1
प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते. देव जो पिता त्याने व येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले.
हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडूनही आहे. आणि हे गलतीया येथील मंडळ्यांना (विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.
यांची कृपा चांगुलपण व शांति तुम्हाबरोबर असो.
येशूने स्वत:ला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्ही राहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती.
त्याला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
मला आश्चर्य वाटते की ज्या देवाने तुम्हांला ख्रिस्ताद्धारे बोलाविले आहे त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर दुसन्या सुवार्तेकडे वळत आहात.
ती खरी सुवार्ता नाही पण असे काही जण आहेत की ते तुम्हांला गोंधळात टाकीत आहेत व ख्रिस्ताविषयीची सुवार्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो.
आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आता पुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हांस सांगत असेल तर देव त्याला शाप देवो.
आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करीत आहे काय? मी मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो.
बंधूनो, तुम्हांला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तो मानवी संदेश नाही.
कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली.
यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळ केला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला.
माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.
त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला बोलावले.
आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की, विदेशी लोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही.
किंवा जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.
मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो.
परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल.
आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे, ते खोटे नाही.
नंतर मी सूरीया व किलीकिया प्रांतांत गेलो.
परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो.
त्यांनी फक्त ऐकले होते. लोक म्हणतात: “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला, ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचा प्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.”
आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.
2
मग चौदा वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा यरुशलेमास गेलो. मी बर्णबाबरोबर गेलो. तीतालासुद्धा माझ्याबरोबर घेतले.
मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये.
त्याचा परिणाम असा झाला की, तीत, जो माझ्याबरोबर होता, तो ग्रीक असतानाही त्याला सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.
कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणूज ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणणयात आले त्यामुळे हे झाले.
सुवार्तेमधील सत्य तुमच्याजवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभरदेखील त्यांना वश झालो नाही.
जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही.
उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे.
कारण ज्याने पेत्राला यहूदी लोकाकरिता प्रेषित बनविले त्यानेच मला विदेशी लोकांकरिता प्रेषित बनविले.
म्हणून याकोब, पेत्र व योहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा व माझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला व सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा. आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा.
त्यांनी फक्त हेच सांगितले की, त्यांच्या गरिबांना मदत करण्याची आम्ही आठवण ठेवावी, आणि मी ते सर्व करण्यास राजी होतो एवढेच नव्हे तर ते करण्यास अधीर झालो होतो.
पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती.
कारण याकोबाने पाठविलेली काही माणसे येण्यापूर्वी पेत्र विदेशी लोकांबरोबर जेवत असे. पण जेव्हा ते (याकोबाने पाठविलेले यहूदी) आले तेव्हा त्याने अंग काढून घेतले आणि तो विदेशी लोकांपासून वेगळा झाला, कारण या यहूदी लोकांचा विश्वास होता की, विदेशी माणसांची सुंता झालीच पाहिजे, म्हणून त्यांची त्याला भीती वाटत होती.
व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला.
जेव्हा मी पाहिले की, सुवार्तेच्या सत्याच्या सरळ मार्गात ते योग्य प्रकारे वागत नाहीत, तेव्हा मी सर्वासमोर पेत्राला म्हणालो, “जर तू जो यहूदी आहेस व यहूदीतरांप्रमणे वागत आहेस व यहूदी माणसाप्रमाणे वागत नाहीस तर तू विदेशी लोकांना यहूदी लोकांच्या चालीरीतींचे अनुकरण करण्यास त्यांना कसे भाग पाडू शकतोस?”
आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही.
तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.
पण जर, आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्याचे पाहतो, तर आम्ही यहूदीसुद्धा विदेश्यांप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असा आहे की, ख्रिस्पापाचा सेवक आहे काय?
अर्थातच नाही! कारण जर मी या सोडून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरुवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो.
कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो.
यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवाजी स्वत:ला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो.
मी देवाची कृपा नाकारीत नाही. कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला.
3
अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुन सांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे?
मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दाने तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत?
तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात?
तुम्ही व्यर्थच इतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती.
देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.
ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्त्व असे गणण्यात आले.”
मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत.
पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहामासह आशीर्वाद मिळेल.
परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.”
नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की, “विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”
नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.”
ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.”
ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे.
अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुइया संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.
कारण वतन जर नियम शास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे ब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.
तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले.
आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.
नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल.
पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.
हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.
त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते.
पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.
कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात.
कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात.
आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला
4
मी जे म्हणत आहे ते हे की, जोपर्यंत वारसदार हा लहान मूल आहे तोपर्यंत तो गुलामापेक्षा वेगळा नाही. जरी तो सर्वांचा मालक असला तरी,
तो जोपर्यंत त्याच्या पित्याने नेमून दिलेला वेळ आहे तोपर्यंत पालकांच्या आणि विश्वास्तांच्या ताब्यात असतो.
याच प्रकारे जोपर्यंत आम्ही “मुले” होतो तोपर्यंत आम्हीसुद्धा या जगाच्या निरर्थक नियमांचे गुलाम होतो.
परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला, व नियम शास्त्राप्रमाणे वागला.
यासाठी की, त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे.
आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंत:करणात पाठविले आहे. आत्मा “अब्बा” म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो.
म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.
गतकाळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते, त्यांचे तुम्ही गुलाम होता.
परंतु आता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलाम होण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता?
तुम्ही विशेष दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता.
मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.
बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते.
तुम्हांला माहीत आहे की, माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमत: मी तुम्हांला सुवार्ता सांगितली.
आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वत: ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले.
मग जो आनंद तुम्हांला मिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की, जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वत:चे डोळे काढून ते मला दिले असते.
तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?
तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल.
हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे.
माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल.
आता मला तुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेघळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे.
जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हांला मला विचारु द्या की, नियमशास्त्र काय म्हणते, ते तुम्हांला माहीत आहे का?
असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला
देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबी गुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो.
हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचे दर्शक हल्लीच्या यरुशलेमचे बाह्यरुप आहे. कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे.
परंतु स्वर्गीय यरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे.
कारण असे लिहिले आहे. जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा! ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदाने घोष कर, आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत” यशया 54:1
पण पवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही.”
यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
5
आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.
ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही.
सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे,
तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरु पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात.
आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत.
कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांना काही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला?
सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही.
“थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.”
प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.
बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती.
माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वत:ला नामर्द करुन घ्यावे.
परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा).
कारण संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा.”
पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.
पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही.
कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही.
पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा,
मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद,
दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही.
पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास,
सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही.
जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे.
जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.
आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.
6
बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वत:कडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये.
एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
कारण जर कोणी स्वत:ला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वत:जी फसवणूक करुन घेतो.
प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वत:ची इतरांबरोबर तुलना न करता स्वत:विषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल.
कारण प्रत्येकाला त्याची स्वत:ची जबाबदारी असलीच पाहिजे.
ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.
जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषत: ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत.
ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये.
परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जग वधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्त्वाची आहे.
तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दया असो.
आता इथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेल्या आहेत.
बंधूनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
- Holder of rights
- Multilingual Bible Corpus
- Citation Suggestion for this Object
- TextGrid Repository (2025). Marathi Collection. Galatians (Marathi). Galatians (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8C0-1