1

येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहूदाकडून, देवाने ज्या तुम्हांला पाचारण केले आहे त्यांस, देवपिता तुमच्यावर प्रीती करतो व येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जात आहात.
देवाची करुणा, शांति आणि प्रीती तुम्हांला अधिकाधिक लाभो.
प्रिय मित्रांनो, जरी मली तुम्हांला आपल्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो तरी एका गोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते. ते म्हणजे देवाने आपल्या संतांना, एकदा दिलेला विश्वास टिकविण्यासाठी लढत राहा.
याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, ते अधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेव धनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांना एकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला
तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखील तुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्या महान दिवशी त्यांचा न्याय करता यावा.
त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्या आसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबधाच्या मागे ती लागली. अनंतकाळच्या अग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत.
अगदी तशाच प्रकारे, हे लोक जे तुमच्या गटात आले ते स्वप्नांनी बहकले व त्यांनी आपली शरीरे विटाळली आहेत. ते प्रभूचा अधिकार बाजूला ठेवतात व ते गौरवी थोरामोठ्यांविरुद्ध (देवदूतांविरुद्ध) निंदानालस्तीची भाषा वापरतात.
पण हे लोक, ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात. आणि जनावरासारखे केवळ मूळ स्वभावाला अनुसरुन जे काही त्यांना समजते. अगदी त्याच गोष्टीमुळे ते नाश पावतात.
या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वत:च चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत.
ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.
हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे.
तो अखिल जगातील लोकांचा न्याय करील आणि सर्व लोकांना त्यांनी केलेल्या अधर्माच्या कामासाठी आणि देवाची चाड न बाळगणाऱ्या पापी लोकांनी त्याच्याविरुद्ध जे कठोर, वाईट शब्द आपल्या तोंडावाटे काढले त्याकरीता तो त्यांना दोषी ठरवील.”
हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरंचा तोंडपूजेपणा करतात.
पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा.
त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वत:च्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.”
असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा.
आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वत:ला राखा.
विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा.
त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो
एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.

Rechtsinhaber*in
Multilingual Bible Corpus

Zitationsvorschlag für dieses Objekt
TextGrid Repository (2025). Marathi Collection. Jude (Marathi). Jude (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A90E-B