1

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात.
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे: “ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती: ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी वाटा सरळ करा.”‘ यशया 40:3
मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंत:करणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.
यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.
योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.
योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही.
मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.
येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला.
आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले.
येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते.
यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली.
येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.
येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.
मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते.
त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले.
येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले.
त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”
परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.
आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य कही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात!
मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.
येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले.
शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगिताले.
तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.
संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले.
तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले.
त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.
अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली.
शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.”
मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.
एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वत:ला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ आहे.
येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.”
आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला.
येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला,
“पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वत:ला याजकाला दाखव. व स्वत:च्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सवांर्ना साक्ष पटावी.
परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले.

2

नंतर काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली.
तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेरदेखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता.
काही लोक त्याच्याकडे पक्षाघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.
परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना, मग तो होता तेथील त्याच्यावरचे छपर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता. ती खाट त्यांनी छपरातून खीली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले.
येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला, म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की,
“हा मनुष्य असे का बोलत आहे? हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वत:शी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसाात का कुजबूज करत?
तूझ्या पापांशी क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा ऊठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा, असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे.?”
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला,
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”
मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”
येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक तेथे त्याच्यामागे गेले आणि त्याने त्यांस शिक्षण दिले.
नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यांस जकातनाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठाला आणि येशूच्या मागे गेला.
नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्यच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण तेथे जे त्याच्यामागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते,
काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांस म्हणाले, “येशू हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवत आहे?”
येशूने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांस वैद्याची गरज नाही पण रोग्यांस आहे. मी नीतिमान लोकांस नाही तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे.”
जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपास करीत होते. ते काहीजण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत?”
येशू म्हणाला, “खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांना उपास करणे शक्य नाही.
परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील.
“कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल.
तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घातील नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पशवील फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षारस नव्या पिशवीत घालतो.”
नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लगले.
तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
येशू म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यां लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय?
अब्याथार प्रमुख याजक असताना, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्रप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नथेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?
तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.
म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभु आहे.

3

दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्या होता.
येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”
नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प रहीले.
येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतमुळे तोे फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करू लागले.
येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.
मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोठी होडी आणावयास सांगितली,
त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते.
जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वत:कडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले.
त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे.
व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा.
मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ ‘गर्जनेचे पुत्र’ असा होतो हे नाव दिले.
अंद्रिया, फिलीप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत.
त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे.” आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?
जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.
आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही.
तर मग सैतान स्वत:लाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.
खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.
येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.
नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावायास पाठविले.
लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ.”
जे जे कोणी देवाच्या इच्छेाप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”

4

दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते.
त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,
“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला.
तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.
दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हाती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण
सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले.
काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही
पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”
मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”
जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.
तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे.
यासाठी की, ‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.”‘ यशाया 6:9-10
मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल?
पेरणारा वचन पेरतो.
काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.
काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.
पण त्यांनी त वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात.
परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.
आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”
आणखी तो त्यांस म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवठणीवर ठेवण्यासाठी आणीत नाहीत काय?
प्रत्येक गोष्ट जी झाकलेली आहे ती उघड होईल. आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.
ज्याला कान आहेत ते ऐको!
नंतर तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात जेईल. किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल.
कारण ज्याच्याजवळ आहे त्याला जास्त दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”
आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो.
रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही.
जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्यांनी भरलेले ओंबी, मग कणसात पर्ण वाढलेला दाणा.
पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”
येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी?
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो.
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”
अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला.
बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही, परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले.
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवरापलीकडे जाऊ या.”
मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो नावेत होता तसेच त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसऱ्या नावा होत्या.
जोराच्या वाऱ्याचे वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली.
परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशी घेऊन झोपला होता. त्यांनी त्याला उठविले आणि म्हटले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?”
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही कसा विश्वास नाही?”
परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”

5

मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा
लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला.
हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे. आणि कोणीही त्याला साखळदंडानी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते.
कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते.
तो रात्रंदिवस कबरांतून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वत:स ठेचून घेत असे.
त्याने य़ेशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्यापुढे पडून त्याने त्याला नमन केले.
व तो मोठ्याने ओरडून काय पाहिजे? मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की, मला छळू नकोस.”
(कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून नीघ.ʈ)
मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो मनुष्य येशूला म्हणाला, “माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.”
त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून. तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता.
तेथे डोंगराच्या कडेला डूकारांचा एक मोठा कळप चरत होता.
मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.”
मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.
त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले.
ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भुतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीति वाटली.
काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले.
मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले.
येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंति केली.
पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, “आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभुने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग.”
मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलिस येथील लोकांना सागू लागला, तेव्हा सर्व लोकांना आश्चर्च वाटले.
नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीडके गेल्यावर, मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता.
याईर नावाचा यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला.
आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”
मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती.
बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला.
कारण ती म्हणत होती, ‘जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.”
जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले.
येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
शिष्य येशूला म्हणाले, “लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला?”
परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला.
त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत कोती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले.
येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.
तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हाणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”
येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास धर.”
येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले.
ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांने मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले.
तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.”
ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला.
त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, “तलीथा कूम” म्हणजे (लहान मुली मी तुला सांगतो, ऊठ.”)
ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली (ती बारा वर्षाची होती.) ते फार आश्चर्यचकित झाले.
नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले.

6

येशू तेथून निघाला आणि आपल्या गावी गेला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले.
शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणासाला ही शिकवण कोठून मिळाली? आणि त्याला कोणते ज्ञान देण्यात आले आहे की, यासारखे चमत्कार त्याच्या हातून केले जातात? तो सुतार नाही काय?
तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याच्या स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही पण त्याच्या गावात, शहरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात होत नसतो.’
आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासमुळे त्याला आश्चर्य वाटले.
नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला.
त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका.
त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको.
तो त्यांना म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा.
आणि ज्या ठिकणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत ते गाव तुम्ही सोडून जा. आणि त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ तेथेच झटकून टाका.
मग शिष्य गेले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी उपदेश केला.
त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना जैतुनाचे तेल लावून त्यांना बरे केले.
हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. कही लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.
इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे” तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.
परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”
कारण हेरोदाने स्वत: योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले.
योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.”
याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही.
कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.
मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली.
हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.”
तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.”
ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”
आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणान्या याहानाच् शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”
राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही.
तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले.
ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.
योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले.
नंतर येशू त्यांना म्हाणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले.
परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले.
येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.
या वेळेलर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे.
लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”
परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशी दीनारांच्या भाकरी विकत आणाव्या काय?”
तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
येशूने शिष्यांना सांगतले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.”
तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.
येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले.
मग ते सर्व जेवून तृप्त झाले.
त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या.
आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती.
नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगतिले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले.
त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता.
मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला.
जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.
कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,”
नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.
त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली.
ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले.
लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले.
खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.

7

काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले.
आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले.
(कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.)
बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात.
मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंत:करणे माझ्यापासून दूर आहेत,
ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ यशया 29:13
तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”
आणखी’तो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वत:च्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात.
मोशे म्हणाला, “तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.” जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे.
परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’
तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी कही करू देत नाही.
तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता.
येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले,
तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का?
कारण ते त्याच्या अंत:करणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंत:करणातून वाईट विचार बाहेर पडतात.
जारकर्म, चोरी, खून,
व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,
या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”
येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता.
ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली.
ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
येशू तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.
परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
येशू सोर भोवतलच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलिसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला.
तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली.
येशूने त्याला लोेकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली. नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला.
त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला, “एफ्फात्था” म्हणजे मोकळा हो.
आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले. त्याला बोलता येऊ लागले. त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली.
येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला, (पण लोक त्याविषयी अधिकाअधिक सांगत गेले.)
ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”

8

त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला. त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला,
“मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.
मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यातच शुद्ध हरपून पडतील. त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत.”
त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय?”
येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? शिष्य म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.”
नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या. नंतर त्यानी त्या लोकांना वाढल्या.
त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढावयास दिले.
लोक जेऊन तृप्त झाले. उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या.
तेथे सुमारे चार हजार पुुरुष होते. नंतर त्याने त्यांना घरी पाठवले.
आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.
मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले.
आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांस सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
नंतर त्याने त्यांना सोडले व् तो नावेत जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.
शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते. एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते.
येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय?”
ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय?
तुमचे डोळे आंधळे आहेत काय? तुमचे कान बहिरे आहेत काय? आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हांला आठवत नाही काय?
पाच हजारांसाठी मी पाच भाकरी मोडल्या तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा. शिष्यांनी उत्तर दिले, “बारा टोपल्या.”
चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या? शिष्यांनी उत्तर दिले, “सात टोपल्या.”
मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हांला समजत नाही काय?” येशू बेथसैदा येथील आंधळ्याला बरे करतो
ते बेथसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंति केली.
मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्यान विचारले, “तुला काही दिसते काय?”
त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसतात व सभोवताली झाडे चालत असल्यासारखी दिसतात.”
नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली. त्याला सर्व काही स्पष्ट दिसु लागले
येशूने त्याला, “त्या गावात पाऊलदेखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.
मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पै कैसरीयाच्या आसपासच्या खेड्यात गेले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही जण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.”
मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”
येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
तो त्यांना शिकवू लागला, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला.
परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”
नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
मनुष्याने सर्व जग मिळविले व जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
जिवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?
या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”

9

येशू त्या लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की. ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले.
त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटालाशुभ्र करता येणार नाहीत, अशी होती.
एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणांसाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते.
मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
आणि एकाएकी त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
म्हणून त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मेलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते.
त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”
तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दु:खे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
मी तुम्हांला सांगतो, एलीया आधीच आला आहे आणि जसे त्याच्याविषयी लिहिले आहे तसे, त्यांनी त्यांना पाहिजे तसे त्याचे केले.”
नंतर ते उरलेल्या शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय दिसला आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्यांच्याशी वाद घालीत होते.
सर्व लोक येशूला पाहताच आश्यर्यचकित झाले आणि ते त्याला वंदन करण्यासाठी धावले.
येशूने त्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”
लोकांतील एकाने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणकडे आणले. त्याला अशुद्ध आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.
आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विश्वास ठेवीत नाही. मी तुमचे कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”
नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणाले आणि जेव्हा त्या आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळवटून टाकले, तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला.
नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
पुष्कळदा ठार करण्यासाठी तो त्याला अग्नीत किंवा पाण्यात टाकीत असे. परंतु आपण काही करत असाल तर आम्हांवर दया करा. आणि आम्हांला मदत करा.”
येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तुम्हांला काही तरी करणे शक्य असेल तर, परंतु जो विश्वास ठेवतो त्या मनुष्याला सर्व काही शक्य असते.”
तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास धरतो, माझा अविश्वास घालवण्यास मदत करा.”
येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावात येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
नंतर तो अशुद्ध आत्मा किंचाळला व मुलाला अगदी पिळवटून बाहेर निघाला. मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले, तो मेला.
परंतु येशूने त्याला हातास धरून त्याच्या पायावर उभे केले. आणि मुलगा उभा राहिला.
नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”
येशू त्यांना म्हणाला, “ही असली भुते प्रार्थनेशिवाय व उपासावाचून दुसऱ्या कशाने निघणे शक्य नाही.”
ते तेथून निघाले आणि गालीलातून प्रवास करीत गेले. ते कोठे आहेत हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती.
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही. आणि त्याविषयी त्याला विचारण्यास ते भीत होते.
येशू व त्याचे शिष्य कफर्णाहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण य़ाविषयी चर्चा केली होती.
मग येशू खाली बसला, त्याने बारा जणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने शेवटले झाले पाहिजे आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
येशू एका बालकाला घेऊन त्यांच्यापुढे उभा राहिला, येशूने त्या बालकाच्या हातास धरले व बालकास उचलून घेऊन त्यांना म्हणाला,
“जो कोणी ह्यासारख्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो.
योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भुते काढताना पाहिले आणि आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही.
जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो, रिव्रस्ताचे म्हणून तुम्हांला जो काणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणारा नाही.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे.
आणि जर तुझा पाय तुला पाप करावयास लावतो तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे.
कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
“मीठ चांगले आहे. जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.ʈ

10

नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक पुन्हा गटागटाने त्याच्याकडे आले. आणि जसा त्याचा परिपाठ होता तसे त्याने त्यांना शिकविले.
काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.
येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”
ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.”
येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे.
परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण कोले.
या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील.
आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत.
यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”
नंतर, येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी या गोष्टीविषयी त्याला विचारले,
येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो.
आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”
त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले
येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावाला आणि त्यांना म्हणाला, लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.
मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याच्या स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.”
तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.
येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही.
तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”
तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.ʈ
येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”
हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.
येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”
त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे!
श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”
ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”
पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी
त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”
ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वत:च्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला.
“ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील.
ते त्याची थटृट करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
याकोब व योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले. आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणांजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.”
येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.”
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांस कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?
ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.” मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल,
परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.”
दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले.
येशूने त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले, “तुम्हांस माहीत आहे की, परराष्ट्रीयांची जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात.
परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सवांर्चा सेवक झाले पाहिजे.
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”
मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणून लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”
तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”
मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.”
त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.
येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”
मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

11

जेव्हा ते यरूशलेमजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की,
“तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
मग ते गेले आणि त्यांना रस्त्यावर, दाराजवळ एक शिंगरू बांधलेले दिसले. मग त्यांनी ते सोडले.
तेथे उभे असलेल्या लेकांपैकी काही जण त्यांना म्हणाले, “हे शिंगरू सोडुन तुम्ही काय करीत आहात?”
त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरू नेऊ दिले.
त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. स्रोत. 118:25-26
आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
नंतर येशूने यरूशलेमात प्रवेश केल्यावर तो मंदिरात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो बेथानीस गेला व शिष्यांना आपल्याबरोबर नेले.
दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली.
त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
नंतर तो त्याला म्हणाला, “यापूढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली.
येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही.
मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्टांचे प्रार्थनामंदिर म्हणातील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.”
मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते.
त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
मी तुम्हांस खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता, त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल.
या कारणास्तव मी तुम्हांस सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हांला मिळेल.
जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
ते परत यरूशलेमेस आले. आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
आणि त्याला म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणांस कोणी दिला?”
येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांस सांगेन.
योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हांला सांगत नाही.”

12

येशू त्यांना बोधकथा सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षारसासाठी कुंड खणले, आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.
हंगामच्या योग्य वेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठविले.
परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले.
नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठविले. त्यानी त्याचे डोके फोडले आणि त्याला अपमानकारक रीतीने वागविले.
मग धन्याने आणखी एका नोकराला पाठविले. त्यांनी त्याला जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठविले. शेतकऱ्यांनी काहींना हाणमार केली तर काहींना ठार मारले.
धन्याजवळ पाठविण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले. तो म्हणाला, “खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.” तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठाविले.
परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, “हा तर वारस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन ओपले होईल!”
मग त्यांनी त्याला धरले, जिवे मारले, आणि द्राक्षमऴ्याबाहेर फेकून दिले.
तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल.
तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? ‘जो दगड बांधणारांनी नाकारला तो कोनशिला झाला.
हे प्रभुन केले. आणि ते आमच्यासाठी आश्चर्य कारक आहे.”‘ स्तोत्र. 118:22-23
मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्याला अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, ही बोधकथा त्याने त्यांनाच उद्देशून सांगितली होती. मग ते त्याला सोडून निघून गेले.
नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परुशी व हेरोदी यांना. त्याच्याकडे पाठविले.
ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी आम्हांस माहीत आहे की, आपण प्रामाणिक आहात आणि कुणाची तमा न बाळगता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता. तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.”
मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”
मग येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.
नंतर काही सदूकी त्याच्याकडे आले, (सदूकी पुनरूत्थान नाही असे समजतात) त्यांनी त्याला विचारले,
“गुरुजी. मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली, परंतु मूलबाळ नसले तर वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावाचा वंश वाढवावा.
असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ व होता मेला.
दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोही मूलबाळ न होता मेला.
तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मेली.
सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरूत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”
येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ तुम्हांला माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
कारण जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत. त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील.
परंतू मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशाच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, “मी अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे.
तो मेलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लेकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहा.”
त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घातलाना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वची पाहिली आज्ञा कोणती?”
येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे.
तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अत:करणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’
दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात.”
त्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणार तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
येशू मंदिरात शिकवीत असता, तो म्हणाला, “रिव्रस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणातात ते कसे शक्य आहे?”
दावीद स्वत: पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपयंर्त तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोेत्र. 110:1
दावीद स्वत: रिव्रस्ताला ‘प्रभु’ म्हणतो तर मग रिव्रास्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकासमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते.
आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते.
ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांना फार कडक शिक्षा होईल.”
येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.
नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.
येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे.
मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

13

येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”
येशू त्याला म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.”
येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले,
“या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हांस सांगा. आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या आफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडाणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
एक राष्ट्रदुसऱ्या राष्टावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.
“तुम्ही सावध असा. ते तुम्हांला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हांला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हांला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्टांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे.
ते तुम्हांला अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळची करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचविले जाईल ते बोला, कारण बोलाणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांविरूद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील.
आणि माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.’
“जेव्हा तुम्ही ‘नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, (दानीयेल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगल पदार्थ) जो जिथे नको तेथे पाहाल. “ (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा)” तेव्हा जे येहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे.
जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये.
आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
त्या दिवसांत ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.
हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.
देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
आणि जर कोणी तुम्हांला म्हणेल की पाहा, ख्रिष्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका.
कारण काही लोक आपण रिव्रस्त किंवा संदेष्टे आसल्याचा खोटा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.
“परंतु त्या दिवसांत ही संकट येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’ यशया 13:10; 34:4
आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील.
नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशांतून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.
“अंजिराच्या झाडापासून धडा घ्या. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हांला उन्हाळा जवळ आला हे समजते.
त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. देवादूतालाही नाही व पूत्रासही नाही. फक्त पित्याला माहीत आहे.
सावध असा, जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पाहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो.
म्हणून तुम्ही जागरूक असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हांस ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यारात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हांला माहीत नाही.
जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका.
मी तुम्हांला सांगतो, ते सर्वांना सांगतो, ‘जागृत राहा.”‘

14

वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतींपासून बनविलेल्या शूद्ध, सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले.
तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.
कारण हे सुगंधी तेल तीस दिनारापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.
पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हांला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही.
तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगांधी तेल ओतले आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगतले जाईल.”
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याजकांकडे गेला.
त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा.
आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’
आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपांसाठी तयारी करा.”
शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.
मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”
तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच.
हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुति केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
नंतर येशूूने प्याला घेतला, उपकारस्तुति केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले.
मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
मी तुम्हांला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
नंतर त्यांनी उपकारस्तुतिचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व विशवास गमावून बसाल. कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरे विखुरली जातील.’ जखऱ्या 13:7
परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.
नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दु:ख व वेदनांनी त्याचे मन भरून आले.
तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.”
तो म्हणाला, “अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर. (माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.)”
नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?
जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली.
नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे.
उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक - यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्रचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.”
मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली.
तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुख्य याजाकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लूटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकाडायला बाहेर पडलात काय?”
मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हांबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.”
सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला,
परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले.
थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हाती.
नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की,
“हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’
परंतु तरीही या बाबातीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?”
परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”
येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?
तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?” सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली.
काही जण त्याच्यावर थंुकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.
पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली.
आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”
पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
पेत्र स्वत:ची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”
आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला.

15

पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.
पिलाताने त्याला विचारले, ‘तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’ येशूने उत्तर दिले, ‘तू म्हणतोस तसेच.’
मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.
मग पिलाताने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, ‘तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते किती तरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप ठेवीत आहेत!’
पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे.
बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता.
लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले.
पिलाताने विचारले, ‘तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?’
पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते.
परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथावले.
परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, ‘तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?’
ते पुन्हा मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
पिलाताने पुन्हा विचारले, ‘का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?’ ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
पिलाताला लोकांना खूष करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
शिपायांनी येशूला राज्यपलाच्या राजवाड्यात, ज्याला प्रयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलाविली.
त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला.
ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, ‘यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.’
त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले.
त्यांनी त्याची थटृा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वत:चे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.
वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे ‘कवटीची जागा’ म्हटलेल्या ठिकाणी आणले.
त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही.
त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वजले होते.
आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, ‘यहूद्याचा राजा’ असा लिहिला होता.
त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.
जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वत:चा बचाव कर.’
तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थटृा केली आणि एकमेकाला म्हणाले, ‘त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही!
या मशीहाला, इस्त्राएलाचा राजा रिव्रस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विशवास ठेवू’ आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
मग तीन वाजता रिव्रस्त मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, ‘एलोई, एलोई, लमा सबखथनी,’ म्हणजे, ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?’
जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ‘ऐका, तो एलीयाला बोलवीत आहे.’
एक जण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडूवून भरला. काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, ‘थांबा! एलीया येऊन त्याला खाली उतरवितो की काय हे आपण पाहू.’
मग मोठ्याने आरोळी मारुन येशूने प्राण सोडला.
तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
येशूच्या पुढे उभे अलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, ‘खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.’
तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरुन पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या.
येशू जेव्हा गालीलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेपर्यंत आलेल्या इतर अनेक स्रियाही होत्या.
त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.
योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय?
सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.
मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले. आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली.
येशूला कोठे ठेवले हे मरीया मग्दालिया आणि योसेची आई मरीया हे सर्व बघत होत्या येशूला कुठे ठेवले, हे त्यांनी पाहिले.

16

शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले.
आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या.
त्या एकमेकीस म्हणत होत्या की, ‘कबरेच्या तोंडावरुन आणांसाठी धोंड कोण बाजूला लोटील?’
नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती.
त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
तो त्यांना म्हणाला, ‘भयभीत होऊ नका, तुम्ही नसरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा.
जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’
मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरीया मग्दालियाला, जिच्यातून त्याने सात भुते काढली होती, तिला दर्शन दिले.
ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.
त्यांनी ऐकले की तो जिंवत आहे. व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रगट झाला.
ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही.
नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंत:करणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.’
मग प्रभु येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.

Holder of rights
Multilingual Bible Corpus

Citation Suggestion for this Object
TextGrid Repository (2025). Marathi Collection. Mark (Marathi). Mark (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8A1-4