1
पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांच्या द्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभु येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेस्सलनीकाच्या मंडळीस, देवाची कृपा व शांति लाभो.
आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो.
आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.
माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे.
कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते.
आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात.
त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात
कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही.
कारण ते स्वत:च आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात.
आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो.
2
बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही.
पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले.
खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही.
उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो
खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे!
किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता.
तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो.
कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वत:चे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता.
बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये.
तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांंबरोबर वागलो.
आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे.
अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो.
आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे.
कारण बंधूनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहूदीयात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात, कारण त्यांनी यहूद्यांच्या हातून जसे दु:ख सोसल, तसेच तुम्ही तुमच्या देशबांधवांकडून दु:ख सोसले.
त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.
यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकगरे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.
बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती.
होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत केले.
शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का?
होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
3
म्हणून, आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने, आम्ही अथेन्स येथेच राहण्याचे ठरविले.
आणि आम्ही तीमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरीता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरीता सहकाही असा आहे, आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे.
यासाठी की, सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये. कारण तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे की, यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे.
खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हांला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की, आपला छळ होणार आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, नेमके तसेच घडले आहे.
म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करुन घेण्याविषयी तीमथ्याला पाठविले. कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीति वाटत होती.
पण तीमथ्य आताच तुमच्याकडून परत आला आहे. आणि त्याने आम्हांला तुमचा विश्वास व प्रिति याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हांला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत, तसे तुम्हीही झाला आहात.
म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारम म्हणजे तुमचा विश्वास.
होय आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे.
तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे?
दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की, आम्हाला तुमची व्यक्तिश: भेट घेणे शक्य व्हावे आणि अजुनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी.
आता देव स्वत: आमचा पिता आहे आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त तो आम्हांला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवो.
प्रभु करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढवो. आणि भरुन टाको. जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरुन वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरुन वाहावे.
यासाठी की, जेव्हा आमचा प्रभु येशू त्याच्या पवित्र जनांसह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंत:करणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.
4
बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा.
कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या.
आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे.
त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे.
आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे.
त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे.
कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते.
म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे.
आणि हे खसे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वत:च्या हातांनी काम करण्याची इच्छा करा.
यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही.
कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही.
कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वत: स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील.
मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू.
म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
5
बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही.
कारण तुम्ही स्वत:चे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल.
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही.
कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही.
म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु.
कारण जे झोपातात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात,
परंतु आपण दिवसाचे असल्याने स्व:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.
तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे.
म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.
परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या.
आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या. एकमेकांबरोबर शांतीने राहा.
बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा.
कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
सर्वदा आनंद करा.
नेहमी प्रार्यना करीत राहा.
प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका.
संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका.
पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा.
दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
देव स्वत: जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्याण म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो.
देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.
बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा.
पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा.
मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे.
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
- Holder of rights
- Multilingual Bible Corpus
- Citation Suggestion for this Object
- TextGrid Repository (2025). Marathi Collection. 1 Thessalonians (Marathi). 1 Thessalonians (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8D3-C