1

देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते.
तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही.
देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.
विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे. देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.
मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यावस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत.
ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे.
कारण अध्पक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणची आवड नसणारां, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा.
तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वत:वर संयम ठेवणारा असावा.
विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत.
त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वत:म्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ
हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे.
आणि यहूदी भाकडकथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.
शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही.
ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.

2

तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल.
वडील माणसांनी आत्मसंयमित, आदरणीय व शहाणे असावे आणि विश्वासात, प्रीतीत व सहनशीलतेत बळकट असावे.
त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवयनसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे.
यासाठी की, त्यांनी तरुण स्त्रियांना, त्यांच्या पतींवर प्रेम करण्यास, त्यांच्या मुलांवर प्रेम करण्यास शिकवावे.
त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे. यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये.
त्याचप्रमाणे, तरुण मनुष्यांनी शहाणे व्हावे यासाठी त्यांना उत्तेजन देत राहा.
प्रत्येक गोष्टीत स्वत:ला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे. तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी.
ज्यावर कोणी टीका करू शकत नाही असा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर. यासाठी की, जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे.
गुलामांना, सर्व बाबतीत त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यासाठी व त्यांना संतोष देण्याविषयी व हुज्जत न घालण्याविषयी शिकीव.
तसेच चीरी करु नये तर पूर्णपणे विश्वासूपणा दाखविण्यास सांग. यासाठी की, त्यांनी आपला तारणारा देव याच्या शिकवणुकीला सर्व बाबतीत सन्मान मिळवून द्यावा.
कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे.
ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी.
आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी.
त्याने स्वत:ला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वत:साठी शुद्ध करावे.
या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर. कोणीही तुला तुच्छ मानू नये.

3

सत्ताधीश, आणि अधिकारी यांच्या अधीन राहण्या विषयी व त्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी व प्रत्येक चांगले काम करण्यास तयार राहण्याविषयी,
कोणाचीही निंदा न करण्याविषयी, भांडण टाळण्याविषयी आणि सर्व माणसांना मोठी नम्रता दाखविण्याविषयी त्यांना सतत आठवण करून देत राहा.
मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो.
पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा
त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो.
देवाने तो पवित्र आत्मा आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे विपुलपणे आम्हावर ओतला.
यासाठी की, आता देवाकडून त्याच्या कृपेमध्ये आम्ही निर्दोष घोषित केले जावे. अनंतकाळच्या जीवनाच्या आशेने आम्ही त्याचे वारस व्हावे.
ही शिकवण विश्वसनीय आहे. आणि यावर जोर द्यावा असे मला वाटते. यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी लोकांसाठी चांगल्या व हिताच्या आहेत.
एकदोन वेळा बोध करून, फूट पाडणाऱ्या व्यक्तीला दाळा.
कारण तुला माहीत आहे की, असा मनुष्य वाइटाकडे वाहवत गेला आहे व तो पाप करीत आहे व त्याने स्वत:लाच दोषी ठरविले आहे.
जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे.
जेना वकील व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासासाठी ज्याची गरज भासेल ती पुरविण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. यासाठी की, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये.
आपल्या लोकांनी चांगली कृत्ये करण्याविषयी शिकले पाहिजे यासाठी की तातडीच्या गरजा भागविल्या जाव्यात, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.
माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. विश्वासामध्ये आम्हावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सलाम सांग. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

Lizenz
CC-0
Link zur Lizenz

Zitationsvorschlag für diese Edition
TextGrid Repository (2025). Paul the Apostle. Titus (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8DD-2