1
येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.
अब्राहाम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.
यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता. (त्यांची आई तामार होती.) पेरेस हेस्रोनाचा पिता होता. हेस्रोन रामाचा पिता होता.
रामा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन सल्मोनाचा पिता होता.
सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.) बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती) ओबेद इशायचा पिता होता.
इशाय दावीद राजाचा पिता होता. दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)
शलमोन रहबामचा पिता होता. रहबाम अबीयाचा पिता होता. अबीया आसाचा पिता होता.
आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जीयाचा पिता होता.
उज्जीया योथामचा पिता होता. योथाम आहाजचा पिता होता. आहाज हिज्कीयाचा पिता होता.
हिज्कीया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनचा पिता होता. आमोन योशीयाचा पिता होता.
योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. (जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)
त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: यखन्या शल्तीएलचा पिता होता. शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता.
जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता. अबीहूद एल्याकीमचा पिता होता. एल्याकीम अज्जुराचा पिता होता.
अज्जुर सादोकचा पिता होता. सादोक याखीमचा पिता होता. याखीम एलीहूदचा पिता होता.
एलीहूद एलाजारचा पिता होता. एलाजारचा मत्तानचा पिता होता. मत्तान याकोबाचा पिता होता.
याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरीयेचा पती होता. मरीया येशूची आई होती. येशूला ‘ख्रिस्त’ म्हटले आहे.
याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या. (लूका2.1-7)
येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले.
तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला.
पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा, मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे.
त्याचे नाव तू येशू4 ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”
हे सर्व यासाठी घडले की, प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूर्तता व्हावी.
“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”
जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्र केले. 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले.
2
यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले.
आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”
हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले.
मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?”
त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलेहेम गावात. कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की:
“हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा, तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.”‘ मीखा 5:2
मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली.
नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”
ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले, त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला. ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला.
ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला.
ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या.
पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगिले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्व्या मार्गाने आपल्या देशास परतले.
ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा.”
तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला.
आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, ‘मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे’ ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली.
यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते:
रामा येथे आकांत ऐकू आला. दु:खदायक रडण्याचा हा आकांत होता. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.” यिर्मया 31:15
हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला. योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले.
दूत म्हणाला “ऊठ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत.”
मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला.
हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले, तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला.
योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल, असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले.
3
त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला,
“तुमची अंत:करणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे”
यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते: “वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे; ‘प्रभु देवासाठी मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.”‘ यशया 40:3
योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे.
लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यरूशलेम, सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते.
आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत होता.
योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी आणि सदूकी आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले?
म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या.
अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो.
झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल.
तुम्ही तुमची अंत:करणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”
तेव्हा येशू गालीलाहून यार्देन नदीकडे आला। त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता.
पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, “खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे?”
येशूने त्याला उत्तर दिले, “आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे.” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला.
येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला.
त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
4
मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले.
चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली.
तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.”‘ अनुवाद 8:3
मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले.
आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की, ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील.”‘ स्तोत्र 91:11-12
येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.”‘ अनुवाद 6:16
मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले.
सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”‘
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की ‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”‘ अनुवाद 6:13
मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.
नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.
यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” यशया 9:1-2
त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मार्क 1:16-20; लूक 5:1-11)
नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले.
तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले.
तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.
येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली.
येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.
5
येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,
“जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
जे शोक करतात ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल.
जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांचावर दया करण्यत येईल.
जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील.
जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
“जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात.
आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. (मार्क 9:50; लूक 14:34-35)
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.
“तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही.
आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
“तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
“मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे.
मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.
म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल.
कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.
“तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’
पण मी तुम्हांस सागतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
“म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले,
तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तरुंगात टाकील.
मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
“व्यभिचार करू नको’ असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे,
परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.
जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
“‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ असे सांगितल्याचे तुम्ही जाणता.
पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो. शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
“जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.
परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे.
पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे.
आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
“तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’
पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा.
आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या.
जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा.
जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.
“असे सांगिलते होते की, ‘आपल्या शोजाऱ्यावर प्रेम करा अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा, असे तुम्ही ऐकले आहे.
पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.
कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात.
आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात.
म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.
6
“जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
“जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहिरपणे अशी कामे करतात. कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये.
दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
“आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.
त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते.
म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी. ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,
आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’
कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील;
पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.
“जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा.
यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
“येथे पृथ्वीवर स्वत:साठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नतील.
म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल.
पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.
“‘कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
“म्हणुन मी तुम्हाला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे.
आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?
“आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत,
तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्र्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हाता.
तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, आशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय?
चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’
सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे.
तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील.
म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.
7
“तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका.
कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याचा न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.
तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.
अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.
“जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.
“मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल,
कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.
“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल?
किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल?
वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
“यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे. (लूक 13:24)
“अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.
“खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यास ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही.
प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते.
चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.
जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.
म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
जो कोणी मला वरवर ‘प्रभु, प्रभु’ म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल.
त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.
तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
“जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले.
मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.
मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला. 29कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.
8
येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते.
तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहत.”
मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला.
“हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वत:ला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”
येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला
आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”
येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”
तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.
कारण मी स्वत: दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”
येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही.
मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील.
परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.
मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले.
त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले
यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते: “त्याने आमच्या व्याधी स्वत:वर घेतल्या, त्याने आमचे रोग वाहिले.” यशया 53:4
आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली.
मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘गरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”
मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”
पण येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”
मग येशू नावेत गेल्यावर त्याच्यामागून त्याचे शिष्य नावेत गेले.
अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता.
तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, ‘प्रभु, आम्हांला वाचवा, आपण बुडत आहोत.”
येशूने उत्तर दिले, ‘तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता?’ मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला.
तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे? वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात.”
मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे.
ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, ‘देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?’
त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता.
ती भुते त्याला विनंती करून लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे,
तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘जा.’ मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला.
मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले.
तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.
9
येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला.
तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले. “तरुण मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.”
त्यांचे विचार ओळखून येशू म्हणला, “तुमच्या अंत:करणात तुम्ही वाईट विचार का करता?
कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, ‘ऊठ! आपला बिछाना घे आणि घरी जा.’
मग तो उठून आपल्या घरी गेला.
लोकांनी हे पाहिले व ते थक्क झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.
परूशांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो?”
येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजरी आहेत त्यांना आहे.
मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी. ‘मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”
मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परुशी पुष्कळ वेळा उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे वऱ्हाडी दु:खी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील.
कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडापासून निघून जाईल व छिद्र अधिक मोठे होईल.
तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हाणून लोक नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”
येशू या बोधकथा सांगत असता पहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मेली आहे. परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल.”
तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्याबरोबर निघाले.
वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहोंचली व त्याच्या वस्त्राला शिवली.
कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई काळजी करू नकोस! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले.
येशू म्हणाला, “जा, मुलगी मेलेली नाही, ती झोपेत आहे.” तेव्हा लोक येशूला हसले.
मग त्या जमावाला बाहेर पाठविल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.
आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली.
तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.”
आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले.
जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”
परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला.
आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते.
तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.
म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.’
10
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.
बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,
फिलीप्प व बर्थलमय, थोमा आणि जकातदार मत्तय, अल्फीचा मुलगा योकोब व तद्दय,
शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा.
तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.
ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा.
त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा.
जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल.
आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.
मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगारापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
“लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा.
माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील.
माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल.
जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल.
कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
“भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
माझ्यामुळे सर्व तुचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.
एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
“विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही.
विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”
“म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.
दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.
“आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
“जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
“जो माझ्यापेक्षा स्वत:च्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही.
8जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.
जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते.
जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफळ.
मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
11
येशूने त्याच्या बारा शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले.
आणि त्याला विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.
आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
धन्य तो पुरूष जो माझ्यामुळे अडखळत नाही.”
मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही वैरण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात.
तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता.
त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे: ‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’ मलाखी 3:1
मी तुम्हांला खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचा स्वीकार व प्रसार प्रभावीपणे करीत आहेत.
कारण योहानापर्यत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले.
आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
“या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबात्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले तरी तुम्ही नाचला नाहीत आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.’
योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’
इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पीत आला. लोक म्हणतात, पाहा हा किती खातो? किती पितो? जकातदार व पापी लेकांचा मित्र, परन्तु ज्ञानाची योग्याता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”
तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरांतील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
“हे खोराजिना, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.
पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
आणि तु कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यत टिकले असते.
पण मी तुम्हांस सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या
होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.
माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.
माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
12
त्या दिवशी म्हणजे शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”
तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय?
देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्रच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवागी होती.
आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत.
मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.
पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी. याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता.
कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”
येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला.
सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय?
तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”
मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली.
परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले.
आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.
यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीति करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील.
तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील.
सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. यशया 42:1-4
मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.
सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, ‘हा दाविदाचा पुत्र असेल काय?’
परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, ‘भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.’
परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, ‘आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.
आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?
आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वत:चे लोक तुम्हांला चूक ठरवितील.
परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा.
“किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.
एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.
म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.
एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.
“जर तुम्हांला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.
अहो सापाच्या पिल्लांनो. तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंत:करणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील.
कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”
काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही.
कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे.
न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.
“जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही.
तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते.
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”
तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते.
तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”
त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?”
मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हाणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत.
कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
13
त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला.
पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला.
तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला, एक शेतकरी बी पेरायला निघाला.
तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले.
काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती,
म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती.
काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली.
काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले.
ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”
तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही.
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.
म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही.
तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे, ‘तुम्ही लक्ष द्याल, ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
कारण या लोकांचे अंत:करण कठीण झाले आहे त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांनी आपले डोळे मिटले आहेत. यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये आपल्या अंत:करणाने समजू नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. यशया 6:9-10
पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकातात.
मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदेष्टे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.
पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंत:करणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.
खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो.
तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.
गल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”
नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगुतली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हा एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे.
पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला.
पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले.
मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना?मग त्यात निदण कोठून आले?
तो त्यांना म्हणाला, कोणीतरी शत्रूने हे केले आहे. त्याच्या नोकरांनी विचारले, आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?
पण तो मनुष्य म्हणाला, नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.”‘
मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला.
मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”
लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला.
ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, “गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन, जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” स्रोत्र 78:2
मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.
आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत.
हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
“म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल.
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील.
आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.
तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.
“स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
“आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे,
एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि ते मोती विकत घेतो.
“तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात.
ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले.
या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील.
वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.
येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?” तेव्हा ते म्हणाले, “होय.”
तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”
येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला.
त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली?
हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना?
याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.”
त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले. पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेष्ट्याचा सन्मान करतात. पण त्याच्या स्वत:च्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान होत नाही.”
तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.
14
त्या वेळी हेरोदाने येशूविषयी बातमी ऐकली.
तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले. “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”
हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते.
कारण योहान त्याला सांगत होता, “तू होरोदियाला ठेवणे योग्य नाही.”
हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारीत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले.
त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.
तिच्या आईच्या सांगण्यावरन ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”
हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली.
आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले.
मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.
मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले, आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले.
मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वत:करिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”
तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”
तो म्हणाला, “त्या इकडे आणा.”
मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या.
ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या.
स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.
स्वत: लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले.
लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.
मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला.
शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.
पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.
पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.
येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला.
पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, प्रभु, मला वाचवा.”
आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?
मग ते नावेत बसल्यावर वारा थाबला.
तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.
नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले.
तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले.
आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
15
तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
“तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.
येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.
पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे
ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”‘ यशया 29:13
तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या.
जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?
पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”
“तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले.
“जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय?
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंत:करणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात.
कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.
माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”
नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन चा भागात गेला.
तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”
पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”
मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.
परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”
ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.
तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.
नंतर येशू तेथून निघुन गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला.
मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.
मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. कारण ते वाटेत कदाचित मूर्च्छित होतील.”
शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
तेव्हा येशू म्हाणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”
मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या.
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या.
आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.
16
परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आभाळ तांबूस आहे,
आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत?
दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्यशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
पण येशून हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता?
तुम्हांला अजून आठवत नाही काय? पाच भाकरींनी पाच हजार लोकांना जेवू घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हांला आठवत नाही काय?
तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी, आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हांला आठवत नाही काय?
मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हांला कसे समजत नाही?”
तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, पर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
मग येशू त्यांना म्हणाला, ‘पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
येशू म्हणाला, “शिमोन, योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले.
आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि मृत्युलोकाचा यावर अधिकार चालणार नाही.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
तेव्हा त्यानी शिष्यांस निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका.”
तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत.!
परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वत:ला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील.
जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल?
कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे राहाणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
17
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले.
त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रुप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.
तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.
पेत्र येशूला म्हणाला, ʇप्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
पेत्र बोलत आहे, इतक्यात, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
येशुबरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते.
तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, ʇउठा! घाबरू नका.”
मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.
येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पाहा.
मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणातात की, एलिया अगोदर आला पाहिजे?”
तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलिया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे,
पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.”
तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे.
नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,
“प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.
मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”
येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासूव विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.”
येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भुताला कडक रीतीने धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?”
तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे.
ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”
त्याने म्हटले, होय देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकाडून की परक्याकडून?”
जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून” तेव्हा येशूने त्याला म्हटले, तर मग मुले मोकळी आहेत.
तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”
18
त्या वेळस शिष्य आले आणि त्यांनी विचारले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले,
आणि म्हटले, ‘मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.
म्हणून जो कोणी आपणांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे.
आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे.
जगाचा धिक्कार असो कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते लोकांना पापात पाडते. तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या गोष्टींना कारणीभूत होतात. त्यांना फार अहिताचे ठरेल.
जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. तुम्ही एखादा अवयव गमावला, परंतु अनंतकाळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे. दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल.
“जर तुमचा डोळा तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या. कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला अनंतकालचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.
“सावध असा. ही लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो की, या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेमही असतात.
“जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो 99 मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरु शोधायला जाईल की नाही?
आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या 99 मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. मी तुम्हांला खरे सांगतो,
तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
“जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस.
पण जर तो किंवा ती तुझे एकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील,
जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकाणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
ʇमी तुम्हांला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल.
“तसेच मी तुम्हाला सांगतो की, जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही जी गोष्टा मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्तता करील.
हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”
नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, ‘जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”
येशूने उत्तर दिले, ‘मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”
म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले.
जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले.
त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.
‘परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.
त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.
नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसन्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हाणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.’
परंतु दुसरा नोकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हांला देणे लागतो ते परत करीन.
पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते.
घडलेले हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दु:खी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.
तेव्हा पहिल्या नोकारच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले.
म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया. दाखवायची होतीस.
मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकाराला तुरूंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरूंगातून सोडले नाही.
जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”
19
येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालीलातून निघून गेला. आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदा प्रांतात गेला.
तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजरी लोकांना येशूने बरे केले.
काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी काय?
येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले,
आणि देव म्हाणाला, म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.
म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”
परुश्यांनी विचारले, असे जर आहे, तर मग पुरूषाने सोडचिठ्टी लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
येशूने उत्तर दिले, तुम्ही दावाची शिकवण मानण्यास नकार दिल्याने तुमच्या पत्नींना सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सोडाचिठ्ठी देण्याची मोकळीक नव्हती.
मी तुम्हांसा सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”
मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले, जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”
येशूने उत्तर दिले, लग्नाविषयीची अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येक मनुष्याला शक्य होणार नाही. परंतू काही जणांना देवाने ही शिकवण ग्रहण करण्यास संमति दिली आहे.
काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील. जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की, ती मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करने सोडून दिले आहे, परंतू ज्याला लग्न करणे शक्य होईल, त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी.”
नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले.
परंतु येशू म्हणाला, लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे.”
मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.
एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”
त्याने विचारले, कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको.
आपल्या आईवडिलांना मान दे आणि जशी स्वत:वर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’
तो तरुण म्हणाला, या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”
येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”
पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्याला फार दु:ख झाले. कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.
तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणासाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल.
मी तुम्हांला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे जास्त सोपे आहे.”
जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”
येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हाणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
पेत्र येशूला म्हणाला, पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हांला काय मिळेल.?”
येशू म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा आसनांवर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.
पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
20
स्वर्गाचे राज्य हे कोण्या शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
त्या मनुष्याने एक दिवासाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला चांदीचे एक नाणे देण्याचे कबूल केले. आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठविले.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते.
मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हांला देईन.
मग ते काम करण्यास मळ्यात गेले. तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी काही लोकांना दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले.
पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्याला आढळले. त्याने त्यांना विचारले, तुम्ही काही काम ना करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
त्या लोकांनी उत्तर दिले, आम्हांला कोणी काम दिले नाही, तो मनुष्य त्यांना म्हणाला, तर मग तुम्ही जाऊन माझ्या मळ्यात काम करा.
संध्याकाळी मळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलाविलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’
जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक चांदीचे नाणे मजुरी मिळाली.
मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्यां सर्वांना एकच चांदीचे नाणे मजुरी मिळाली.
त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले.
ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात राबलो.
परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हाणाला, मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन?
जे तुझे आहे ते घे आणि घरी जा. तुम्हांला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या माणसाला द्यायची आहे.
मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणी पहिले ते शेवटचे होतील.”
येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला,
ऐका, आपण यरुशलेमकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणातील.
ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्यची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”
त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली.
त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
येशू तिला म्हणाला, तू काय मागत आहेस ते तुला माहीत नाही! जे दु:ख मला सोसावे लागणार आहे ते तुमच्याने सोसवेल काय?ʈ ते म्हणाले, होय, आम्ही ते सोसू शकू!”
येशू त्याना म्हणाला, तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान, देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरविले आहे.”
जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले.
मग येशूने बोलावून त्यांना म्हटले, ‘यहूदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखविणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.
पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दासच झाले पाहिजे.
आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने कनिष्ट झाले पाहिजे.
म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे जो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, प्रभु, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”
मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
येशूला त्यांच्याबद्दल कळवळा आला, आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले. आणि ते त्याच्या मागे गेले.
21
येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवळ बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना
असे सांगून पाठविले की, तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या.
जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”
हे यासाठी घडले की संदष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.”‘ जखऱ्या 9:9
त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले.
शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.
काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले, “होसान्ना, दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय देवाला होसान्ना!” स्रोत 118:26
जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते. हा कोण आहे?”
जमाव उत्तर देत होता, हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”
मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबूतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली.
येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.”‘
काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले.
जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्र्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला.
त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.
दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली.
रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.
शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”
येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”
येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”
येशू म्हणाला, मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन.
तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, ‘योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.”
याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो. पण ते गेला नाही.
त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
ही बोधकथा ऐका : मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला.
जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.
परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
नंतर, त्याने त्याच्या स्वत:च्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले. हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.
त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.
मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की. ‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23
म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल.
जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”
येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.
त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
22
येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकादा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,
स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’
नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगतले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.
काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले.
राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
“मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते,
म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.
मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
“मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला.
राजा त्याला म्हणला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला.
तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’
“कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”
मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता.
म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत?
कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले.
तेव्हा येशूने विचारले, या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”
त्या लोकांनी उत्तर दिले, त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.” यावर येशू त्यांना म्हणाला, जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
येशू जे म्हाणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजातात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला,
ते म्हणाले, गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील.
आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.
असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले.
शेवटी ती स्त्री मेली.
आता प्रश्न असा आहे की, पुनरूत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्यांशी लग्न केले होते.”
उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही.
तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय?
तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.
येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घलता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.
एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.
त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’
ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.
हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.
सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.
येशू म्हणाला, ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,
प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.’ स्तोत्र. 110:1
आता, मग जर दाविद त्याला प्रभु म्हणातो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”
पण परूश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
23
मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला,
“नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत.
म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.
वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वत: ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात.
मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.
“परंतु तुम्ही स्वत:ला गुरूजी म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे.
आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
तुम्ही स्वत:ला ‘मालाक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.
तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय.
जो स्वत:ला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वत:ला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.
अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वत: तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
“परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.
“तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.
तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते.
आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पहिजे.
तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी.
म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.
तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो.
जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.
तुम्ही आंधळे वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही चष्टी तुमह् तु्ापण
निमअहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत.
अहो परुश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
अहो परुश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत.
तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात.
अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता.
आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती.
पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले. त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता.
पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल.
मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल.
म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल.
मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.
अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस.
आता तुझे घर उजाड होईल मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
असे म्हणेपर्यत तू मला पाहणार नाहीस.”
24
येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या.
प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”
येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”
येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नये
मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील.
तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील.
पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरूवात अशा आहेत.
लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील.
अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
अनेक खोटे संदेष्टे येतील, ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील.
सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्र्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल.
सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.
दानीएल संदेष्ट्यांने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”
तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये.
जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.
त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल.
जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.
आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.
त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, पहा! ख्रिस्त येथे आहे, किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.
“एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, पाहा, मशीहा ओसाड रानात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल.
जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.
“छळानंतर लगेच, असे घडेल: ‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. यशया 13:10; 34:4
“त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल.
मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्तीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
“अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला. हे तुम्हांला कळते.
मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल.
मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही.
सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
“पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.
नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते.
त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले. मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल.
दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.
दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
“म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे,
हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.
या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
“शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल?
मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य!
मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.
पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल.
मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
25
“त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.
त्या दहा मुलींपैकी पाच मुर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख मुलींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.
शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर तेलही घेतले.
वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
“मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’
“सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले.
पण मूर्ख मुली, हुशार मुलींना म्हणाल्या, ‘तुमच्यातील काही तेल अम्हांला द्या. आमचे दिवे विझत आहेत.’
“पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, ‘नाही, आम्ही तुम्हांला काहीच देऊ शकत नाही, नाही तर तुम्हांला व आम्हांलाही पुरणार नाही. त्याऐवजी ते विकणाऱ्याकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आणा.’
“पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले.
“शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघडा!
“पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो: मा तुम्हांला ओळखत नाही!”
“म्हणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हांला माहीत नाही.
स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
त्याच्यांतील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला.
ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे.
त्याचप्रमाणे, ज्याला दोन थैल्या रूपये मिळले होते त्याने आणखी दोन थैल्या रुपये कमविले.
पण ज्याला एक थैली मिळाली होती, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले.
“बराच काळ लोटल्यांनंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली.
ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले.’
त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
“नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमाविल्या.
“मालक म्हणाला, चांगल्या आणि इमानी दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
“नंतर ज्याला रुपयाची एक थैली मिळाली होती तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता.
मला आपली भीति होती. म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या! हे तुमचेच आहेत!
“मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.
तर तू माझे पैसे पेढीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.
“म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, याच्याजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या.
कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.
नंतर मालक म्हणाला, त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या. तेथे रडणे व दात खाणे चालेल.
“मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल.
मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.
तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
“मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे.
हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात
मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात.
‘मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले?
आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?
आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?
“मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.
ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.
मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.
“मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?
“मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.
मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”
26
येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,
“परवा वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल.”
मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.
सभेत त्यांनी धूर्तपणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याच्या कट केला.
तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”
येशू बेथानीमध्ये होता, तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता.
येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्तराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली.
त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अत्तराचा असा नाश का व्हावा?
ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.
येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे.
गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.
या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याचा वेळेची तयारी तिने केली.
मी तुम्हांला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल आणि जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल.”
बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला.
यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.
तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतात: माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.”‘
येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.
जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”
ते खूप दु:खी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारु लागला, “तो मी नाही ना प्रभु?”
मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील.
जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दु:ख वाटते! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”
मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)
ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणी खा. हे माझे शरीर आहे.”
नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील प्यावे. कारण हे माझे रक्त आहे,
हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी.
मी तुम्हांला सांगतो: माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”
मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे: ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ ज्खऱ्याा 13:7
पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन,
उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील.”
पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले.
नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.”
येशूने पेत्र आणि दोन जब्दीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दु:खी व व्याकूळ होऊ लागला.
येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दु:ख मला इतके झाले आहे की, ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?
आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करी इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”
नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते.
नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.
यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे.
उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे.”
येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाढविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.
येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहूदा म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा,”
मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले.
हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.
येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.
मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय?
परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”
यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही.
परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यानी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते.
पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.
येशूला मरणदंड द्यावा म्हणून मूख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
पुष्कळ लोक पुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली,
“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”
तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”
पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले!
तुम्हांला काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.
ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?ʈ
यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैंकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालीलच्या येशूबरोबर होतास.”
पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”
मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “नासरे थकर येशूबरोबर हा होता.”
पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”
मग तो स्वत:ला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला.
नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दु:खतिशयाने रडला.
27
जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला.
त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले कि, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली.
तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वत:ला गळफास लावून घेतला.
मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल.
त्यामुळे आजही त्या जागेला ‘रक्ताचे शेत’ असे म्हणतात.
अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.
मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभारचे शेत विकत घेतले.”40
राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा होते.
म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”
पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडील जनांनी लो कसमुदायाचे मन वळविले.
पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले. ‘बरब्बा.’
पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”
मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले.
त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला.
काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!”
नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले.
येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते.
जेव्हा ते ‘गुलगुथा’ (म्हणजे कवटीची जागा) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले.
तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”
येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते.
जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.
आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वत:चा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभारून खाली ये.”
तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.
ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वत:चा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!
याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वत: असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.”‘
तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला.
सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला.
परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”
पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले.
कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले.
ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”
तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंपासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्यामागून आल्या होत्या.
मरीया मग्दालिया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.
संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता.
योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला.
नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.
मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला.
मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.
त्या दिवसाला तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलातकडे गेले.
ते म्हणाले, ʇमहाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’
म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.ʈ
पिलात म्हणाला, ʇतुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.ʈ
म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
28
शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.
त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या घोंडेवर बसला.
चमकणाऱ्या विजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडे बफर्ासरखे शुभ्र होते.
कबरेवर पहारा करणारे शिपाई, देवदूत पाहून खूप घाबरले, ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसासारखे झाले.
देवदूत म्हणाला, ʇभिऊ नका, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही पाहत आहात.
पण तो तेथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा.
आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा : येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.ʈ नंतर देवदूत म्हणाला, ʇमी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.ʈ
म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरेजवळून निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या.
अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, ʇशांती असो.ʈ त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली.
मग येशू त्यांना म्हणाला, ʇमला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तेथेच त्यांची माझी भेट होईल.ʈ
स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक बेत रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
ते म्हणाले, ʇलोकांना असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याला पटवून देऊ आणि तुम्हांला काही होऊ देणार नाही.ʈ
मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.
अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले.
त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला. त्यांनी त्याची उपासना केली. पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही.
तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ʇस्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.ʈ
- License
-
CC-0
Link to license
- Citation Suggestion for this Edition
- TextGrid Repository (2025). Matthew the Evangelist. Matthew (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A89B-C