1
देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत, जे पंत, गलतिया, कप्पदुकिया आशिया व बिथुनिया प्रांतात विखुरलेले आहेत त्या यहूदी लोकांना,
देवपित्याने फार पूर्वीच केलेल्या योजनेप्रमाणे आत्म्याच्याद्वारे तुम्ही पवित्र व्हावे, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहावे आणि येशूचे रक्त तुमच्यावर शिंपडून तुम्हांला शुद्ध करावे, याकरीता तुम्हाला निवडले आहे. त्या तुम्हाला देवाची कृपा व शांति भरपूर प्रमाणात लाभो.
आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली.
आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.
आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा.
नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात.
तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेष्ट्यांनी भविष्य वर्तविले होते त्यांनी त्या तारणाबाबत फार मन:पूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली.
ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.
स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हांस आता या गोष्टी विदित केल्या. त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वत:साठी नाही, तर आमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत.
म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा.
आज्ञाधारक मुलांप्रमणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, तुम्हांला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा.
त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा.
कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.”
आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा.
तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे.
तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे.
जगाच्या निर्मितिच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. पण तुमच्याकरिता या शेवटच्या दिवसात त्याला प्रकट करण्यात आले.
ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.
आता तुम्ही स्वत:ला शुद्ध केले आहे. सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा. एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या.
जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे, तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे.
म्हणून पवित्र शास्त्र सांगते, “सर्व लोक गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रानफुलासारखे आहे. गवत सुकते, फूल गळून पडते,
परंतु आमच्या प्रभूचे वचन अनंतकाळ टिकते.” यशया 40:6-8 आणि हाच तारणाचा संदेश आहे, जो तुम्हाला सांगितला गेला.
2
म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या.
नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल.
आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.”
जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे.
तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे.
म्हणून खलील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे: “पहा सियोनात मी कोनशिला बसवितो, जी मौल्यवान व निवडलेली आहे आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” यशया 28:16
तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना, “बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आहे.” स्तोत्र. 118:22
तो असा झाला, “एक धोंडा जो लोकांना अडखळवितो आणि एक खडक जो लोकांना पाडतो.” यशया 8:14 ते लोक अडखळतात कारण ते देवाची आज्ञा पाळत नाहीत. त्यांना त्याच्यासाठी नेमलेले आहे.
पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
एकवेळ तुम्ही लोक नव्हता पण आता तुम्ही देवाचे लोक आहात. एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.
प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा.
जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.
प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा.
राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे.
म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अबिचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे.
मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा.
सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.
घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा.
कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंत:करणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरुक आहे व अन्यायामुळे त्याला दु:ख सोसावे लागते.
कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे.
यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वत:च्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.
“त्याने कोणतेही पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट नव्हते.” यशया 53:9
जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वत:ला सोपवून दिले.
त्याने स्वत:आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले.
तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता. पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात.
3
त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील.
जेव्हा ते तुमचे शुद्ध आणि आदरयुक्त वागणे पाहतील
तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.
त्याऐवजी तुमची सुंदरता अंत:करणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.
पूर्वीच्या काळतील ज्या पवित्र स्त्रिया होऊन गेल्या, त्यांनी अशाच प्रकारे आपल्या सर्व आशा देवावर केन्द्रीत करुन आपली स्वत:ची सुंदरता वाढीस लावली त्या स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन असत.
साराने अब्राहामाची आज्ञा पाळली आणि अब्राहामाला आपला मालक मानले. जर तुम्ही चांगली कामे करता व कशाचीही भिति मनात बाळगत नाही तर तुम्ही तिच्या म्हणजे सारेच्या मुली आहात.
तसेच पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळग, म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना देवाला सादर करता त्यात कसलीही बाधा येणार नाही.
शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.
वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा.
पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे, व चांगले दिवस पहावयाचे आहेत, त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे, आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे. त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.” स्तोत्र. 34:12-16
जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण,
जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”
पण आपल्या अंत:करणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा.
पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी एकदाच मरण पावला. एक नीतिमान दुसऱ्या अनीतिमानांसाठी मरण पावला. यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे. त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार्ता सांगितली.
फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला.
ते पाणी आत्मा चिन्हात्मकरीत्या बाप्तिस्म्याचे ज्यामुळे आता तुमचे तारण होते त्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा म्हणजे शरीरावरील धूळ काढणे नव्हे, तर तो देवाकडे शुद्ध विवेक मिळावा म्हणून केलेला करार आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्यामुळे घडू शकले.
तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.
4
ख्रिस्ताने जसा शरीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला, तसेच तुम्हीसुद्धा ख्रिस्ताची जशी चित्तवृति होती तशा प्रकारच्या चित्तवृत्तीने सज्ज व्हा. मी असे म्हणतो कारण ज्याने शारीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला आहे तो पाप करण्याचे सोडून देतो.
म्हणून तो या जगात राहत असता आपल्या उरलेल्या पृथ्वीवरील जीवनात मानवी वासनांच्या आहारी जाणार नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल.
कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.
आता तुम्ही त्यांच्यासारखे वाहवत जात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून तुम्हांस शिव्याशाप देतात.
ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील,
कारण जे मेलेले आहेत त्यांनासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की, मनुष्यांप्रमाणेच शारीरिकटृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे.
सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.
कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा.
तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर. करावा वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा.
सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे; जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे. कारण गौरव व सामर्थ्य अनंतकालासाठी त्याचीच आहेत. आमेन.
प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका.
त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी.
जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुयच्यावर विसावतो.
म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये.
पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे.
कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?
आणि “जर चांगल्या माणसाचे तारण होणे अवघड आहे तर मग जो अधार्मिक व पापी मनुष्य आहे त्याचे काय होईल?”
तर मग ज्यांना देवाच्या इच्छेनुसार दु:ख सोसावे लागते, त्यांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या हाती आपले जीवन सोपवून द्यावे आणि त्यांनी चांगली कामे करीत राहावे.
5
आता मी तुमच्यातील वडीलजनांना आवाहन करतो (मी स्वत: एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदारसुद्धा आहे.)
तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा.
आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा.
आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगुट देईल.
त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण “देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, पण दीनावर कृपा करतो.” नीतिसूत्रे 3:34
देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा.
तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,
सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो.
परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वत: तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल.
त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.
तुम्हाला देवाच्या खऱ्या कृपेची साक्ष द्यावी व तुम्हाला उत्तेजन द्यावे म्हणून मी हे पत्र सिल्वानच्या हातून थोडक्यात लिहीत आहे कारण सिल्वान हा आपला विश्वासू भाऊ आहे. असे मी समजतो. देवाच्या खऱ्या कृपेत दुढ राहा.
तुमच्याबरोबरच देवाने निवडलेली बाबेल येथील मंडळी तुम्हांला सलाम सांगते, तसेच ख्रिस्तातील माझा पुत्र मार्क तुम्हांला सलाम सांगतो.
तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा. तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.
- License
-
CC-0
Link to license
- Citation Suggestion for this Edition
- TextGrid Repository (2025). Peter the Apostle. 1 Peter (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8EA-3