1

फारपूर्वी शास्त्यांच्या अमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. तेव्हा अलीमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहूदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला.
त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिल्योन अशी होती. हे लोक बेथलेहेम यहूदातील एफ्राथा कुळातील होते. मवाबात येऊन ते राहू लागले.
पुढे अलीमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली.
नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली. एकाच्या बायकोचे होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ. जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले.
आणि महलोन व खिल्योन दोघेही मरण पावले.नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्यावाचून एकटीच राहिली.
यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झल्या.
तव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.
तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले,” तुम्ही आपल्या माहेरी परत जा. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत. तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो.
परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघीना रडू कोसळले.
“आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.
पण नामी त्यांना म्हणाली,” नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते.
तेव्ही तुम्ही परत गेलेले बरे. पुन्हा लग्न करायचेही माझे वय राहिले नाही आणि अजून माझे लग्न झाले तेरी त्याचा तुम्हाला काय उपयोग? मला अगदी या घटकेला दिवस राहून दोन मुले झाली तरी काय फायदा?
ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे.परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे,
पुन्हा एकदा त्यांना रडू फुटले, मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला. पण रूथ मात्र तिला बिलगली.
नामी तिला म्हणाली,” तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत,आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस,.
पण रूथ हटून बसली आणि म्हणाली,”तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला माहेरी जायला लावू नका.मी तुमच्याबरोबर येईन. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव.
तुम्ही जिथे मराल, तिथेच मी ही मरेन. जिथे तुम्हाला तिथेच मला पुरावे. हा शब्द मी पाळला नाही तर परमेश्वराने मला खूशाल शिक्षा करावी. आता आपली ताटातूट फक्त मरणानेच.”
रूथचा आपल्या बरोबरच यायचा निधोर आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला.
त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेमपर्यंत आल्या. त्यांना पाहून लोकांना एकदम भरून आले. “ही नामी की काय” असे ते म्हणू लागले.
पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे.
“येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”
अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरूवातीला नामी आणि तिची मवाबातील सून रूथ या दोघी मवाबातून बेथलेहेम यहूदा येथे परतल्या.

2

बेथलेहेममध्ये बवाज नावाचा एक श्रीमंत गूहस्थ राहात असे. तो अलीमलेखच्या कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगच होता.
एकदा रूथ नामीला म्हणाली,”मी आज शेतावर जाऊ का? कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन”
नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली. रूथ शेतावर गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीमलेखाचा नातेवाईक बवाज याच्याच मालकीचे होते.
थोडया वेळाने बवाज बेथलेहेमहून शेतावर आला. परमेश्वर तुमच्याबरोबर असो असे म्हणून त्याने आपल्या मजुरांचा समाचार घेतला. मजुरांनीही परमेश्वर तुमचे भले करो असे म्हणून त्याचे उलट अभिष्टचिंतन केले.
मजुरांवर देखरेख करणाऱ्या मुकादमाजवळ मग बवाजने ही मुलगी कोण म्हणून चौकशी केली.
मुकादम म्हणाला, “नामीबरोबर मवाबातून आलेली तरूणस्त्री ती हीच.
“ती आज सकाळी इथे आली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागून धान्य वेचायची परवानगी तिने मागितली. सकाळपासून ती येथे आहे.तिचे घर त्या तिकडे आहे.”
हे ऐकून बवाज तिला म्हणाला, “मुली, माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर. दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही. इथल्या कामावरच्या बायकांना धरून.
त्यांच्या मागोमाग जा. तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे. तहान लागेल तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पी.”
रूथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले अणि ती म्हणाली, “माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे, मी खरे तर परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केलीत.”
बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे. आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस. आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे, या देशात आलीस.
तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल. इस्राएलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपादृष्टी ठेवील. त्याच्या आश्रयाला तू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील.”
रूथ म्हणाली, “माझ्यावर तुमची मोठीच कूपा आहे. मी निव्वळ एक दासी, तुमच्या नोकराएवढीही माझी लायकी नाही. असे असूनही गोड बोलून तुम्ही माझ्या मनावर फुंकर घातली आहे.”
जेवायची वेळ झाली तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “चल, थोडी भाकर आमच्या बरोबर खाऊन घे. या रसात बुडवून खा.” तेव्हा रूथ सर्व मजुरांबरोबर बसली. बवाजने तिला हुरडाही दिला. तिने पोटभर खाल्ले. अगदी ताटात उरेपर्यंत खाल्ले.
मग ती उठली आणि राहिलेले धान्य गोळा करू लागली. बवाज आपल्या मजुरांना म्हणाला, “कापलेल्या पेंढ्या मधूनही रूथला धान्य गोळा करू द्या आडकाठी करू नका.
तसेच मुद्दाम तिच्यासाठी दाणे भरलेली कणसेही टाकत जा. तिला हवे तेवढे घेऊ द्या,पुरे म्हणू नका.”
रूथ संध्याकाळपर्यंत शेतात होती. गोळा केलेल्या धान्याची तिने झोडणी केली. भुश्श्यातून दाणे बाहेर काढले. अर्धा बुशेले सातू निघाले.
घरी आणून तिने ते सासूला दाखवले. उरलेले दुपारचे जेवणही तिला दिले.
सासूने तिला विचारले, “कुठून एवढे धान्य गोळा केलेस? काम कोठे केलेस? तुझी दखल घेणाऱ्याचे भले होवो.” मग रूथने तिला सर्व हकीकत सांगितली. बवाज नावाच्या माणसाकडे आपण काम केल्याचे तिने सांगितले. नामी सुनेला म्हणाली,”परमेश्वर त्याचे भले करो. मेलेल्यांना आणि हयात असलेल्यांना दया दाखवायचे त्याने चालू ठेवलेले
बवाज आपल्या नातेवाईकांपैकी असून आपला त्राता असल्याचे तिने रूथला सांगितले.
तेव्हा रूथ म्हणाली,”त्याने मला पून्हा यायला सांगितले आहे. कापणी होईपर्यंत मजुरांबरोबर राहून धान्य गोळा कर असे तो म्हणाला आहे.”
नामी आपल्या सुनेला म्हणाली, “त्याच्याच कडल्या बायकांबरोबर तू शेतात गेलीस तर बरे. इतर कुठे गेलीस तर पुरूषांचा तुला उपद्रव होईल.”
अशा प्रकारे रूथ बवाजकडे तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली. सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले. पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली. अशा तऱ्हेने ती आपल्या सासूबरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली.

3

काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे.
बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खव्व्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल.
त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको.
जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”
तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.
ती खव्व्याकडे गेली. सासूने सांगितले होते त्याप्रमाणे वागली.
जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांधरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.
मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला.
ती कोण, हे त्याने विचारले. ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा तुम्हीच माझे त्राते आहात.”
तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस.
तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे.
शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे.
आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला वचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”
त्याप्रमाणे रूथ सकाळपर्यंत बवाजच्या पायाजवळ पडून राहिली. फटफटायच्या आधीच अजून अंधार असतानाच लोक एकमेकांना ओळखायला लागण्यापूर्वाच ती उठली. बवाज तिला म्हणाला, “कालची रात्र तू इथे होतीस हे कोणाला कळू द्यायचे नाही.”
पुढे तो म्हणाला, “तू पांघरलेला रूमाल काढ आणि समोर पसर.” तिने तो पसरल्यावर त्याने एक बुशेल माप सातू त्यात टाकले. तिच्या सासूसाठी ती भेट होती. नीट गाठोडे बांधून त्याने ते तिच्या हवाली केले.मग तो शहरात निघून गेला.
रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले. रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले.
ती म्हणाली,”त्याने तुमच्यासाठी भेट म्हणून हे सातू दिले आहे. रिकाम्या हाताने तुमच्याकडे यायचे नाही असे त्याने मला बजावले.”
नामी म्हणाली, “मुली, पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळेपर्यंत धीर धर. अंगावर घेतलेले काम पार पडेपर्यत तो स्वस्थ बसणार नाही. दिवस मावळायच्या आतच काय ते आपल्याला कळेल.”

4

बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.
बवाजने मग काही साक्षीदांरानाही गोळा केले. गावातील दहा ज्येष्ठ मंडळींना बोलावले. त्यानाही बसवून घेतले.
मग बवाज त्या नातेवाईकाला म्हणाला, “हे पाहा,नामी मवाबच्या डोंगराळ प्रदेशातून आली आहे. अलीमलेखच्या मालकीची जमीन तिने विकायला काढली आहे.
हे पंच आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या साक्षीने तुला हे मी सांगायचे ठरवले आहे. ही जमीन तुला परत विकत घ्यायची असल्यास तू घेऊ शकतोस. पण नसेल तर तसे मला सांग ही जमीन परत विकत घेण्याचा तुझ्यानंतर माझाच हक्क आहे. तेव्हा तू ती विकत घेणार नसलास तर मी घेईन.”
पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”
यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वत:च्या जमिनीला मुकेन. तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.”
(पूर्वी इसाएलमध्ये गहांण टाकलेल्या जमिनीची ती सोडवून घेण्याचे व्यवहार करताना खरेदीचा पुरावा म्हणून तो माणूस पायातला जोडा काढून दूसऱ्याला देत असे.)
त्यानसार तो नातलग म्हणाला, “जमीन तूच विकत घे” आणि आपला जोडा काढून त्याने बवाजला दिला.
रूथलाही बायको म्हणून मी विकत घेतो. म्हणजे या मृत व्यक्तींची मिळकत त्यांच्याच घराण्यात राहिल. त्यांचे नाव त्यांच्या कुळातून, वतनातून पुसले जाणार नाही. तुम्ही या सगव्व्याला साक्षी आहात.”
अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले, परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो
तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झालेतशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.
त्यानंतर बवाजने रूथशी लग्न केले. तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला.
गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. दिला तो इस्राएलमध्ये कीर्तिवंत होईल.
तुमचे तो पुनरूज्जीवन करेल वृध्दापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे. सात मुलांपेक्षाही तिची थोरवी आधिक आहे.
नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले.
शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले. बायका म्हणाल्या, “नामीलाच हा मुलगा झाला आहे.” मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद इशायचा पिता झाला. इशाय राजा दावीदचा पिता झाला.
पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे: हस्तोनचा पिता पेरेस.
हेस्तोन रामचा पिता. राम अम्मीनादाबचा पिता
अम्मीनादाब नहशोनचा पिता नहशोन सल्मोनचा पिता.
सल्मोन बवाजचा पिता बवाज ओबेदचा पिता
ओबेद इशायचा पिता इशाय दावीदचा पिता.

License
CC-0
Link to license

Citation Suggestion for this Edition
TextGrid Repository (2025). Christos Christodoulopoulos. Ruth (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7E8-6