1
आता राजा दावीद फार वृध्द झाला होता. वयोमानामुळे त्याला गारठा सहन होईना. नोकरांनी कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना.
तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो. ती तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो. ती तुमच्या निकट झोपेल आणि तुम्हाला ऊब देईल.”
आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलीचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा. गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वत : राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वत:साठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली.
अदोनीया हा दिसायला सुंदर होता. अबशालोम पेक्षा हा धाकटा. पण राजा दावीदने मात्र अदोनीयाला ‘हे तू काय चालवले आहेस?’ म्हणून कधी समज दिली नाही.
सरुवेचा मुलगा यावब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्याला नवीन राजा करण्यात मदत करायचे त्यांनी ठरविले.
पण पुष्कळांना अदोनीयाच्या या हालचाली पसंत नव्हत्या. ते दावीदशी एकनिष्ठ राहिले. सादोक हा याजक, यहोयादाचा मुलगा बनाया, नाथान हा संदेष्टा, शिमी रेई आणि दावीदच्या पदरी असलेले वीर हे ते लोक होत. ते राजाच्याच बाजूला राहिले, हे लोक अदोनीयाला मिळाले नाहीत.
एकदा एन - रोगेलजवळ रोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेढरे, गुरे, पुष्ट वासरे यांचा शांत्यर्पण म्हणून यज्ञ केला. आपले भाऊ, राजाची इतर मुले आणि यहूदातील सर्व अधिकारी यांना बोलावणे पाठवले.
पण राजाच्या पदरचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र वगळले.
नाथान संदेष्ट्यांच्या हे कानावर गेले तेव्हा तो शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. त्याने तिला विचारले, “हग्गीथेचा मुलगा अदोनीया याचे काय चालले आहे याचा तुला पत्ता आहे का? त्याने स्वत:ला राजा म्हणून घोषित केले आहे आणि इकडे आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्वा नाही.
तू आणि तुझा मुलगा शलमोन यांच्या जिवाला धोका पोहोंचू शकतो. यातून वाचायचा मार्ग मी तुला दाखवतो
अशीच राजा दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘स्वामी तुम्ही मला वचन दिले आहे.’ त्याप्रमाणे माझा मुलगा शलमोन तुमच्यानंतर गादीवर बसेल पण अदोनीया राजा होत आहे हे कसे काय?’
तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन. तू तिथून निघून गेल्यावर मी राजाला सर्व हकीगत सांगीन. म्हणजे तू बोललीस त्यात तथ्य आहे हे राजाला पटेल.”
तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली. राजा फारच थकला होता. शुनेमची अबीशग त्याची सेवा करत होती.
बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकाशी केली.
बथशेबा त्याला म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे. ‘माझ्यानंतर शलमोन राजा होईल. तो या गादीवर बसेल’ असे तुम्ही म्हणाला आहात.
आता तुमच्या नकळत अदोनीया स्वत:च राजा व्हायच्या खटपटीत आहे.
त्याने अनेक गुरे आणि उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे. त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुळे, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा एकनिष्ठ पुत्र शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्याचा वाडवडीलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.
राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली. “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.
मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आता राज्य अदोनीयाचे आहे असे तुम्ही ठरवले आहे काय?
कारण आजच त्याने खाली खोऱ्यात जाऊन गुरे मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमची मुले, सेनापती, अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. ‘राजा अदोनीया चिरायु होवो’ म्हणून घोषणा देत आहेत.
“पण मी, सादोक याजक यहोयादाचा मुलगा बनाया आणि तुमचा मुलगा शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.
माझे स्वामी, राजाने आम्हाला विश्वासात न घेता हे सर्व केले आहे का? आपला वारस तुम्ही कृपा करुन जाहीर करा.”
तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला आत यायला सांगा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर आली.
मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.
पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राजा होईल. या सिंहासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. मी दिलेला शब्द खरा करीन.”
बथशेबाने हे ऐकून राजाला वंदन केले व म्हणाली “राजा चिरायु होवो.”
मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा मुलगा बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा.
तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शलमोन हा आता नवा राजा आहे.
मग त्याला घेऊन माझ्याकडे या. तो या सिंहासनावर बसेल आणि नवा राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा राजा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.”
यहोयादाचा मुलगा बनाया राजाला म्हणाला, “आमेन! स्वामी, खुद्द परमेश्वर देवच याला मान्यता देईल.
महाराज, आपल्याला परमेश्वराची साथ आहे. तो परमेश्वर असाच शलमोनाच्याही पाठीशी उभा राहील अशी मला आशा आहे. राजा शलमोनच्या राज्याची भरभराट होवो आणि माझे स्वामी, आपल्यापेक्षा ते अधिक बळकट होवो.”
सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांना उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “ये तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
पण योनाथान म्हणाला, “नाही, तुम्हाला ही बातमी चांगली वाटणार नाही. राजा दावीदाने शलमोनाला राजा केले आहे.
दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया आणि आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला खुद्द राजाच्या खेचरावर बसवले.
मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहाने झऱ्याजवळ शलमोनाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण नगरात परतले. लोक त्यांच्या मागोमाग गेले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.
शलमोन आता गादीवर बसला आहे.
राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’ दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता.
आणि म्हणत होता, ‘इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान करा. परमेश्वराने माझ्या मुलांपैकीच एकाला सिंहासनावर बसवले आणि माझ्या डोळ्यादेखत हे झाले.’
हे ऐकून अदोनीयाची पाहुणेमंडळी घाबरली आणि त्यांनी तिथून पळ काढला.
अदोनीयाही शलमोन काय करील या धास्तीने घाबरला. तात्काळ तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे घटृ पकडून बसला.
कोणीतरी शलमोनाला सांगितले, ‘अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही. ‘शलमोन राजाने मला अभय द्यावे’ असे तो म्हणत आहे.’
तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याने आगळीक केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तो मरण पावेल.
मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.”
2
दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले,
“आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस.
आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.”‘
दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते.
पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.
“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
“गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही.
पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”
मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले.
हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्यांने इस्राएलवर राज्य केले.
आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता.
यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे.
मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणून नकोस.” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणून नकोस.” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्र करु दे.”
राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस? बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”
मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल.
इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस”
परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.
हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला.
कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले.
बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले. तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले.
तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे.
त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.
यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली.
मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”
तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला.
पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले.
तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.
तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, ‘यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस.
मग तू आज्ञाभंग का केलास? तू वचन का मोडलेस?
माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील.
पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.
मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.”
3
मिसरचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करुन शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.
मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
शलमोनही आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मन:पूर्वक पालन करुन परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. दावीदाने सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखीही एक गोष्ट तो करत असे. यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन एकदा यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला, “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्याच्यानंतर त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.
माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही.
मी तुझा सेवक तू निवडलेल्या अक्षरश: अगणित अशा लोकांपैकी एक आहे. शासकाला तर अनेक निर्णय करावे लागतात.
तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”
शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला
म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.
तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही.
शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान थोर राजा कोणी असणार नाही.
मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.
एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. आम्ही दोघी गर्भवती होतो आणि आमचे दिवस भरत आले होते. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.
तीन दिवसांनंतर ही पण प्रसून झाली. आमच्याखोरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहात होतो.
एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले.
तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत मूलच आहे, मेलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्राकरे दोघींचाही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.”
राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
राजा शलमोन म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करुन त्याचे दोन तुकडे करु आणि दोघींना एक एक देऊ.”
दुसरी बाई म्हणाली, “फार छान! बाळाचे दोन तुकडे करा. म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.” पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.”
तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.
राजाचा हा निवाडा इस्राएलच्या लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना आदर वाटला. योग्य निर्णय घेण्याचे उच्च कोटीचे परमेश्वरी शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.”
4
समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती.
त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सामादोकचा मुलगा अजऱ्या हा याजक होता
शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता.
बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता. सादोक आणि अब्याथार याजक होते
नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता. नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता. अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य
त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.
बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.
तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता.
रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गेब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दखवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.
इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.
हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता.
एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती.
युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती.
दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते.
शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभाशी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती.
पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते.
आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
5
हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले.
शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
“माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते.
परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही.
“परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे.
त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या दिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”
हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.”
मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईल.
माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली.
अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.
या काकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती.
त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.
मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.
6
अशा तऱ्हेने शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याला 480 वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथे वर्षे होते. वर्षाचा दुसरा महिना जिव चालू होता.
मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती.
मंदिराची देवडी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. 3मंदिराची देवडी 30 फूट लांब आणि 15 फूट रुंद होती. मंदिराच्या रुंदीइतकीच या देवडीची लांबी असून ती मंदिराच्या मुख्य भागाला लागूनच होती.
मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
मंदिराच्या भोवती अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. हे बांधकाम तीनमजली होते.
खोल्या मंदिराच्या भिंतीला लागून असल्या तरी त्यांच्या तुळ्या या भिंतीत नव्हत्या. मंदिराच्या भिंतीची रुंदी तळाकडे जास्त असून वर त्या निमुळत्या होत होत्या. त्यामुळे या खोल्यांच्या एका बाजूची भिंत तिच्या खाल्या भिंतीपेक्षा पातळ होती. तळमजल्यावरील खोल्यांची रुंदी साडेसात फूट, पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांची 9 फूट तर त्यावरच्या खोल्यांची साडे दहा फूट होती.
भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले होते. खाणीतूनच ते योग्य मापाने कातून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना होतोड्या, कुऱ्हाही किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची साडेसात फूट होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
यावेळी परमेश्वर शलमोनाला म्हणाला,
“माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडील दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
तू बांधन असलेल्या या मंदिरात इस्राएलपुत्रांमध्ये माझे वास्तव्य राहील. इस्राएलच्या लोकांना सोडून मी जाणार नाही.”
शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
मंदिराच्या आत मागच्या बाजूला तीस फूट लांबीचा अत्यंतपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. हा साठ फूट लांब होता.
हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंनीच्या दगडाचे नखभरही दर्शन होत नव्हते. या लाकडावर फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीवकाम केलेले होते.
आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या करारकोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती.
शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोही सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
अतिपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवले होते.
कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी 15 फूट होती. ते अतिपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
हे करुब देवदूत आतल्या अतिपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
हे दोन करुब देवदूतही सोन्याने मढवले होते.
दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
दोन्ही खोल्यांची जमीन सोन्याने मढवली होती.
जैतूनाच्या लाकडाचे दोन दरवाजे कारागिरांनी करुन ते अतिपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या महिरपीला पाच बाजू होत्या
जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
मुख्य भागालाही त्यांनी दरवाजे केले. जैतून लाकडाची चौकट उभारुन
फरच्या लाकडाचे दरवाजे केले.
कारागिरांनी दोन दरवाजे केले आणि प्रत्येक दार दोन झडपांचे होते त्यामुळे ते दुमडले जात असे. त्यावरही पुन्हा करुब देवदूत, खजुरीची झाडे, फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने आच्छादली होती.
मग आतला चौक बांधला. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि देवदाराची एक ओळ अशा त्या भिंती होत्या.
वर्षाचा दुसरा महिना जिव तेव्हापासून त्यांनी मंदिराच्या कामाला सुरुवात केली. इस्राएलचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दींचे ते चौथे वर्ष होते.
बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पण शलमोनाचे ते सत्तेवरचे अकरावे वर्ष होते. म्हणजेच मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.
7
राजा शलमोनाने स्वत:साठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली.
लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती.
या स्तंभांवरुन देवदाराच्या तुळ्या घातलेल्या असून त्यावर छत म्हणून देवदाराच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.
न्यायनिवाडा करण्यासाठीही त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवताल्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 15 फूट व इतरांची बारा फूट होती.
त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.
राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या माणसाला निरोप पाठवून यरुशलेम येथे बोलावून घेतले.
हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडील सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट होते पण ते मरण पावले होते. हिराम हा एक अनुभवी आणि कसबी तांबट होता. म्हणून राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने तितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती.
शिवाय त्याने साडेसात फूट उंचीचे दोन पितळी महिरपदार खांबही बांधले.
या खांबाच्या घुमट्यांना आच्छादायला म्हणून दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली.
मग त्याने पितळेचे, डाळिबांच्या आकाराचे शोभिवंत कळस केले. घुमट्यांच्या जाळड्यांवर या कळसांच्या दोन रांगा बसवल्या.
साडेसात फूट उंचीचे जे स्तंभ होते त्याच्या घुमट्या फुलाच्या आकाराच्या होत्या.
या घुमट्या स्तंभांवर बसवलेल्या होत्या. परडीच्या आकाराच्या जाळीवर त्या बसवलेल्या होत्या. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने वीस डाळिंबे लावली होती.
हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दाक्षिणेकडील खांबाला याखीन आणि उत्तरे कडील खांबाला बवाज असे नाव ठेवले.
फुलाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभांचे काम संपले.
यानंतर हिरामने पंच धातूचा एक गोल हौद केला. याला त्याने “समुद्र” असे नाव दिले. याचा परिघ पंचेचाळीस फूट होता. या काठापासून त्या काठापर्यंत त्याची लांबी पंधरा फूट होती आणि खोली साडेसात फूट.
या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करुन घेतल्या होत्या.
बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दाक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्र्चिमेला होती.
हौदाची जाडी तीन इंच रुंदीची होती. आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा फुलासारखी उमललेली होती. यात अकरा हजार गंलन पाणी मावत असे.
मग हिरामने दहा पितळी पालख्या केल्या. प्रत्येक पालखी सहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि साडे चार फूट उंच होती.
चौकटीत बसवलेल्या चौकोनी पत्र्यांनी या पालख्या केल्या होत्या.
पत्रे आणि चौकट यांच्यावर पितळी सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
प्रत्येक पालखीला पितळी धुऱ्यांवर पितळेची चार चार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यांनाही फुलांचे सुबक काम केलेले होते.
बैठकीला वरच्या बाजूला चौकट होती. बैठकीपासून ती अठरा इंच वर होती. घंगाळाचे वाटोळे तोंड सत्तावीस इंच व्यासाचे होते. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकटीवरही पुन्हा पितळेत कोरीवकामाची नक्षी होती. चौकट मात्र गोल नसून चौकोनी होती.
सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या.
रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्व काही ओतीव पितळेचे होते.
प्रत्येक पालखीच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
प्रत्येक पालखीला वरुन एक पितळेची पट्टी होती. तीही अंगचीच होती.
पालखीची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीवकाम पितळेत केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारख्या एक अशा दहा पितळी पालख्या घडवल्या. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे त्या तंतोतंत एकसारख्या होत्या.
हिरामने अशीच दहा गंगाळी केली. ती या दहा पालख्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळ सहाफुटी होते. त्यात दोनशेतीस गलन पाणी मावू शकत असे.
मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणपूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला हौदाची योजना केली.
परमेश्वाच्या मंदिराचे हे काम शलमोनाने स्वत:च्या पसंतीप्रमाणे करवून घेतले. मग आपले वडील दावीद यांनी या हेतून राखून ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. त्या सर्व मंदिरात आणल्या. परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यात ही सोन्यारुप्याची चीजवस्तू जमा केली.
8
इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.
तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्या विशेष उत्सवाचे होते.
इस्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.
त्याबरोबरच सभामंडप आणि तिथली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी घेतली. या कामात याजकांना लेवींनी मदत केली.
राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक करार कोशाच्या समोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते.
मद याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
करुबांचे पंख पवित्र करारकोशावर पसरलेले होते. पवित्र कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते.
हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.
करारकोशाच्या आता दोन शिलालेख होते. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
अतिपवित्र गाभाऱ्यात हा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले.
परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.
तेव्हा शलमोन म्हणाला, “आकाशात सूर्य तळपतो तो परमेश्वरामुळे, पण तो स्वत:मात्र काळोख्या ढगात राहत
तुला युगानुयूग राहाण्यासाठी हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
सर्व इस्राएल लोक तेथे उभे होते. त्या समुदायाकडे वळून शलमोनाने देवाला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगितले.
शलमोन राजाने मग एक दीर्घ प्रार्थना म्हटली. ती अशी; “इस्राएलचा परमेश्वर देव महान आहे. माझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने सर्व काही केले. परमेश्वर माझ्या वडीलांना म्हणाला,
“माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’
“इस्राएलच्या परमेश्वर देवाच्या सन्मानर्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या फार मनात होते.
पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘मंदिर उभारण्याची तुझी तीव्र इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.
पण तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझा मुलगा हे मंदिर उभारुन दाखवील.’
“परमेश्वराने अशा पध्दातीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.
त्यात पवित्र करारकोशासाठी एक गाभारा करवून घेतला आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांशील केलेला करार आहे. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले तेव्हा केलेला तो करार यात आहे.”
एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात
शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
माझे वडील दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करुन दाखवलेस. आपल्या मुखाने तू वनच दिलेस आणि तुझ्याच सामर्थ्यामुळे ते आज प्रत्यक्षात आले आहे.
माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालने केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’
परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
“पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.
पण कृपाकरुन माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.
“कोणाच्या हातून कुणाच्या विरुद्व काही अपराध घडल्यास त्याला या वेदीपुढे आणण्यात येईल. तो दुखावलेला माणूस त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविरुद्व शापवाणी उच्चारील तो निरपराध असेल तर तो तशी गवाही देईल. आपण निर्दोष असल्याचे तो शपर्थपूर्वक सांगेल.
तेव्हा तू ते स्वार्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. तो जर निरपराध असेल तर त्याच्या चांगुलपणाच्या प्रमाणात त्याला बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर.
“कधी इस्राएलच्या लोकांच्या हातून पाप घडले तर शत्रू त्यांचा पराभव करील. अशा वेळी हे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन या मंदिरात प्रार्थना करतील, तुझी स्तोत्रे गातील.
तेव्हा स्वर्गातून ती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. जो देश त्यांच्या पूर्वजांना तू दिलास तो त्यांना परत दे.
“कधी त्यांच्या पापाचा दंड म्हणून तू त्यांच्या भूमीवर दुष्काळ पाडशील तेव्हा ते या ठिकाणाकडे येऊन तुझी पार्थना करतील व तुझ्या नावाची स्तुती करतील. ते त्यांच्या पापांपासून परावृत होतील.
तेव्हा स्वर्गातून त्यांची विनवणी ऐकून त्यांना क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव. आणि परमेश्वरा, तू त्यांना दिलेल्या भूमीवर पुन्हा पहिल्यासारखाच पाऊस पडू दे.
“कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही. किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड येऊन सगळे पीक फस्त करील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील. किंवा एखाद्या दुख्याने लोक हैराण होतील.
असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली व मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली.
तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
आमच्या पूर्वचांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन राहावे म्हणून एवढे कर.
तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.
“कधी तू आपल्या लोकांना शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझी प्रार्थना करतील.
तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना मदत कर.
“लोकांच्या हातून काही पापही होईल. मी असं म्हणतो, कारण माणसाचा तो स्वभावच आहे. अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करुन दूरदेशी नेतील.
तिथे गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चात्ताप होईल आणि ते प्रार्थना करतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले’ अशी ते कबुली देतील.
ते कोठेतरी दूरच्या देशात असतील पण ते जर परराज्यात असताना अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेल्या या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक.
त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुध्द गेल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंमध्ये त्यांच्या बद्दल दया उत्पन्न कर.
ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस तापलेल्या भट्टीतून बाहेर काढावे तसे त्यांना सोडवलेस हे लक्षात असू दे.
“परमेश्वर देवा, माझी आणि या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकुरुन ऐक. त्यांनी केव्हाही याचना केली तरी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.
पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करुन तू यांना आपले म्हटले आहेस. तू आम्हाला एवढे कबूल केले आहेस. मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.
शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.
मग त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद द्यावेत अशी मोठ्या आवाजात देवाला विनंती केली. शलमोन पुढे म्हणाला.”
“परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत त्याने आपल्या फायद्याची अनेक वचने दिली होती. ती परमेश्वराने सर्वच्यासर्व खरी करुन दाखवली आहेत.
आपल्या पूर्वजांना त्याने साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हाला कधीही अंतर देऊ नये.
आम्ही त्याला अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.
आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल.
तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”
मग राजासहित सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरा समोर यज्ञबली अर्पण केले.
शलमोनाने 22,000 गुरे आणि 1,20,000 मेंढरे मारली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वराला अर्पण केले.
मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.
शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायाला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराच्या सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.
9
शलमोनाच्या मनात होते त्याप्रमाणे त्याने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे काम पूर्ण केले.
यापूर्वी गिबोनमध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला दर्शन दिले.
परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील.
तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा.
“तू त्याप्रमाणे वागलास तर तुमच्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी राजासनावर येईल. तुझ्या वडीलांना मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांचीच सत्ता इस्राएलवर राहील असे मी म्हटले होते.
हे मंदिर नामशेष होईल. ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचा असा विध्वंस का बरे केला?’
परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूपच मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
हिराम मग सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्याला ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
राजा हिराम म्हणाला, “काय ही तू दिलेली नगरे?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
हिरामने शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी नऊहजार पौंड सोने पाठवले होते.
शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
शलमोनाने ते पुन्हा बांधून काढले. तसेच खालचे बेथ-होरोनही बांधले.
तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे,
अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
इस्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकाही, कारभारी, सरदार, रथधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
फारोची मुलगी आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांतीबली अर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळी. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
एसयोन गेबेर येथे शलमोनाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाशयांबरोबर पाठवले.
शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून एकतीसहजार पाचशे पौंड सोने शलमोनाकडे आणले.
10
शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.
नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले.
शलमोनाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला कुठलाच प्रश्न अवघड वाटला नाही.
शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला.
त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांच्या पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्रृर्याने थक्क झाली.
ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते.
पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे.
तुझ्या बायका आणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभने आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो.
परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”
मग शबाच्या राणीने राजाला जवळजवळ 9,000 पौंड सोने नजर केले. शिवाय मसाल्याचे सुगांधी पदार्थ आणि मौल्यवान हिरेही दिले. इस्राएलमध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली.
शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले.
या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीचे वजन पंधरा पौंड होते.
तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्यात चार पौंड सोने होते. “लबानोनचे वन” नामक वस्तूमध्ये त्याने या ठेवल्या.
शिवाय शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते.
सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते.
तसेच सहाही पायऱ्यांवर दोन - दोन सिंह हिते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते.
शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्व सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वीधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते.
लोक त्याला पाहायला उत्सुक असत. देवाने त्याला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे.
ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणी. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
शलमोनाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बाराहजार घोडे यांचा संग्रह होता. रथांसाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्या जवळ यरुशलेममध्येही होते.
राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत.
मिसरचा एक रथ साधारण 15 पौंड चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत पावणेचार पौंड चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना शलमोन हे रथ आणि घोडे विकत असे.
11
स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले.
अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराथ केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.
कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले.
आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावुत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईल.
पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता.
त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती.
यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले.
1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.
फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्रही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती)
या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.
दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?” तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.
देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
दावीदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला
अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.
नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता.
यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
एवदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.
अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.
शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले.
पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.
बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
“माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”‘
शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत.
यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.
12
शलमोनाकडून पळाल्यावर नबाटाचा मुलगा यराबाम मिसरमध्ये गेला. तो अजून तिथेच होता. शलमोनाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर एफ्राईमच्या डोंगराळ भागातील जेरेदा या आपल्या नगरात तो परतला.
शलमोन मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्यानंतर त्याचा मुलगा रहबाम हा पुढचा राजा झाला.
त्याला राज्याभिषेक करायला सर्व इस्राएल लोक शेखेम येथे जमले. रहबाम तिथे आला. लोक त्याला म्हणाले,
“तुझ्या वडीलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हाला भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
रहबाम म्हणाला, “तीन दिवसांनंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांना मी काय सांगू?”
यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
पण रहबामने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
रहबाम त्यांना म्हणाला, “माझ्या वडीलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांना कामाचा भार कमी करुन हवा आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडीलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे काम कमी करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडीलांच्या अख्ख्या शरीरापेक्षा या माझ्या करंगळीत जास्स्त जोर आहे.
माझ्या वडीलांनी तुम्हाला कामाला जुंपले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी असा झोडपीन की विंचू डसल्यासारखे तुम्हाला वाटेल.”‘
रहबामने त्या लोकांना “तीन दिवसांनी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व इस्राएल लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले.
त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर कष्टाचे काम लादले. मी तर तुम्हाला आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर असा मारीन की विंचवाच्या डंकासारख्या तुम्हाला वेदना होतील.”
हे अर्थातच लोकांच्या मनासारखे नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा मुलगा यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहिया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दावीदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी. करु दे या दावीदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य.” एवढे बोलून ते निघून गेले.
तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएलींवर त्याची सत्ता होतीच.
अदोनीराम नावाचा एक माणूस सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामने त्याला लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथान बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला.
इस्रएल लोकांनी दावीदच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दावीदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
रहबाम यरुशलेमला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एकलक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून आपले राज्य परत मिळवायचा रहबामचा विचार होता.
शमाया नामक देवाच्या माणसाशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
“शलमोनाचा मुलगा आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
“आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. सर्वजण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो.”‘ या आदेशानुसार रहबामचे सैन्य माघारी गेले.
शेखेम हे एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करुन यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नाही नगराची उभारणी केली.
त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले.
अशाप्रकारे यराबामने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलमध्लाय वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
13
परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या माणसाला) यहूदाहून बथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे. ‘दावीदाच्या कुळात योशीया नावाचा मुलगा जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आत्ता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
हे निश्रित घडेल याचीही संदेष्ट्याने लोकांना चुणूक दाखवली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
यराबाम राजाने संदेष्ट्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेलमध्ये ऐकले. तेव्हा वेदीवरील आपला हात उचलून राजाने त्या माणसाकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” पण हे बोलत असताना राजाचाच हात लूळा पडला. त्याला तो हलवता येईना
नसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. संदेष्ट्याच्या तोंडून देवच बोलत होता याचा तो पुरावाच होता.
तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
राजा त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझ्या बरोबर घरी चल. काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
पण हा संदेष्ट्या म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
काहीही न खाण्याणियाबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही अशीही त्याची आज्ञा आहे.”
त्या प्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
बेथेल नगरात एक वृध्द संदेष्टा राहात होता. त्याच्या मुलांनी त्याला या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. यराबामला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “कोणत्या रस्तयाने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडीलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
त्या वृध्द संदेष्ट्याने मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरु निघाला.
हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एका वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्याला विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा माणूस?” संदेष्टा यावर त्याने होकार दिला.
तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
पण हा देवाचा माणूस म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही
‘तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”‘
यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणी पुढे त्याने खोटेच सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
तेव्हा तो देवाचा माणूस वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
ते मेजावर बसलेले असताना परमेश्वर वृध्द संदेष्ट्याशी बोलला.
वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या माणासाला म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
या देवाच्या माणासाचे खाणे पिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा माणूस) निघाला.
परतीच्या वाटेवर एका सिहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारुन टाकले. देवाच्या माणसाचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या माणसाला फसवन आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा माणूस. त्याने परमेश्वराचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्याला मारायला सिंहाची योजना केली. असे होणार असे परमेश्वराने सांगितले होते.”
मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
वृध्द संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी याच्याशेजारीच विसावू द्या.
परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
राजा यराबममध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या माणसांची तो पुरोहित म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्याला पुरोहित बनता येई.
या पापामुळेच त्याच्या राज्याचा सर्वनाश ओढवला.
14
याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला.
तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते.
पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले. यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.
अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी.
पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काहीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन.
तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.”
अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे.
सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्यताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे.
परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल.
मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला.
आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला.
सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.
शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती.
यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या.
परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.
रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली.
त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या.
मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.
15
नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला.
अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.
आपल्या वडीलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ट नव्हता.
दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले.
दावीदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
अबीयाने आणखी जे काही केले त्याची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लगला.
यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला
आसाने यरुशलेमवर एक्के चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमची मुलगी.
आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या.
आपली आजी माका हिला आसाने राणी, होण्यापासून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून झाईल.”
राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल - बेथ माका, गालिल सरेवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले.
या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती ‘यहूदाच्या राजांच्या इतिहास’ या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.
यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामचा मुलगा नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.
बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फन परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
राजा यराबामने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामवर कोप झाला.
‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
पण परमेश्वराच्या मते जे गैर ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.
16
यानंतर परमेश्वर हनानीचा मुलगा येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
“तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामच्या वाटेनेच गेलास. इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झासास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराणचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
इस्राएलच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे.
बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा एला हा त्याच्यानंतर राज्य करु लागला.
तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.
यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्विसावे वर्ष चालू असताना एला हा राजा झाला. एला हा बाशाचा मुलगा तिरसामध्ये त्याने दोन पर्षे राज्य केले.
जिम्री हा एला राजाचा अधिकाही होता. एलच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.
जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची हत्या केली. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला
बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.
इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवसा राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. यानेही यराबामप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करुन उठला तेव्हाची हकीकतही या पुस्तकात आहे.
इस्राएलच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथचा मुलगा तिब्री याच्या बाजूचे असून त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला.
यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना अम्री इस्राएलचा राजा झाला. अम्रीने इस्राएलवर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दीडशे पौंड चांदी देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकीकत इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहाब हा राज्य करु लागला.
यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला.
शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
17
गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
“हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला.
तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
“सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, ‘मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, “तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्र्वास थांबला.
तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले.
एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखार घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा झाला तो जिवंत झाला.
एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”
ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-
18
लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “अहाब राजाला जाऊन भेट मी लौकरच पाऊस पाडणार आहे.”
तेव्हा एलीया अहाबला भेटायला गेला. शोमरोनमध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य होते.
अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. (ओबद्या परमेश्वराचा खरा अनुयायी होता.
एकदा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले. त्यांच्या अन्नपाण्याची तरतूद केली.)
अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल आपण सगळ्या ओहोळझऱ्यांना शोध घेऊ. आपली खेचरे, घोडी तग धरुन राहतील इतपत चारा शोधून काढू म्हणजे मग आपल्याला आपले पशू मारावे लागणार नाहीत.”
त्या दोघांनी मग आपासात पाहणी करायच्या प्रदेशाची वाटणी केली आणि सगळा प्रदेश पाण्यासाठी पायाखाली घातला. दोघेजण दोन वाटांनी गेले.
ओबद्याला वाटेत एलीया भेटला. ओबद्याने त्याला ओळखून अभिवादन केले. ओबद्या त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या राजाला जाऊन सांग.”
तेव्हा ओबद्या म्हणाला, “तुमचा ठावठिकाणा मी अहाबला सांगितला तर तो मला मारुनच टाकील. मी आपला काही अपराध केला नाही, मग तुम्ही माझ्या जिवावर का उठलात?
परमेश्वर देवाशपथ, राजा सर्वत्र तुमचा शोध घेत आहे. त्यासाठी त्याने गावोगाव माणसे पाठवली आहेत. जेथे जेथे तुम्ही सापडला नाहीत असे कळले तिथे तिथे त्याने तिथल्या राजांना एलीया इथे नाही असे शपथेवर सांगायला सांगितले.
आणि आता तुम्ही मला म्हणता, जा त्याला जाऊन सांग म्हणून!
तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे.
मी काय केले ते तुम्हाला माहीत आहे ना? ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारायला निघाली होती तेव्हा मी एकेका गुहेत पन्नास असे शंभर संदेष्ट्यांना दोन गुहांमध्ये लपवले होते. त्यांना खायला प्यायला दिले.
आणि आता तुम्ही मला राजाला आपली खबर द्यायला सांगत आहात. तो नि:संशय मला मारणार!”
यावर एलीया त्याला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आज मी राजासमोर उभा राहाणार आहे, असे मी वचन देतो.”
तेव्हा ओबद्या राजाकडे गेला. त्याने अहाब राजाला एलीयाचा ठावठिकाणा सांगितला. राजा एलीयाला भेटण्यासाठी आला.
अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, ‘इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”
एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही. ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरु झाला.
आता कर्मेल पर्वतावर समस्त इस्राएलींना जमायला सांग. बालच्या साडेचारशे संदेष्ट्यांनाही तेथे घेऊन ये. तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. ईजबेल राणीचा त्या संदेष्ट्यांना पाठिंबा आहे.”
तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबने कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
एलीया तेथे सर्वंसमोर आला आणि म्हणाला, “कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार? जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे. पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा.” लोक यावर काहीच बोलले नाहीत.
तेव्हा एलीया म्हणाला, “परमेश्वराचा संदेष्टा असा इथे मी अगदी एकटाच आहे. दुसरा कोणीही नाही. पण बालचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत.
तेव्हा दोन गोऱ्हे आणा. बालच्या संदेष्ट्यांनी त्यातला एक घ्यावा. त्याला मारुन त्याचे तुकडे - तुकडे कारवे. मग ते मांस लाकडे रचून त्यावर ठेवावे. विस्तव मात्र पेटवू नका. दुसऱ्या गोऱ्ह्याचे मी तसेच करीन. मीही विस्तव पेटवणार नाही.
तुम्ही बालचे संदेष्टे मिळून तुमच्या देवाची प्रार्थना करा. मी परमेश्वराची प्रार्थना करीन. ज्याच्या प्रार्थनेने विस्तव पेटेल तोच खरा देव.” ही कल्पना सर्व लोकांना पटली.
मग एलीया बालच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा तुम्हीच आधी सुरुवात करा. एक गोऱ्हा निवडा आणि आपल्या देवाची नावे घ्यायला लागा. फक्त विस्तव लावू नका.”
तेव्हा त्या संदेष्ट्यांनी एक गोऱ्हा घेतला आणि ते तयारीला लागले. दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली. “बाल आमच्या हाकेला ओ दे” अशी त्यांनी विनवणी केली. पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही. आपण रचलेल्या वेदीभोवती ते संदेष्टे नाचले तरी अग्नी काही प्रज्वलित झाला नाही.
दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरंच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादेवेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करुन त्याला उठवा.”
तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करुन घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले.
दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते अंगात आल्यासारखे वागत राहिले. पण काहीही घडले नाही बालकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
मग एलीया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.
त्याला बारा दगड मिळाले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबलाच परमेश्वराने ‘इस्राएल’ या नावाने संबोधले होते.
परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.
एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.
मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले.
वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
तेव्हा परमेश्वराने अग्री पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले.
सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
एलीया म्हणाला, “त्या बालच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसूट देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”
तेव्हा आहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यांत डोके घालून बसला.”
आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा.” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्याला पुन्हा जाऊन पाहायला सांगितले. असे सातवेळा झाले.
सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, “एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता.” तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल.”
पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला.
यावेळी एलीयात परमेश्वरी शक्ती संचारली. धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरुन घटृ खोचले आणि थेट इज्रेलपर्यंत तो अहाबच्या पुढे धावत गेला.
19
अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.”
एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झुडुपाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.”
एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहाणार नाही.”
तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्याबळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठे मोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण त्यातही परमेश्वर नव्हता.
धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण त्यातही परमेश्वर नव्हता. अग्री शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्याला ऐकू आली.
एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
निमशीचा मुलगा येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबल महोला इथला शाफाटाचा मुलगा अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.
हजाएल अनेक पापी माणसांना ठार करेल. त्याच्या तावडीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्याला अलीशा मारील.
एलीया, इस्राएलमध्ये तूच काही एकटा निष्ठावान नाहीस. तेही बरेच जणांना मारतील. आणि तरीही, बालपुढे कधी वाकले नाहीत असे सातजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बारा एकरांची जमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा अगदी शेवटच्या एकरात होता. एलीया अलीशा जवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला.
अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्याला म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे. मग मी तुझ्याबरोबर येतो.” एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा माझी काही हरकत नाही.”
अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांना जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाच्या तो मदतनीस झाला.
20
बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला.
संदेश असा होता, “बेन-हादाचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.”‘
यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन - हदाद हा विघ्र आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने - चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.” बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
तेव्हा बेन - हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”
अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”
राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.
त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पारभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.
तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले.
तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला.
यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”
राजा बेन - हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
“जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.
दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकंानी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.”
जे बाचवले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता.
त्याचे सेवक त्याला म्हणाले, ‘इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”
त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे.”‘ अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच आहे.”
बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.” अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.
एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.
मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला.
राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.
पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.” यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.
21
अहाब राजाचा राजवाडा शोमरोनमध्ये होता. त्याच्या महलाशेजारी एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ नावाच्या माणसाचा होता. नाबोथचा द्राक्षमळा
एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”
नाबोथ म्हणाला, “माझी जमीन मी देणार नाही. ती माझ्या कुटुंबाचे वतन आहे.”
तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथवर रागावलेला होता. ईज्रेलचा हा माणूस जे बोलला ते त्याला आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमीन मी तुम्हाला देणार नाहीं.) अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकराले.
अहाबची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली.” त्याला म्हणाली, “तुम्ही असे खिन्र का? तुम्ही जेवत का नाही?”
अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला. त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबची सही केली. अहाबचा शिक्का वापरुन पत्रांवर तो शिकृा उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांना एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.
नाबोथबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या माणसांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांनी ठेचून मारा.”
इज्रेलमधल्या वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) अशा मंडळींनी ही आज्ञा मानली.
त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्या दिवशी सर्व लोकांना सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले.
मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.
मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.
ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हाला हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता”
यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.
यावेळी परमेश्वर एलीयाशी बोलला. (एलीया हा तिश्बी येथील संदेष्टा) परमेश्वर म्हणाला,
“शोमरोनमधल्या राजा अहाबकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो त्या मळ्यावर कब्जा करायला तिथे गेला आहे.
अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”
तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.” एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.
तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन.
नबाटाचा मुलगा यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.’
शिवाय परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेल मध्ये कुत्री तुटून पडतील.
तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.”‘
अहाबने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला हे सर्व करायला लावले.
अहाबने आणखी एक पातक केले ते म्हणजे त्या लाकडी ठोकळ्यांची, मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.
एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला,
“अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
22
पुढील दोन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलचा राजा अहाब याला भेटायला गेला.
यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
आणि अहाब राजा यहोशाफाटला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथला अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.
पण प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
तेव्हा अहाबने संदष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. अहाबने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ येथे अरामी फौजेवर चालून जावे का? की काही काळ थांबावे?” संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”
पण यहोशाफाटने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
राजा अहाब म्हणाला, “तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा मुलगा मीखाया. पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते.” यहोशाफाट म्हणाला, “अहाब राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.
यावेळी दोन्ही राजे राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्या ठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
त्यांच्यापैकी एक कनानाचा मुलगा सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबला म्हणाला, “‘परमेश्वराचे म्हणणे, ‘ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस’ असे देवाचे म्हणणे आहे. म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
सिद्कीयाचे हे म्हणणे इतर सर्वच संदेष्ट्यांना पटले. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला. त्याला भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
पण मीखाया म्हणाला, “नाही, कादापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगीन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथला अरामच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
पण अहाब त्याला म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काम ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. कितीदा मी तुला तेच सांगू?”
तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
मग अहाब यहोशाफाटला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत.
देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथला अरामवर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’
परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईन.”‘
मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, “तेव्हा खरी हकीकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”
मग सिद्कीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाला त्याने एक थापड मारली. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
मीखायाला तुरुंगात घालायला त्यांना सांगा. त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”
मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
नंतर राजा अहाब आणि राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामच्या सैन्याशी लढायला गेले. गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
अहाब यहोशाफाटला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करुन युध्दाला सुरुवात केली.
अरामच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटला पाहिले. तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
हा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.
तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हाता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”
युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामच्या सैन्याकडे पाहात होता. त्याला एवढा रक्तरत्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.
राजा अहाबला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.
शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबचा रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नेमके घडले.
इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
अहाब मरण पावला व त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा.
यहोशाफाट वयाच्या पस्तिसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेममध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची मुलगी.
यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपल्या वडीलांप्रमाणेच होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
इस्राएलच्या राजाशी त्याने शांततेचा करार केला.
राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकीकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
धर्माच्या नावाखाली देह विक्रय करणाऱ्या स्त्रीपुरुषांना यहोशाफाटने प्रार्थनास्थळांमधून हाकलून लावले. यहोशाफाटचे वडील आसा राज्या करीत असताना हे लोक त्या ठिकाणी होते.
याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहात असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
इस्राएलचा राजा अहज्या याने यहोशाफाटला मदतीचा हात दिला. त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली. पण अहज्याची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटने नकार दिला.
यहोशाफाट मरण पावला त्या नंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम राज्य करु लागला.
अहज्या अहाबचा मुलगा होता. यहोशाफाटच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडील अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा मुलगा यरोबाम या सगळ्यांनी केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांना आणखी पापात लोटले.
आपल्या वडीलांप्रमाणेच अहज्यानेही बाल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबवर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.
- License
-
CC-0
Link to license
- Citation Suggestion for this Edition
- TextGrid Repository (2025). Christos Christodoulopoulos. 1 Kings (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7FB-1