठेवीत आणि ते त्यांच्या मनावर लिहीन. यिर्मया 31:33
मग तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” यिर्मया 31:34
जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्याकता भासणार नाही.
म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.
त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्रस्तथानात पाऊल ठेवू शकतो.
आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ.
आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवस जवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.
सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.
जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात.
तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”
जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्टी आहे.
ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली.
काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
म्हणून तुमच्यामध्ये जो टृढ विश्वास होता तो सोडू नका. कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे.
तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळावे.
आता अगदी थोडक्या अवधीनंतर, “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” हबक्कू 2:3-4
पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.

11

आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे.
यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते.
विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो.
विश्वासमुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की, त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.
आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.
जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.
विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते.
ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.
आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली.
आणि जवळजवळ मरावयास टेकलेल्या अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली.
हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत.
जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत.
ते जर आपण सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर त्यांना त्या देशात परत जाण्याची संधी मिळाली असती
परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
जेव्हा देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली, तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण केले. होय, ज्याला अभिवचने दिली होती, तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता.
आणि देवाने त्याला सांगितले होते की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.”
अब्राहामाचा असा विश्वास होता की, देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो आणि अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला.
इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले.
विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
आपल्या आयुष्याच्या शेवटी योसेफ विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि त्याच्या अस्थिसंबंधी काय करायचे याच्या सूचना त्याने दिल्या.
जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विस्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची त्यांना भीति वाटली नाही.
विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले.
पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले.
इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यावान आहे, असे त्याने मानले. कारण तो पुढे मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता.
राजाच्या रागाची भिति व बाळगता, मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
नाश करणाऱ्याने (देवदूताने) इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले.
विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
लोकांनी विश्वासाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.
लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली.
त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली.
स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्ही जिवंत असे मिळाले, इतरांना वेदना सोसाव्या लागल्या कारण त्यांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळावे म्हणून सुटका करून घेण्यास नकार दिला.
काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.
त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या.
त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ते जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
या लोकांना त्यांचा विश्वासाविषयी चांगले बोलण्यात आले पण देवाने त्यांना जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही.
देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.

12

म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू.
जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून पापी लोकांचा मोठ्या प्रमाणातील विरोध सहन कला. त्याचा विचार करा.
पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही.
ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो: “माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको, आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको
कारण ज्याच्यावर प्रभु करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” नीतिसूत्रे 3:11-12
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.
शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धर्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधि मिळते.
म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे अशक्त गुडघे बळकट करा!
तुमच्या पावलांकरीता सरळ रस्ता तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा.
कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला. तरी आपल्या वडिलाचे मन तो बदलू शकला नाही.
ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे. अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.
कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”
खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”
परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात.
आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात.
आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.
जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?
त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”
“पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्र केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.
म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू. 29कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.

13

ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा.
पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
तुम्ही स्वत: त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही देहात असल्याने जे दु:ख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे. “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” अनुवाद 31:6
म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो “देव माझा साहायकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” स्तोत्र. 118:6
ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे.
निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्राच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्राच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
ज्या वेदीवरील अन्र खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही. अशी वेदी आपल्याकडे आहे.
यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.
म्हणून येशूने सुद्धा स्वत:च्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दु:ख सोसले,
म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्याकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या
आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे.
मी तुम्हांला विनति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्धारे उठविले.
त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनति तुम्हांला करतो.
आपला बंधु तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.
देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.

Holder of rights
Multilingual Bible Corpus

Citation Suggestion for this Object
TextGrid Repository (2025). Marathi Collection. Hebrews (Marathi). Hebrews (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8E6-7