1

ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तीमथ्य यांजकडून, फिलिप्पै येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनिसांना,
देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त याजपासून तुम्हांस कृपा असो.
प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो.
नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो.
कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे.
मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
तुम्हा सर्वाविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता.
देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
आणि माझी हीच प्रार्थना आहे: की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल.
मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवासासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,
आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे.
याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे.
शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.
हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात.
हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्यन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे.
पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल.
पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो. आणि मला आनंद होतच राहील.
कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे.
हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल.
कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे.
पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन.
या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल.
पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे.
आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन.
यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात.
आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्याच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल.
कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे.
माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.

2

जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे,
तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या.
हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वत:पेक्षा चांगले माना.
प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे.
ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.
जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
त्याने स्वत:ला नम्र केले. आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की, “येशू खिस्त हा देव पिता आहे.”
म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा.
कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.
प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की,
तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटिल व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे. आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे.
तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा.
तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो.
त्याच प्रकारे, तुम्हीसुद्धा आनंदी असावे, आणि तुमच्या आनंदात मला सहभागी करावे.
पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे.
तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे.
सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत.
आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे.
त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन.
आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वत:लासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल.
एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे.
मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे.
तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये.
म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन.
म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता.
त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.

3

शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी मी पुन्हा लिहिण्यास मला त्रासदायक वाटत नाहीत, आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे.
“कुत्र्या” विषयी सावध असा! दुष्कर्माविषयी सावध असा! शरीराला इजा करणाऱ्यांपासून सावध असा,
कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही.
जरी मला स्वत:ला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते.
तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे.
माझ्या आस्थेविषयी म्हणाला तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिल ल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो.
शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो.
आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे.
मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे.
या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो.
बंधूंनो, त मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आम्ची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील.
फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.
बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागातात.
नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयीच विचार करतात.
आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत.
त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.

4

म्हणून माझ्या प्रिय आणि भेटीस आतुर झालेल्या बंधूंनो, माझा आनंद आणि मुकुट असलेल्यांनो मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर राहा.
मी युवदीया आणि संतुखेला सुद्धा प्रभूमध्ये बहिणी या नात्याने एकच विचार करण्यासाठी उत्तेजन देत आहे.
माझ्या विश्वासू सहकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की, ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या प्रसारासाठी कष्ट घेतले आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यांना कृपा करुन मदत करा.
प्रभूमध्ये नेहमी आनंद करा.
मी पुन्हा म्हणेन: आनंद करा! तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी. प्रभु जवळ आहे.
कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा.
जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत:करण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका.
मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली. अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली. परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हांला मिळाली नाही.
मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे.
गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहाण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे.
जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्यार द्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
तरीही माझ्या संकटकाळात तुम्ही साहाय्य केलेत हे चांगले केले.
तुम्हा फिलिप्पैकरांना माहीत आहे की, सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदोनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही.
कारण जेव्हा मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा बन्याचदा तुम्ही माझी गरज भागविण्यासाठी मदत पाठविली,
मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, उलट, तुमच्या हिशेबी अधिक फळवृद्धी व्हावी असे पाहतो.
माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणार असा आहे.
आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीला साजेल अशा रीतीने पुरवील.
आपला देव व पिता याला अनंतकाळ गौरव असो. आमेन.
ख्रिस्त येशूमधील प्रत्येक संताला सलाम सांगा. माझ्याबरोबर जे बंधु आहेत ते तुम्हांला सलाम सांगतात.
येथील सर्व संत विशेषेकरुन कैसराच्या घरातील संत तुम्हांला सलाम सांगतात.
प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.

Holder of rights
Multilingual Bible Corpus

Citation Suggestion for this Object
TextGrid Repository (2025). Marathi Collection. Philippians (Marathi). Philippians (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8CD-4