1
परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.
“जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.
त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.
“त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे.
नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी;
त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
“कोणाला कळपामधून शेरडू वा मेंढरु होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोष नसलेला नर अर्पावा.
त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी.
त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.
“जेव्हा कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने होले किंवा पारव्याची पिले आणावी.
याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
2
जेव्हा एखाद्याला परमेश्वरदेवासाठी अन्नार्पण करावयाची इच्छा असेल, तेव्हा त्याने मैदा आणावा; त्याने त्यात तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
मग त्याने ते अर्पण अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे; त्यातून मूठभर मैदा, तेल व सगळा धूप घेऊन स्मरणासाठीचे अर्पण म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. त्याच्या गंधाने परमेश्वराला आनंद होतो.
“अन्नार्पणातून जे काही डरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण अति पवित्र आहे.
“जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या मैद्याचे बेखमीर भाकरीचे वा वरुन तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर मैद्याचे असावे.
त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय.
कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम मैद्याचे असावे.
“अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावे; ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
मग याजकाने अन्नार्पणातून स्मारकाचा भाग घेऊन वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे; त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो.
अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले हे अर्पण अतिपवित्र आहे.
“खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वराला अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक अर्पण म्हणून वेदीवर अर्पू नये.
तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
“परमेश्वराकरिता तुला धान्यार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर माजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे धान्यार्पण होय.
त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे धान्यार्पण होय.
चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम करावा; हे परमेशवरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
3
“कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी यांचा करावा.
त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
शांत्यार्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यांस लागून असलेली सर्व चरबी अर्पण करावी.
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व अर्पावे।
ह्या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो.
“परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणसाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
जर त्याला कोकरु अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणावे.
त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोंवती शिंपडावे.
अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आंतड्यावरील भोवतालची चरबी.
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे.
मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले अर्पण आहे, परंतु हे लोकांसाठी अन्नसुद्धा होईल.
“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर आणावा.
त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोंवती शिंपडावे.
त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आंतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी.
दोन्ही गुरदे, त्यांवरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे.
मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा ह्या सुवासिक शांत्यार्पणाने परमेश्वराला आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.”
4
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने मना केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
मग अभिषेक झालेल्या याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
त्याने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
मग त्याने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे;
आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आंतड्यावरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
शांत्यर्पणात जसे हे भाग अर्पण करतात तसेच ते अर्पण करुन याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
गोऱ्ह्याचे कातडे, आंतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
असा सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
“इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.
मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर एकाने त्याचा वध करावा.
नंतर अभिषेक झालेल्या याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
मग त्याने दर्शनमंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा;
पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे अर्पण करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे परमेश्वर देव त्यांच्या पापांची क्षमा करील.
आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण होय.
“एखाद्या अधिपतीने परमेश्वराने मना केलेले कर्म केले व चुकून पाप घडले तर तो दोषी ठरेल.
त्याने केलेले पाप जेव्हा त्याला कळून येईल तेव्हा त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा;
त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
उपकारस्तुतीच्या अर्पणातील यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे याजकाने ह्या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशा प्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे देव त्या अधिपतीला क्षमा करील.
“एखादा सामान्य माणूस परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केल्यामुळे चुकून पाप घडल्यामुळे दोषी ठरला;
आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी;
त्याने त्या बकरीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे;
आणि याजकाने त्या बकरीच्या चरबीचा शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशा प्रकारे याजकाने त्या सामान्य माणसाकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्याला क्षमा करील.
“त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोंकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
त्याने त्या कोंकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्याला वधावे.
याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
3त्याने शांत्यर्पणाच्या कोंकराच्या चरबी प्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्या प्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे देव त्याला क्षमा करील.
5
“एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला वा अशुद्ध सरपटणाऱ्या गोष्टींना जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तरीही तो दोषी ठरेल.
माणसाच्या आंतून बाहेर पडणाऱ्या स्राव इत्यादि अनेक गोष्टी अशुद्ध असतात; एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या अशा अशुद्ध गोष्टीला न कळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी घाईघाईने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून मेंढी आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
“त्याला कोंकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगाळून मोडावी परंतु त्याचे दोन भाग करु नयेत.
पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.
मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.
“जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा त्याचे पापार्पण म्हणून आणावा; ते पापार्पण असल्यामुळे त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये.
त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराकरिता होम करावा; हे पापार्पण होय.
अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला मैदा याजकाचा होईल.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करुन कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या किमतीचा दोष नसलेला मेंढा आणावा;
ज्या पवित्र वस्तूची विटंबना करुन त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पांचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.
“परमेश्वराने मना केलेली एखादी गोष्ट करुन कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय. अंशा रीतीने याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.
तो माणूस जरी त्याच्या हातून नकळत पाप घडले तरी तो दोषी आहे म्हणून परमेश्वरासाठी त्याने दोषार्पण अर्पावे.”
6
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“कोणी परमेश्वराविरुद्ध खालीलपैकी एखादी गोष्ट करुन पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव म्हणून ठेवलेली वस्तू परत करण्यास खोटे बोलून नकार दिला. किंवा एखाद्याची चोरी केली किंवा कोणाला फसवीले.”
किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली किंवा एखादे काम करण्याचे वचन दिले, पण मग ते काम करणार नाही किंवा एखादे वाईट काम केले;
जर कोणी वरील प्रमाणे काही केले तर त्याच्यावर पाप केल्याचा दोष येईल; त्याने चोरलेली वस्तू माघारी आणावी; किंवा फसवून काही घेतलेले किंवा गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव किंवा जिच्याबद्दल त्याने लबाडी केली अशी सापडलेली वस्तू किंवा
खोटे वचन देऊन न केलेले काम त्या प्रत्येकाबद्दल त्याने पूर्ण भरपाई करावी आणि त्या त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने खऱ्या मालकाला पैसे द्यावेत; दोषार्पण आणण्याच्या दिवशीच त्याने हे करावे.
“त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्या माणसासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला देव क्षमा करील.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
मग याजकाने आपला सणाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदी जवळ ठेवावी.
मग याजकाने आपली वस्त्रे बदलावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी;
“परंतु वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर जळावू लाकडे ठेवून तो पेटत ठेवावा व त्याच्यावर शांत्यार्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
“अन्नार्पणाचा नियम असा आहे: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते आणावे;
याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर मैदा, थोडे तेल व सगळा धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; तो परमेश्वरासाठी स्मारक अर्पण होईल; त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो.
“त्यातून उरलेले, खमीर नसलेले हे अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्याना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे.
ह्या अर्पणातून अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुष हे खाऊ शकतो परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यान्पिढ्या सतत चालू राहावा; ह्या अर्पणास स्पर्श झाल्याने ते पवित्र होतील.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोन व त्याच्या मुलांनी अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी परमेश्वराला अर्पण आणावयाचे ते हे: आठ वाट्या म्हणजे एक दशांश एफा मैदा रोजच्या अर्पणाच्यावेळी आणावा, व त्यापैकी अर्धा सकाळी व अर्धा संध्याकाळी अर्पावा.
“तो तेलात चांगला मळावा आणि तव्यावर चांगला भाजल्यावर व तेलात परतल्यावर आत आणावा व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करावेत; त्यांचा सुवास परमेश्वराला आनंद देईल.
“अहरोनाच्या मुलांपैकी त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून ज्याची निवड होईल त्यानेही असेच अर्पण आणावे. कायमचा विधी म्हणून ह्या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.
याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.”
परमेश्वर मोशेले म्हणाला,
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधि असा. ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
“जो याजक पापबली अर्पील त्याने तो दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी खावा.
ज्या माणसाला किंवा वस्तूला त्या मांसाचा स्पर्श होईल तो माणूस किंवा ती वस्तू पवित्र होईल; “त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्र स्थानीं धुवावे.
पापार्पणाचे मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
“याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला पापार्पणाचे मांस खाण्याचा हक्क आहे; ते परम पवित्र आहे;
पण ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपात पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.”
7
“दोषार्पणाविषयी जे नियम आहेत, ते हे: हे अर्पण परमपवित्र आहे.
ज्या जागीं होमबलीचा वध करावयाचा त्याच जागी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा, आणि याजकाने त्या बळीचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
“त्याची सर्व चरबी याजकाने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी,
दोन्ही गुरदे, त्यंच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्येतचा काळजावरील चरबीचा पडदा,
ह्या सर्वाचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
“याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बळी खाण्याचा अधिकार आहे; ते परमपवित्र आहे म्हणून ते पवित्र स्थानींच बसून खावे.
दोषार्पण पापार्पणसारखेच आहे; त्या दोघांचे विधि एकच आहेत; जो याजक ह्या होमबलीच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क राहील.
प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या बळीच्या कातड्यावरही अधिकार असेल.
भटृत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
प्रत्येक तेल मिश्रित किंवा कोरडे अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे-अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच अधिकार आहे.
“परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधि असा:
त्याला तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळया तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या मैद्याच्या तळलेल्या पोळया शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
शांत्यर्पण हे देवाकरिता शांत्यर्पणाच्या यज्ञासारखेच आहे म्हणून त्यासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी एक एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाटचा त्या पोळीवर हक्क आहे.
शांत्यर्पणासाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काहीही सकाळपर्यत ठेवू नये.
“यज्ञबलीचे अर्पण स्वखुशीचे किंवा नवसाचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरले तर ते त्याने दुसऱ्या दिवशी खावे.
परंतु त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस जर तो खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
“त्याचप्रमाणे ज्या मांसाला कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते कोणी खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच शांत्यर्पण खावे;
परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वराला अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
“एखादा माणूस जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करील मग ती अशुद्धता माणसाची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरू शकता पण ती मुळीच खाऊ नये.
परमेश्वरला अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.
“तुम्ही कोठेही राहात असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
जर कोणी कोणतेहि रक्त खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल.
तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यान्पिढ्या पाळावा.”
परमेश्वरा करिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली म्हणून पिढ्यान्पिढ्या हा त्यांचा कायमचा हक्क ठरला आहे.
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयींचे विधि असे;
इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय काय अर्पणे आणावीत ह्या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधीनियम लावून दिले.
8
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्या दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.”
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. लोक दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले.
मग मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे, ते हे.”
मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि अहरोनावर नक्षीदार सुंदर पट्टी आवळून बांधली.
मग मोशेने त्याच्यावर न्यायाचा ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;
नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंवर ते शिंपडून त्यांना पवित्र केले.
अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडले. अशा रीतीने त्याने ते सर्व अभिषेकाने पवित्र केले.
मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करुन त्याला पवित्र केले.
मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, अशा रीतीने लोकांनी यज्ञे अर्पण करावीत म्हणून ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले.
गो-ह्याच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्रीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले.
मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले.
मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
दररोज एक बेखमीर भाकरीची टोपली देवासमोर ठेवली जात असे मोशेने त्यातून एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते परमेश्वराला त्यामुळे संतोष झाला.
मोशेने मेढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.
परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.
तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाही तर तुम्ही मराल; कारण परमेश्वराने मला तशी आज्ञा दिली आहे.”
तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टी विषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
9
आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना (पुढाऱ्यांना) बोलावले.
मोशे अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर;
आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही एक एक वर्षाची व निर्दोष असावीत;
आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे.”‘
मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजन येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे तेज तुम्हाला दिसेल.”
मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व काही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकाकडील बळीही अर्पण करुन त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.
त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.
मग अहरोनाने मांस कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले.
मग अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
त्याने त्याची आंतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
मग त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोही पापार्पण म्हणून अर्पिला.
त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.
मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले.
अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.
अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करुन त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
2मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले;
तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
10
मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला;
म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
अहरोनाचा चुलता उज्जिएल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्र स्थानाच्या पुढच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
“जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे.
तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जणावा;
आणि परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.”
मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, “परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हव्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
“त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी अणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
“तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते;
त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागीं बसून अवश्य खावयाचे होते.”
परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
11
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:
“इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हांकरिता अशुद्ध आहे.
ह्यां प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवाला शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
“देवाच्या दृष्टिने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले व म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरूड, गिधाडे, कुरर,
घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
निरनराळ्या जातीचे कावळे,
शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
1पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड,
करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
“जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.
त्याच प्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावे.
“परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवाला शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;
जो कोणी मेलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
“जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
चौपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिज्या सरडा.
हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
“त्यांच्यापैकी कोणी मरुन एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, तो पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
अशुद्ध खापराचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध होते. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध होईल.
त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करुन ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
“झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध होईल.
त्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यांवर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
“खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
“जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करुन विटाळवू नका!
कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
मी तुम्हाला मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्याविषयी हे नियम आहेत.
ह्या नियमावरुन शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्यांच्यातील भेद तुम्हांस समजावा.
12
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.
आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये.
परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.
“तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.
तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी.
मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”
13
परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
“एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ठ्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा व त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
“त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा चट्ठा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे ठेवावे.
सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्ठा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्ठा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
“परंतु त्या माणसाने स्वत:ला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
“एखाद्या माणसाला महारोगाचा चट्ठा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे.
याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढच्या चट्ठ्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
“एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे,
त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
“परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्ठा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्ठा आहे.
पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागाकातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्ठा आहे.
पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.
“एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात पांढरा डाग दिसून येईल.
तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय.
पण तपासल्यावर त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती फुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय;
परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
“एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्ठा असला,
तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
तो चाईचा चट्ठा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्ठा असलेल्या व्यक्तीला त्याने सात दिवस वेगळे ठेवावे;
सातव्या दिवशी त्याने त्या चट्ठ्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.
परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे.
परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
“कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत पांढरे डाग असतील.
तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय न करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
“कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय.
त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे.
परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्ठा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्ठा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.”
“ज्याला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांना इशारा देण्यासाठी ‘अशुद्ध अशुद्ध’ असे ओरडत जावे.
जोपर्यत त्याच्या अंगावर चट्ठा असेल तितक्या दिवसापर्यत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
आणि तो चट्ठा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्ठा होय; तो याजकाला दाखवावा;
याजकाने तो चट्ठा तपासावा; चट्ठा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करुन ठेवावी.
“परंतु तो चट्ठा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
“परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
परंतु तो चट्ठा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्ठा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
14
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“महारोग बरा झालेल्या लोकांना शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे.
त्याने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.
तो बरा झाला असल्यास त्याने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब घेऊन येण्यास सांगावे.
मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने त्याला आज्ञा द्यावी.
याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;
आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या माणसावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्याला सोडून द्यावे;
“मग शुद्ध ठरवावयाच्या माणसाने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करुन घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे;
सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
“आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला चोवीस वाट्या-तीन दशांश एफा-मैदा, व दोन तृतीय अंश पिंट-एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;
आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाला, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे;
मग याजकाने पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.
“मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे;
मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिपडावे.
त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरिल दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या माणसासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
“मग याजकाने पापबली अर्पावा आणि शुद्ध ठरवावयाच्या माणसासाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;
मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या माणसासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
“परंतु तो माणूस गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवळणीचे एक कोंकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, आठ वाट्या-एक दशांश एफा-मैदा आणि दोन तृतीय अंश पिंटभर-एक लोगभर-तेल आणावे;
आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.
“आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
मग याजकाने ते दोषार्पणाचे कोंकरु व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोंकराचा वध करावा आणि त्याने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे.
याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
मग त्याने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषबलीचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे;
याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या माणसासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.
“मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो माणूस शुद्ध होईल.”
अंगावरील महारोगाचा चट्ठा बरा झालेल्या माणसाला आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या माणसाच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना असेही म्हणाला,
“कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,
तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, ‘माझ्या घरात चट्ठ्यासारखे काही तरी दिसते.’
“मग याजकाने लोकांना घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्ठा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाही तर घरातील सर्व वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
तो चट्ठा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.
तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करुन ठेवावे.
“मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्ठा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
चट्ठा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची त्याने लोकांना आज्ञा द्यावी.
मग त्याने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.
त्या माणसाने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
“जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्ठा घरात पुन्हा उद्भवला.
तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्ठा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्ठा होय; ते घर अशुद्ध आहे.
मग त्या माणसाने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.
आणि घर बंद असताना त्यात कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे;
त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.
“घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्ठा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्ठा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
“त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
त्याने एक पक्षी वाहात्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहात्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
ह्या सर्व सामग्रीचा उपयोग करुन ह्या प्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.
मग त्याने तो जिंवत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी केले म्हणजे ते शुद्ध होईल.”
सर्व प्रकारचे महारोगाचे चट्ठे, चाई,
कपड्यावरील किंवा घराचा महारोग.
सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वासंबधीचे हे नियम आहेत;
हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याचे शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.
15
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
“स्त्राव होणारा माणूस ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
जो कोणी त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
स्त्राव होणारा माणूस बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
स्त्राव होणाऱ्या माणसाच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“स्त्राव होणारा माणूस जर एखाद्या शुद्ध माणसावर थुंकला तर त्या शुद्ध माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“स्त्राव होणारा माणूस पाण्याने हात न धुता कोणाला शिवला तर त्या दुसऱ्या माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“परंतु स्त्राव होणारा माणूस एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
“स्त्राव होणारा माणूस आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या माणसाच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
“एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तीने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;
ती दूर असे पर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“अशा स्त्रीबरोबर लेंगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
“एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्त्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋ तुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.
तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात समजते. तशी अशुद्ध समजावी.
जर कोणी त्या वस्तूंना शिवेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.
मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
“ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!”
स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;
आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करुन अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.
16
अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!
“परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी त्याने पापार्पणसाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
“अहरोनाने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणाकरिता दोन बकरे व होमार्पणाकरित एक मेंढा घ्यावा.
त्यांने पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करुन स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
“मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व अजाजेलसाठी.
“परमेश्वरासाठी म्हणून, चिठ्ठी निघालेला बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व तो लोकांकरिता प्रायश्चित म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
“मग अहरोनाने पापार्पणाच्या गोऱ्ह्याचा वध करुन स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
नंतर त्याने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
त्याने तो परमेश्वरासमोर अग्नीवर, इतका घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटावरील दयासन व्यापून टाकावे म्हणजे मग तो मरणार नाही;
त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वबाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
“मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आतल्या दालनात आणावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.
अहरोन प्रायश्चित करण्यासाठी जेव्हा परमपवित्रस्थानात जाईल तेव्हापासून, तो स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करुन बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात कोणी नसावे व कोणी तेथे जाऊ नये.
मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
“तेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरिता प्रायश्चित करण्याचे संपविल्यावर त्याने जिवंत बकरा सादर करावा.
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे.
तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व पापकर्माचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
“मग अहरोनाने दर्शनमंडपात येऊन परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरुन तेथे ठेवावी.
मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे, लोकांसाठी होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
मग त्याने पापार्पणाच्या चरबीच्या वेदीवर होम करावा.
“ज्या माणसाने पाप बाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर छावणीत यावे.
“पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त अहरोनाने प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे. मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व मग छावणीत यावे.
“तुमच्यासाठी हा एक कायमचा विधीनियम असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता, जिवास दंडन करावे, तुम्ही नम्र व्हावे; त्या दिवशी तुम्ही तसेच तुमच्या देशात राहणारे परके किंवा परदेशी ह्यापैकी कोणीही कसलेच काम करु नये;
कारण त्या दिवशी तुम्ही पापापासून शुद्ध व्हावे म्हणून याजक तुमच्यासाठी प्रायश्चित करील, मग परमेश्वरासमोर तुम्ही पापापासून शुद्ध ठराल.
तुमच्यासाठी हा फार महत्वाचा व पूर्ण विसाव्याचा शब्बाथ दिवस आहे; तुम्ही अन्न न घेता आपल्या जिवास दंडन करावे. तुम्ही नम्र व्हावे; हा कायमचा विधी नियम होय.
तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.
इस्राएल लोकांसाठी त्यांच्या पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधीनियम होय.” परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.
17
परमेश्वर मोशेले म्हणाला,
“अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही:
इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
तर त्या माणसाने तो प्राणी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणावा; त्याने त्या प्राण्याचा वध करुन रक्त सांडले आहे म्हणून त्याने तो परमेश्वराच्या निवासमंडपापाशी आणावा; त्याने जर तसे केले नाही तर त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा म्हणजे त्या सुवासाने त्याला आनंद होईल.
आणि यापुढे त्यांनी ‘अजमूर्तीना’ अजिबात बळी अर्पण करु नयेत. ते त्या दुसऱ्या देवांच्या मागे लागले व अशारीतीने त्यांनी वेश्येप्रमाणे आचरण केले. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
“तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.
“इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे.
म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतो की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
“इस्राएलपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
कारण मासांमध्ये जर अद्याप रक्त आहे तर त्या प्राण्याचा जीव अद्याप त्याच्या मांसात आहे, म्हणून मी इस्राएल लोकांना ही आज्ञा देतो की ज्या मांसात अद्याप रक्त आहे ते मांस खाऊनका! जर कोणी माणूस रक्त खाईल, तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
“त्याचप्रमाणे कोणी इस्राएल माणूस असो किंवा त्यांच्यामध्ये राहणार परदेशीय असो! तो जर आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे मग तो शुद्ध होईल.
त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”
18
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग: मी परमेश्वर तुमचा देव आहे.
तुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.”
तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी कसोशीने पाळा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे.
म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
“तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये! मी परमेश्वर आहे:
“तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये.
तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज जाईल.
“तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको.
“तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल!
“जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
“तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
तू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे.
“तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे.
“तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.
“एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे.
“तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
“स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते.
“तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील!
“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.
“स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
“कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
“असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका! कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे! कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली!
म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!
“ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये.
कारण तुमच्या पूर्वी ह्या देशात राहाणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ पापकृत्ये केल्यामुळे हा देश अमंगळ झाला आहे.
जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्ही हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ पापी कृत्य करतील त्या सर्वाना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
19
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझे शब्बाथ पाळलेच पाहिजेत; मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
“तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे !
“तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल.
त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही.
कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
“तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका.
आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
“तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये.
तुम्ही माझ्या नांवाने खोटी शपथ वाहू नये; तसे कराल तर तुम्ही माझे मय न धरता माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
“आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
“बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा-त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
“न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
इतर लोकाविषयी खोट्यानाट्या गोष्टी सांगत इकडे तिकडे फिरु नका; आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे.
“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
“तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका; दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरु नका; भिन्न सूत एकत्र करुन विणलेला कपडा अंगात घालू नका.
“एकाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरुन मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीर संबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारु नये;
हे पाप केलेल्या माणसाने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;
आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
“तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोंचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळ झाडे लावाल, तेव्हा फळ झाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊं नयेत.
पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.
मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिकात अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
“तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका; “तुम्ही काही जादू-टोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्यांच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
“आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका.
मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करुन घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊन नका. मी परमेश्वर आहे!
“तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
“तुम्ही माझे शब्बाथ, काम न करिता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्या मागे लागू नका; ते तुम्हाला अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
वडीलधाऱ्यामाणसांना मान द्या; वृद्ध माणूस घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
“कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहात असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका.
तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका.
तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले!
“म्हणून तुम्ही माझे विधी व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे.”
20
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की इस्राएल लोकांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहाणाऱ्या परदेशीयापैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा!
मीही त्या माणसाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नांवाला कलंक लावला!
मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझांके करुन त्याला जिवे मारणार नाहीत.
तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी मोलख दैवताच्या नादी लागून त्याच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
“जो माणूस सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे. मी त्याच्या विरुद्ध होईन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
“म्हणून पावन व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे!
“जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
“जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला व जारिणीला अवश्य जिवे मारावे.
जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील.
“कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करुन घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
“ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करुन पाप केले आहे.
आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याच्या हातून मात्रागमनाचे पाप घडेल, त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
“कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती होणार नाही.
“म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका.
“मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. “त्यात दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करुन मी तुम्हाला माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू व शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.
तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
कोणी पंचाक्षरी किंवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.”
21
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे, जे याजक त्यांना असे सांग की मेलेल्या माणसाला र्स्ण्श करुन याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.
परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण ह्यांच्या प्रेताला स्पर्श केल्यास हरकत नाही.
याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वत:ला अपवित्र करुन घेऊ नये.
“याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये.
याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.
“एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
“आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
त्याने आपणाला अशुद्ध करुन घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या बापाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
“त्याने कुमारिकेशीच लग्न करावे,
भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांत आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्याला पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यामध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग-शारीरिक दोष-निघाले तर त्याने आपल्या देवाकरिता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
मोडक्या पायाचा, थोटा,
कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊं नये;
तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परम पवित्र स्ताने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्राएल लोक ह्यांना हे सर्व सांगितले.
22
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्या पवित्र होतात; त्या माझ्या आहेत; म्हणून त्या याजकांनी घेऊ नयेत; त्या पवित्र वस्तू घेऊन जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही माझा मान न राखता-माझे भय न धरता-माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
तुझ्या वंशजापैकी कोणी जर त्या पवित्र वस्तूना हात लावील, तर तो अपवित्र ठरेल; त्याला मजसमोरुन दूर करावे! इस्राएल लोकांनी त्या वस्तू मला अर्पण केल्या आहेत. मी परमेश्वर आहे.
“अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला माणूस,
किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या माणसास स्पर्श केल्यामुळे याजक अशुद्ध होईल.
याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊं नयेत.
सूर्य मावळल्यावरच तो माणूस शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
“आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊं नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
“त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; तो ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना ह्या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
फकत याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या माणसाबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी राहात असेल तर मग आपल्या बापाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे.
“एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यात घालून याजकास द्यावी.
“इस्राएल लोक परमेश्वराला अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!”
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
“अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की तुम्हांइस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हांमध्ये राहाणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुषीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
“एखाद्या माणसाला आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुषीच्या अर्पणासाठी परमेश्वराला गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
“गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड-पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुषीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
“ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
“परमेश्वराला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही विदेशी लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“वासरु, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्या प्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
“परमेश्वराकरिता तुम्हाला उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
“तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
माझ्या पवित्र नांवाचा मान राखावा-माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परेशवर आहे!”
23
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्र सण असे.
“सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
“परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
“त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर-खमीर न घातलेली भाकर खावी.
सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी स्वीकारण्यात येईल.
“पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे;
तुम्ही त्याच बरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश मैद्याच्या पिठाचे अन्नार्पण अर्पावे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थाश हिन द्राक्षारस अर्पावा.
तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.
“तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-रविवारी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रविवारी म्हणजे पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळाण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
“एक गोऱ्हा, दोन मेंढे व एक एक वर्षाची सात नर कोंकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वराला संतोष होईल.
आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी एक एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावेत.
“याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हाला पिढ्यान्पिढ्या निंरंतरचा नियम होय.
“तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचूं नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
तुम्ही कोणतही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वराला अर्पण अर्पावे.”
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करुन नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे.
त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
“त्या दिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास दंडन करुन आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
त्या दिवशी कोणाही माणसाने जर कसलेही काम केले तर मी देव त्याला त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहात असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हाला हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय.
तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास दंडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही काम करु नये.
सात दिवस परमेश्वराला अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वराला अर्पण अर्पावे; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
“परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यांत योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वराला अर्पावे.
परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
“जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन परमेश्वरासमोर सात दिवस उत्सव करावा.
प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात राहावे,
म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांना कळवले.
24
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाच्या हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे;
अहरोनाने दर्शनमंडपात साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय.
त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.
तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर मैद्याचा करावा.
त्यांच्या दोन रांगा करुन एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे देवाला अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल.
दर शब्बाथ दिवशी अहरोनने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”
त्याकाळीं कोणा एक इस्राएल स्त्रीला मिसरी-पुरुषापासून झालेला एक मुलग होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला.
तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करुन शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नांव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.
मग परमेश्वरदेव मोशेला म्हणाला,
“तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करुन मारुन टाकावे.
तू इस्राएल लोकांना अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.
“जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारील तर त्याला अवश्य जिवे मारावे.
जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी.
“जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी.
पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
“परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
25
सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल त्यावेळी त्या देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा.
सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;
पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.
तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.
“तरी तुम्हाला भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहाणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल;
आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.
“तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल.
मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे;
त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही “योबेल” म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी “योबेल” वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;
कारण ते “योबेल” वर्ष होय; ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा.
ह्या “योबेल” वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
“तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या “योबेल” वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हाला जमीन विकावयाची असेल तर “योबेल” वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल कां? कारण तो फकत पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हाला विकत आहे.
जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हाला खरोखरी फक्त काही पिकेच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल.
तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे! मी परमेश्वर तुमचा देव आहे!
माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा! म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल;
आणि भूमि तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल.
तुम्ही कदाचित् म्हणाल, ‘आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहाणार नाही.’
चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षाचे पीक देईल.
मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तो पर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.
“जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
म्हणून लोक आपली जमीन विकतील खरी परंतु ती नेहमी त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळणार.
तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमतेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या माणसाला आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.
तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि त्याला त्याने जमीन विकली असेल त्याला शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
“एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यान्पिढ्या त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
तटबंदी नसलेली नगरे उगड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यांतील घरे योबेल वर्षी त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
“परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यांतील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
लेवी लोकांच्या नगराभोंवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
“तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;
त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वरदेवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे.
तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.
मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.
“तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्याला गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;
योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
त्या वर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे;
कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये.
तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
“तुमच्या दास दासी विषयी; तुमच्या देशासभोंवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे;
तसेच तुमच्या देशात राहाणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील;
तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करुन घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेंकावर कठोरपणाने चालवू नये.
“तुझा एखादा परदेशीय किवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहात असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
तर त्यांची विक्री झाल्यावरही त्याला स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडवता येईल;
किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्याला सोडवता येईल किंवा तो स्वत:चा धनवान झाला तर त्याला स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करुन घेता येईल.
“त्याला विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्याला फकत थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!
योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील.
योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.
त्याने आपल्या मालकापाशी प्रत्येक वर्षी साळकरु प्रमाणे राहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये.
“जरी त्या माणसाला पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलबाळे मुक्त होतील.
कारण इस्राएल लोक माझे दास आहेत; त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी देव आहे!
26
“तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
“तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
“तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या!
तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल.
मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.
“तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
तुमच्यातील पांच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
“मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
आणखी मी तुम्हामध्ये माझा पवित्र मंडप टाकून वस्ती करीन; तुम्हापासून मी जाणार नाही!
मी तुमच्याबरोबर चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!
“परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मग ह्या वाईट गोष्टी तुम्हावर येतील.
तुम्ही जर माझे नियम मानण्यास व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल.
तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
“ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन.
मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
“तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल!
मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना तुमच्यापासून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; ते तुमच्या अनेक लोकांना मारुन टाकतील, व त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील!
“एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात,
तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन.
तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील.
मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
“एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरुद्ध वागला,
तर मात्र खरोखर मी माझा राग तुम्हाला दाखवीन! मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन!
तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल.
तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन.
मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहाण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
“तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील.
देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील.
कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील. “तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
“परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.
मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील.
तेव्हा मग मी याकोब, इसहाक व अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.
“त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल.
त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे!
त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”
हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.
27
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे:
वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे आसावे,
आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे;
मुलगा पांच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
मुलगा एक महिन्याहून मोठा व पांचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पांच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
“परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
“काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बद्दल करूं नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
“काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात-ते अशुद्ध असतात-कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
“एखाद्याने आपले घर परमेश्वराला वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
“एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किमत असावी.
योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करुन याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल!
“स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल.
तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
“मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
“लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याजकाने ठरविलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरविलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
“लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
“ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
“भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे.
म्हणून एखाद्याला आपला एकदशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एकपंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
“गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल.
निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे ह्या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्याला बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.”
परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.
- Holder of rights
- Multilingual Bible Corpus
- Citation Suggestion for this Object
- TextGrid Repository (2025). Marathi Collection. Leviticus (Marathi). Leviticus (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7BF-5