1

मोशे परमेश्वशचा सेवक होता. नूनाचा पूत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला,
“माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्राएल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस.
तुम्हाला हा प्रदेश द्यायचे मी मोशेला कबूल केले आहे. तेव्हा ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले.
वाळवंट व लबानोन पासून फरात महानदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश तुमचाच होईल. तसेच येथपासून पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजेच मावळतीपर्यंतचा देश तुमच्या हद्दीत असेल.
मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.
“यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील.
नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगिकारलेल्या सर्व गोष्टीत सफल होशील.
खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला,
“छावाणीतून फिरुन लोकांना अत्र वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दीवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”
मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांच्या या लोकांशी यहोशवा बोलला. तो म्हणाला,
“परमेश्वराचा सेवक मोशे याने काय सांगितले त्याची आठवण करा परमेश्वर देव तुम्हाला विसाव्याचे स्थान देणार असल्याचे त्याने सांगितले. परमेश्वर तो देश तुम्हाला देणार आहे.
यार्देन नदीच्या पूर्वेकडील ही जमीन खरे तर परमेश्वराने तुम्हाला आधीच दिली आहे. तुमच्या बायकामुलांना व जनावरांना येथेच राहू द्या. पण सर्व योध्द्यांनी सशस्त्र होऊन, आपल्या बांधवांबरोबर यार्देन पलीकडे जावे. तुम्ही युध्दाची तयारी करून तो देश घ्यायला त्यांना मदत करावी.
तुम्हाला परमेश्वराने विसाव्याची जागा दिली आहेच. आता तुमच्या या बांधवानाही तो ती देईल. पण परमेश्वर देव देणार असलेली ती जमीन त्यांच्या ताब्यात येईपर्यंत त्यांच्या मदतीला थांबा. मग तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील या तुमच्या देशात परत येऊ शकता. परमेश्वराचा सेवक मोशे याने तो तुम्हाला दिला आहे.”
तेव्हा लोक म्हणाले. “तू आज्ञा केली आहेस त्याप्रमाणे आम्ही वागू. तू म्हणशील तेथे आम्ही जाऊ.
मोशेचे म्हणणे ऐकले तसेच तुझेही सर्व ऐकू परमेश्वर देवाकडे फक्त आम्ही एक मागतो. तो मोशे बरोबर राहिला तसाच तुझ्या बरोबरही राहो.
म्हणजे एखाद्याने तुझी आज्ञा पाळायला नकार दिला किंवा तुझ्याविरूध्द बंड केले तर तो मारला जाईल. तू मात्र बलवान व खंबीर राहा.”

2

नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले. त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.
यरीहोच्या राजाला कोणीतरी सांगितले की, आज रात्री इस्राएलमधून काही माणसे येथे आपल्या देशातील दुर्बलता शोधण्यासाठी व टेहेळणीसाठी आली आहेत.
तेव्हा राजाने रहाबला निरोप पाठवला “तुझ्याकडे वस्तीला आलेल्या त्या व्यक्तींना लपवू नकोस त्यांना बाहेर काढ. ते हेर म्हणून आलेले आहेत.”
तिने खरे तर त्या दोघांना लपवले होते. पण ती म्हणाली, “दोघेजण इथे आले होते खरे,पण कुठून आले हे मला माहीत नाही.
संध्याकाळी वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या सुमाराला ते निघून गेले. लगेच पाठलाग केलात तर ते सापडू शकतील.”
(पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)
त्यांच्या मागावर गेलेली माणसे वेशीच्या बाहेर पडली आणि लोकांनी वेशीचे दरवाजे लावून घेतले. त्या दोघांचा तपास करत ही माणसे यार्देन नदीपर्यंत गेली आणि नदी ओलांडायच्या सर्व जागांचा तपास करू लागली.
इकडे हे दोन हेर झोपायची तयारी करत होते, पण रहाब वर जाऊन
त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत.
कारण परमेश्वराने तुम्हाला कशी कशी मदत केली हे आम्ही ऐकले आहे. तुम्ही मिसरदेशामधून बाहेर पडताना त्याने तांबडचा समुद्राचे पाणी कसे आटवले हे आम्ही ऐकून आहोत. यार्देनच्या पूर्वेकडे असलेल्या त्या सीहोन आणि ओग या दोन अमोरी राजांचा नाश तुम्ही कसा केलात हे आमच्या कानावर आले.
हे सर्व ऐकून आम्ही फार घाबरून गेलो आहोत. आता तुमच्याशी लढण्याचे शौर्य आमच्या कोणातच नाही. कारण वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुमच्या परमेश्वर देवाची सत्ता आहे.
तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या.
माझे वडील, आई, बहीण, भावंडे आणी त्यांचे परिवार आम्हा सर्वांना तुम्ही जिवंत ठेवाल, जिवे मारणार नाही असे वचन द्या.”
याला ते तयार झाले. ते म्हणाले, “तुमच्या करता आम्ही प्राणही देऊ. कोणालाही आम्ही काय करत आहोत हे सांगू नका. परमेश्वराने आमचा देश आम्हाला दिला की आम्ही तुमच्याशी दयाळूपणाने वागू. आमच्यावर विश्वास ठेव.”
या स्त्रीचे घर तटबंदीच्या भिंतीतच बांधलेले होते. तेव्हा तिने दोराच्या साहाय्याने या दोघांना खिडकीतून खाली उतरवले.
मग ती म्हाणाली, “आता पश्चिमेला जाऊन टेकड्यांमध्ये तीन दिवस लपून राहा. म्हाणजे राजांच्या तपास करणाऱ्या माणसांच्या हाती तुम्ही लागणार नाही ती माणसे परतली की तुम्ही आपल्या वाटेने जा.”
यावर ते म्हणाले, “आम्ही तुला वचन दिले आहे पण एक गोष्ट कर. नाहीतर दिलेला शब्द पाळायाची जबाबदारी आमच्यावर नाही.
आमच्या सुटकेसाठी तू हा लाल दोर वापरला आहेस. आम्ही येथे परत येऊ तेव्हा खिडकीला हाच लाल दोर बांधून ठेव. तसेच तुझे आई-वडील, भावंडे वगैरे सर्व कुटुंबिय यांना या घरी एकत्र बोलाव.
या घरात राहणाऱ्या सर्वांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्यापैकी कोणालाही काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील. पण येथून कोणी बाहेर पडल्यास तो मारला जाऊ शकेल मग आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ती त्याचीच चूक असेल.
तुझ्याशी अम्ही हा करार करत आहोत. पण तू आम्ही काय करत आहोत हे कोणाला सांगितलेस तर आम्ही या करारातून मुक्त होऊ.”
यावर ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” मग तिने त्यांना निरोप दिला. ते बाहेर पडले त्यानंतर तिने तो लाल दोर खिडकीला बांधला.
ती माणसे बाहेर पडून टेकड्यांमध्ये गेली. तेथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला. त्यांचा तपास करणाऱ्यांनी सर्वत्र शोध केला. व तीन दिवसांनंतर तपास सोडून देऊन ते लोक नगरात परत आले.
मग हे दोन हेर टेकड्यांमधून बाहेर पडून नदी ओलांडून नूनाचापुत्र यहोशवाकडे आले. आपल्याला समजलेले सर्व काही त्यांनी यहोशवाच्या कानावर घातले.
व ते म्हणाले, “परमेश्वराने हा प्रदेश खरोखरच आपल्याला दिला आहे. तेथील सर्वांची गाळण उडाली आहे.”

3

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.
तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले.
त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा.
पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.”
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.”
मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. तेव्हा याजकांनी कोश उचलला व ते सर्वांपुढे चालत निघाले.
परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल.
याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा.”
यहोशवा मग इस्राएल लोकांना म्हणाला, “इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका.
देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी अमोरी व यबूसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील.
तुम्ही यार्देन पार करत असताना या परमेश्राच्या कराराचा कोश तुमच्या समोर असेल.
आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा.
याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्यापुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्याठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल.”
कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरूवात केली.
(सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.
आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम (सारातान जवळचे एक नगर) नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरीहोजवळ लोकांनी नदी पार केली.
तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.

4

सर्वजण नदी पार करून गेल्यानंतर परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
“आता बाराजणांची निवड कर. प्रत्येक कुळातुन एकेक घे.
याजक नदीत जेथे उभे होते त्या जागेवरचे बारा दगड त्यांना निवडायला सांग. ते बारा दगड उचलून, आज रात्री तुम्ही जेथे मुक्काम कराल तिथे ठेवा.”
यहोशवाने मग प्रत्येक कुळातून एक याप्रमाणे बाराजण निवडले. त्यांना जवळ बोला बोलावून
तो म्हाणाला, “तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एकएक दगड उचलून आणा. इस्राएल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या.
हा दगड म्हाणजे एक चिन्ह होय. “या दगडांचा अर्थ काय?’ असे पुढे तुमची मुले तुम्हाला विचारतील.
परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”
इस्राएल लोकांनी यहोशवाचे ऐकले. त्यांनी नदीच्या प्रवाहातून इस्राएलाच्या प्रत्येक कुळासाठी एक याप्रमाणे बारा दगड उचलून आणले. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली त्याप्रमाणे ते वागले. ते दगड वाहून आणून त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन ठेवले.
परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश घेऊन याजक ज्या ठिकाणी थांबले तेथे यहोशवाने बारा दगड ठेवले. ते आजही त्याठिकाणी आहेत.
लोकांनी आता काय करावे हे सांगण्याची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिली. मोशेनेही यहोशवाला याच गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन याजक नदीच्या मध्यभागी उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली.
लोक नदी ओलांडून गेल्यावर मग याजक पवित्र करारकोश घेऊन लोकांच्या पुढे गेले.
रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इर्साएल लोकांना मदत करणार होते.
सुमारे चाळीस हजार लोक युध्दाच्या तयारीने परमेश्वरासमोर यरीहोच्या मैदानाकडे चालून गेले.
सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.
याजक तो कोश घेऊन नदीच्या पात्रात उभे असताना परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
याजकांना नदीतून बाहेर यायला सांग.”
त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनबाहेर येण्याची आज्ञा केली.
यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी नदी ओलांडून लोकांनी यरीहोच्या पूर्वेकडील गिलगाल येथे तळ दिला.
नदीतून उचललेले बारा दगड त्यांनी आणले होतेच. ते यहोशवाने गिलगाल येथे रचून ठेवले.
यहोशवा म्हणाला, ““या दगडांचे महत्व काय? ते येथे कशासाठी?’ असे उद्या तुमची मुले तुम्हाला
विरतील.22तेव्हा त्यांना सांगा, “यार्देन नदीच्या कोरडचा पात्रातून इस्राएल लोक कसे आले त्याची ही आठवण आहे.
““तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता.’
आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”

5

तेव्हा इस्राएल लोक नदी ओलांडून येईपर्यंत परमेश्वराने यार्देनचे पात्र कोरडे ठेवले ही हकीकत यार्देनच्या पश्चिमेकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी तसेच भूमध्य समुद्राजवळील सर्व कनानी राजांनी ऐकली. आणि भीतीने त्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर इस्राएल लोकांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात उरले नाही.
यावेळी परमेश्वराने यहोशवाला सांगितले, “गारेच्या दगडाच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची सुंता कर.”
तेव्हा यहोशवाने गारेच्या सुऱ्या केल्या आणि गिबअथहा-अरालोथ येथे इस्राएल लोकांची सुंता केली.
यहोशवाने सर्वांची सुंता केल्यावर जखम भरून येईपर्यंत सर्वजण तेथेच राहिले.
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुम्ही मिसरमध्ये गुलाम होतात. आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असे. पण आज मी हा कलंक धुवून काढला आहे.” म्हणून यहोशवाने त्या जागेचे नामकरण “गिलगाल’ असे केले. आजही गिलगाल म्हणूनच तो भाग ओळखला जातो.
यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती.
वल्हांणाच्या दुसऱ्या दिवशी तेथे त्यांनी पिकलेल्या धान्याचा हुरडा खाल्ला. तसेच बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली.
दुसऱ्या दिवसापासून स्वर्गातील खास अन्न म्हणजेच मान्ना येणे बंद झाले. कनानातील भूमीत पिकलेले अन्न लोकांनी खाल्ल्यानंतर हे झाले त्यावेळेपासून इस्राएलांना स्वर्गातील खास अन्न मिळाले नाही.
यरीहोजवळ असताना यहोशवाने समोर पाहिले तर एक माणूस पुढे उभा असलेला त्याला दिसला. त्या माणसाच्या हातात तलवार होती. यहोशवाने पुढे होऊन त्याला विचारले, “तू आमच्या बाजूचा आहेस की शत्रूच्या गोटातील?”
त्यावर तो उत्तरला, “मी तुमचा शत्रू नव्हे. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती या नात्याने नुकताच येथे तुझ्यासमोर आलो आहे.” यावर यहोशवाने त्याला जमिनीवर डोके टेकवून आदरपूर्वक अभिवादन केले आणि विचारले, “स्वामीची काय आज्ञा आहे? मी आपला सेवक आहे.”
परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती म्हणाला, “तुझी पादत्राणे काढ कारण जेथे तू आत्ता उभा आहेस ती जागा पवित्र आहे.” यहोशवाने त्याचे ऐकले.

6

यरीहो शहराच्या वेशी बंद होत्या. इस्राएल लोक जवळआल्यामुळे नगरातील लोक घाबरले होते. कोणी नगराच्या बाहेर पडत नव्हते की आत येत नव्हते.
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुमच्या हातून मी यरीहो शहराचा पराभव करवीन. या शहराचा राजा आणि सर्व योध्दे याचा तुम्ही पराभव कराल.
रोज एकदा सर्व सैन्यासह शहराभोवती फेऱ्या घाला. असे सहा दिवस करा.
सात याजकांनी मेंढ्यांच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन पवित्र करार कोशापुढे चालत जायला सांग. सातव्या दिवशी शहराभोवती सात फेऱ्या घाला. सातव्या दिवशी याजकांना रणशिंगे फुकीत फेरी घालायला सांग.
याजक रणशिंगांचा एकच कर्णकटू ध्वनी करतील तेव्हा तो ध्वनी ऐकताच लोकांनाही मोठ्याने आरोव्व्या मारायला सांगावे. तसे केल्याने शहराची तटबंदी कोसळून पडेल आणि लोक सरळ आत घुसतील.”
तेव्हा नूनाचा पुत्र यहोशवाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला. “परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला. तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करार कोशापुढे चालायाला सांगा.”
मग तो लोकांना म्हणाला, “आता निघा आणि शहराला फेऱ्या घाला. सशस्त्र सैनिकांनी परमेश्वराच्या करार कोशापुढे चालावे.”
यहोशवाचे सांगून झाल्यावर सात याजकांनी परमेश्वरापुढे चालायला सुरूवात केली. आपली सात रणशिंगे फुंकीत ते चालले होते. परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहणारे याजक त्याच्यामागून चालले होते.
सशस्त्र सैन्य सर्व सतत वेळ याजकांच्या पुढे चालत होते आणि पवित्र करार कोशामागून पृष्ठरक्षक चालले होते आणि रणशिंगे फुंकली जात होती.
यहोशवने लोकांना युध्दगर्जना न करण्यास बजावले होते. तो म्हणाला, “आरडा ओरडा करू नका. मी सांगेपर्यंत एक चकार शब्दही तोडातून काढू नका. सांगेन तेव्हाच गर्जना करा.”
मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोश घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली. नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली.
यहोशवा पहाटे उठला. याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.
सात याजक सात रणशिंगे घेऊन सज्ज झाले. परमेश्वराच्या पवित्र करारकोशापुढे रणशिंगे वाजवत ते पुढे चालू लागले. सशस्त्रधारी सैनिक त्यांच्यापुढून चालू लागले. परमेश्वराच्या पवित्र कोशामागून पृष्ठ संरक्षक निघाले सर्व सतत वेळ रणशिंगे फुंकली जात होती.
दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली. मग ते छावणीत परतले. असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले.
सातव्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी नगराला सात वेळा फेऱ्या घातल्या. त्यांनी सर्व पूर्वी प्रमाणेच केले, फक्त फेऱ्या तेवढ्या सात घातल्या.
सातव्यांदा नगराभोवती फेरी घालताना याजकांनी रणशिंगे वाजवली. ती ऐकताच यहोशवाने आज्ञा केली , “गर्जना करा हे शहर परमेश्वराने तुम्हाला दिले आहे.
हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे. फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्कालावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका.
बाकी सर्व गोष्टींचा नाश करा. लक्षात ठेवा त्यातील काहीही घेऊ नका. तेथील एखादी वस्तू घेतलीत आणि तळावर आणलीत तर तुमचा नाश होईल. सर्व इस्राएल लोकांचाही त्यामुळे नाश होईल.
सोन्याचांदीच्या तसेच तांब्या-लोखंडाच्या सर्व वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्या परमेश्वराच्या भांडारात जमा केल्या पहिजेत.”
याजकांनी रणाशिंगे वाजवली. लोकांनी ती ऐकून मोठ्याने जयघोष केला. त्याने तटबंदी कोसळली आणि इस्राएल लोक सरळ नगरात घुसले. त्यांनी नगराचा पाडाव केला.
लोकांनी शहरातील सर्व गोष्टींचा नाश केला. तरूण आणि वृध्द पुरूष, तरूण आणि वृध्द स्त्रिया, जनावरे, शेळ्या मेंढ्या, गाढवे अशा सर्व सजीवांची त्यांनी हत्या केली.”
यहोशवा त्या दोन हेरांशी बोलला. तो त्यांना म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्या घरातल्यांना घेऊन या. तिला तुम्ही तसे वचन दिले आहे तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढा.”
तेव्हा ते दोन हेर रहाब कडे गेले आणि त्यांनी तिला तसेच तिचे आईवडील भावंडे, घरातील इतर माणसे यांना बाहेर काढले इस्राएल लोकांच्या छावणीबाहेर या सर्वांना त्यांनी सुरक्षित जागी ठेवले.
मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे व लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या.
यहोशवाने रहाब तिचे कुटुंबीय व तिच्या बरोबर असलेली इतर माणसे यांना संरक्षण दिले. कारण यरीहोला त्याने पाठवलेल्या दोन हेरांना तिने मदत केली होती. रहाबच्या कुटुंबाचे वास्तव्य आजही इस्राएल लोकांमध्ये आहे.
यावेळी यहोशवाने एक महत्वाची शपथ घातली. तो म्हणाला: “जो कोणी यरीहो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करील त्याला परमेश्वराचा शाप भोगावा लागेल. जो या नगराची पायाभरणी करेल त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावेल. जो याच्या वेशी उभारील त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
याप्रमाणे परमेश्वराने यहोशवाला साथ दिली आणि यहोशवाची सर्व देशात ख्याती पसरली.

7

पण इस्राएल लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. यहूदाच्या वंशातील झिम्रीचा नातू व कर्मीचा मुलगा आखान याने काही वस्तू स्वत:साठी ठेवून घेतल्या. त्या नष्ट करून टाकल्या नाहीत. तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाला.
यरीहोचा पाडाव केल्यावर यहोशवाने काही माणसे आय येथे पाठवली. आय नगर बेथेलच्या पूर्वेला बेथ-आवेन जवळ होते. तेथे जाऊन त्या प्रांतातील कच्चे दुवे हेरायला त्याने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे हेर तिकडे गेले.
नंतर ते यहोशवाकडे परतून आले. ते म्हणाले, “आय हा दुर्बल प्रांत आहे. तेव्हा सर्वांनी तेथे जाण्याची गरज नाही दोन-तीन हजार माणसे तेथे लढायला पुरेशी होतील. सर्व सैन्य लागणार नाही. कारण ते लोक थोडे आहेत.”
यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.
यहोशवा म्हणाला, “हे प्रभू परमेश्वारा आम्हाला तू यार्देन पार करून आणलेस. अमोऱ्यांच्या हातून आमाचा नाश व्हायला का आम्हाला येथपर्यंत आणलेस? नदीच्या त्या तीरावरच आम्ही सुखासमाधानाने राहिलो असतो.
परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे.
“आता कनानी तसेच या देशातील इतर लोक हे ऐकतील. आणि आमच्यावर हल्ला करून आम्हाला ठार करतील. तेव्हा आपले नाव राखण्यासाठी तू काय करणार आहेस?”
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तू असा जमिनीवर पालथा का पडला आहेस? ऊठ उभा राहा.
इस्राएल लोकांनी पाप केले आहे. त्यांनी आज्ञाभंग करून माझ्याशी केलेला करार मोडला आहे. मी नष्ट करून टाकायाला सांगितलेल्या वस्तूपैकी काही त्यांनी ठेवून घेतल्या आहेत. त्यांनी चोरी केली आहे. खोटे बोलून त्यांनी त्या स्वत:साठी ठेवल्या आहेत.
म्हणून इस्राएलाच्या सैन्याने युध्दात पाठ फिरवून पळ काढला. त्यांच्या हातून चूक घडल्यामुळे ते असे वागले. त्यांचा संहारच केला पाहिजे. मी आता तुम्हाला मदत करणार नाही. मी सांगितले ते सर्व नष्ट करून टाकल्याशिवाय मी तुम्हाला साथ देणार नाही.
आता जा आणि लोकांना शुध्द कर त्यांना सांग “शुध्द व्हा. उद्याची तयारी करा. नष्ट करायला सांगितलेल्या वस्तू काही जणांनी ठेवून घेतल्या आहेत असे इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे आहे. त्या वस्तूंचा त्याग केल्याखेरीज तुम्हाला शत्रूचा पराभव करता येणार नाही.”
“उद्या सकाळी सर्वजण परमेश्वरासमोर उभे राहा. सर्व वंशांच्या लोकांनी परमेश्वरासमोर यावे. मग परमेश्वर एका वंशातील लोकांना निवडील. तेव्हा त्यांनीच फक्त पुढे यावे त्यातील एका कुळाची निवड करील. तेव्हा फक्त त्या कुळातील लोकांनी परमेश्वराला सामोरे जावे. मग त्या कुळातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वर दृष्टिक्षेप टाकील आणि एका कुटुंबाला निवडील. मग त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे परमेश्वर पाहील.
नष्ट करून टाकायला पाहिजे होती अशी वस्तू त्याच्याकडे सापडल्यास तो पकडला जाईल. तेव्हा त्या माणसाला जाळून टाकावे. तसेच त्यच्याकडे असलेले सर्व काही त्याच्याबरोबर आगीत टाकावे. या माणसाने परमेश्वराचा करार मोडून इस्राएल लोकांना कलंक लावणारी गोष्ट केली आहे.”’
दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना परमेश्वरासमोर आणले. सर्व वंशांचे लोक परमेश्वरापुढे उभे राहिले. परमेश्वराने यहूदाच्या वंशाची निवड केली.
तेव्हा यहूदाचे एकेक कूळ परमेश्वरापुढे हजर झाले. त्यातून परमेश्वराने जेरहाचे कूळ निवडले. जेरहाच्या कुळातील सर्व कुटुंबे परमेश्वरापुढे आली तेव्हा झिम्रीचे कुटुंब पकडले गेले.
मग यहोशवाने या कुटुंबातील सर्व पुरूषांना परमेश्वरापुढे हजर व्हायला सांगितले. परमेश्वराने कर्मीचा मुलगा आखान याला पकडले (कर्मी झिम्रीचा मुलगा झिम्री जेरहाचा)
मग यहोशवा आखानला म्हणाला, “मुला, आता प्रार्थना कर. इस्राएलांच्या परमेश्वर देवाचा मान राखून आपली पापे त्याच्यापुढे कबूल कर. आता काहीही लपवून न ठेवता तू काय केलेस ते मला सांग.”
आखान म्हणाला, “हे खरे आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाविरूध्द वागून मी पाप केले आहे. मी केले ते असे.
यरीहो नगर आणि त्यातील सर्व मालमात्ता काबीज केल्यावर मी एक सुंदर शिनारी (बबिलोनियन) अंगरखा, अंदाजे पाच पौंड चांदी आणि जवळापास एक पौड सोन्याची वीट पाहिली. त्याचा मला मोह पडला त्या वस्तू मी घेतल्या. माझ्या तंबूत या गोष्टी जमिनीत पुरून ठेवलेल्या तुम्हाला सापडतील. चांदी अंगरख्याखाली दडवलेली आहे.”
तेव्हा यहोशवाने काही माणसे तंबूकडे पाठवली. ती धावतच तेथे गेली आणि त्यांना तंबूत लपवून ठेवलेल्या या वस्तू मिळाल्या. चांदी अंगरख्याच्या खाली होती.
त्या माणसांनी या वस्तू तेथून बाहेर काढल्या यहोशवा व सर्व इस्राएल लोक ह्यांच्यापर्यंत आणून परमेश्वरापुढे ठेवल्या.
नंतर यहोशवा व समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले.
तेव्हा यहोशवा म्हणाला, “तुझ्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. पण आता परमेश्वरच तुला संकटात टाकील” मग सर्व लोकांनी आखान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर ते मरेपर्यंत दगडांचा मारा केला. मग त्यांना सर्व चीजवस्तूसह जाळून टाकले.
त्यानंतर आखानाच्या जळून गेलेल्या शरीरावर त्यांनी दगडांची रास रचली. हे दगड आज ही तेथे आहेत. अशा तऱ्हेने परमेश्वराने आखानावर आपत्ती आणली म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव आखोर ची दरी असे पडले. यानतर परमेश्वराचा कोप झाला नाही.

8

मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन.
यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वत:साठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”
तेव्हा यहोशवाने सर्व सैन्यासह आय नगराकडे मोहरा वळवला. आपल्या सैन्यातील तीस हजार उत्कृष्ट योध्द्यांची निवड केली व त्यांना रातोरात पाठवले.
त्यांना आज्ञा केली, “मी काय सांगतो ते सक्षपूर्वक ऐका. नगराच्या मागील बाजूस दबा धरून बसा. हल्ल्याच्या योग्य वेळेची वाट पाहा. फार लांब जाऊ नका. टेहेळणी करत तयारीत राहा.
नगरावर हल्ला करायला लोकांना घेऊन मी पुढे जाईन. नगरातील लोक आमचा सामना करायला समोर येतील. तेव्हा आम्ही माघार घेऊन मागील वेळेप्रमाणे पळत सुटू.
हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू.
तेव्हा आपल्या लपण्याच्या जागा सोडून बाहेर या आणि नगराचा ताबा घ्या. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जिंकण्याचे सामर्थ्य देईल.
“परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागा. माझ्याकडे लक्ष असू द्या नगरावर हल्ला करण्याची मी आज्ञा देईन. तेव्हा नगर काबीज करून त्याला आग लावा.”
मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व लोकांना एकत्र आणले यहोशवा व इस्राएलाच्या पुढाऱ्यांनी या लोकांसह आय कडे मोर्चा वळवला.
सर्व सैन्य आयवर चाल करून गेले. नगराजवळ पोचल्यावर त्यांनी उत्तरेस तळ दिला. हे सैन्य आणि आय यांच्यामध्ये एक दरी होती.
यहोशवाने मग जवळजवक पाच हजार माणसांना आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या मध्ये दबा धरून बसण्यास पाठवले.
अशाप्रकारे त्याने आपल्या सैन्याला सज्ज ठेवले होते. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला होती. इतर माणसे परिचमेला दबा धरून बसली होती. रात्री यहोशवा त्या दरीत राहिला.
आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
आयच्या सैन्यापुढे आपली पीछेहाट होते आहे असे यहोशवा व इस्राएलच्या लोकांनी भासवले आणि ते वाळवंटाच्या दिशेला पूर्वेकडे पळत सुटले.
आयच्या सैन्याने आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. नगरातील सर्व लोक यात सामील झाले नगरतील सगळे नगर सोडून बाहेर पडले.
आय आणि बेथेल मधील एकूणएक माणसे इस्राएल सैन्याच्या पाठलागावर गेली. नगर मोकळे झाले. त्याचे रक्षण करायला कोणी उरला नाही.
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आता तुझ्या हातातील शस्त्र आय नगरावर उगार. मी हे नगर तुझ्या हवाली करत आहे.” तेव्हा यहोशवाने आयवर आपली बरची उगारली.
दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.
आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली.
आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने व इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला.
ते पाहून लपून राहिलेली आणखी माणसे त्यांच्यावर चाल करू आली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी चाल करून येऊन इस्राएलांनी आयच्या लोकांची चांगलीच कोंडी केली. त्यांनी आयचा पराभव केला. आय वासियांपैकी एकहीजण जिवंत राहिला नाही की निसटून जाऊ शकला नाही.
आयच्या राजाला मात्र जीवदान मिळाले. त्याला पकडून यहोशवापुढे हजार करण्यात आले.
या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली.
अशाप्रकारे आय मधील सर्वजण त्यादिवशी मरण पावले. बायकापुरूष मिळून ती बारा हजार माणसे होती.
हे नगर उध्वस्त करायचा इशारा म्हणून यहोशवाने आपली बरची आयवर उगारलेली होती आणि सर्वांचा संहार होईपर्यंत त्याने ती तशीच उगारलेली ठेवली.
शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमता इस्राएल लोकांनी स्वत:साठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.
यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे.
आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.
मग यहोशवाने एबाल पर्वतावर इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवासाठी वेदी बांधली.
परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.
त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली.
यावेळी सर्व वडीलधारी माणसे, अंमलदार, न्यायाधीश व इतर इस्राएल लोक पवित्र करारकोशाभोवती उभे होते. हा परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहून नेणाऱ्या लेवी याजकांसमोर ते उभे होते. उपस्थितात मूळचे इस्राएल लोक तसेच परकेही होते. त्यांच्यापैकी निम्मे एबाल पर्वतासमोर तर निम्मे गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. परमेश्वरचा सेवक मोशे याने आशीर्वादाच्या वाचनासाठी त्यांना तसे उभे राहायला सांगितले होते.
मग यहोशवाने नियमशास्त्रातील आशीर्वचने आणि शापवाणी वाचून दाखवली त्यात एका शब्दाचाही फेरफार केला नाही.
स्त्रिया, मुले, परकीय यांच्यासह सर्व इस्राएल लोर तेथे हजर होते. त्यांना मोशेच्या सर्व आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या.

9

यार्देन नदीच्या पश्चिमेकडील हित्ती, अमोरी, कनानी, हिव्वी तसेच यबूसी लोकांच्या राजांनी या आयवरील चढाई विषयी ऐकले. या लोकांची राज्ये डोंगराळ भागात तसेच मैदानी प्रदेशात थेट लबानोनपर्यंत भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने पसरली होती.
हे सर्व राजे एक झाले आणि त्यांनी यहोशवा व इस्राएल लोक यांच्यावर चढाई करण्याचा बेत केला.
यरीहो आणि आय या नगरांचा पाडाव यहोशवाने कसा केला हे गिबोनाच्या लोकांनी ऐकले.
तेव्हा त्यांनी इस्राएलांना चकवण्याचा डाव आखला. त्यांची युक्ती अशी होती. प्रथम त्यांनी द्राक्षरसाचे जुने, झिजलेले. चामडी बुधले घेतले आणि ते गाढवाच्या पाठीवर लादले. आपण फार दुरून आलो आहोत असे भासवायला जुनी गोणपाटेही गाढवांवर लादली.
स्वत: झिजलेले जोडे आणि फाटकेतुटके कपडे घातले. विटलेल्या वाळलेल्या भाकरीची शिदोरी बांधून घेतली. अशाप्रकारे ते फार दुरून मजल दरमजल करत आल्यासारखे दिसू लागडे.
मग ते गिलगाल जवळच्या इस्राएल लोकांच्या छावणीपाशी आले. तेथे जाऊन ते यहोशवा आणि इस्राएल लोकांना म्हणाले, cआम्ही दूर देशाहून आलो आहोत आणि आम्हाला तुमच्याशी शांततेच्या कराराची बोलणी करायची आहेत.”
त्यावर इस्राएल लोक या हिव्वी लोकांना म्हणाले. “कदाचित् तुम्ही खोटे बोलत असाल. आमच्या जवळपासच राहणारे असाल. तुम्ही कोण कुठले याची खातरजमा केल्याखेरीच आम्ही तुमच्याशी शांतीचा करार करणर नाही.”
तेव्हा यहोशवाला हिव्वी म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत” पण यहोशवाने विचारले, “तुम्ही कोण? कोठून आलात?”
हेशबोनचा राजा सीहोन आणि अष्टारोथ मधील बाशानचा राजा ओग, या यार्देनच्या पूर्वेकडील अमोऱ्यांच्या दोन राजांचा त्याने पराभव केला हेही आम्हाला माहीत आहे.
तेव्हा आमच्या प्रदेशातील रहिवासी आणि आमचे पुढारी म्हणाले, “प्रवासासाठी पुरेशी शिदोरी घ्या आणि इस्राएल लोकांची भेट घ्या त्यांना म्हणावे, “आम्ही तुमचे दास असून आमच्याबरोबर शांततेचा करार करा.”
“ही आमची भाकर बघा. आम्ही घरून निघालो तेव्हा ती ताजी आणि नरम होती. आता कशी विटलेली आणि वाळून गेली आहे ते तुम्ही बघतच आहा.
“हे द्राक्षारसाचे बुधले पाहा. निघालो तेव्हा ते नवेकोरे आणि द्राक्षारसाचे बुधले पाहा. निघालो तेव्हा ते नवेकोरे आणि द्राक्षारसाने भरलेले होते. आता ते तडकलेले आणि जुने झाले आहेत. पाहा आमचे कपडे आणि जोडे एकढया लांबच्या प्रवासाने त्यांची कशी वाट लागली आहे.”
हे लोक सांगत आहेत त्याचा खरेपणा पडताळून बघण्यासाठी इस्राएल लोकांनी भाकर चाखून बधितली पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.
यहोशवाने त्यांच्याशी शांततेचा करार करण्याचे मान्य केले. त्यांना जीवदान दिले. यहोशवाने दिलेल्या वचनाशी इस्राएलांची वडीलधारी मंडळीही सहमत झाली.
ही माणसे आपल्या छावणीजवळच राहात असल्याचा इस्राएल लोकांना तीन दिवसांनंतर पत्ता लागला.
तेव्हा इस्राएल लोक या लोकांच्या नगराला निघाले. गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम या त्यांच्या नगरांस ते तिसन्या दिवशी पोचले.
पण या लोकांशी शांततेचा करार केलेला असल्यामुळे इस्राएली सैन्याने या नगरावर हल्ला केला नाही. तसे त्यांनी आपल्या परमेश्वर देवासमोर या लोकांना वचन दिले होते. ज्या वडीलधाऱ्या पंच मंडळीनी हा करार केला त्यांच्याविरूध्द इतर लोकांनी कुरकूर केली.
पण पंच म्हणाले, “आम्ही खुद्द इस्राएलाच्या परमेश्वर देवासमोर त्यांना आपला शब्द दिला आहे. तेव्हा आता त्यांच्याविरूध्द लढता येणार नाही.
आता आपल्याला त्यांना धक्का लावता येणार नाही त्यांना जीवदान दिले पाहिजे. आता त्यांना इजा केल्यास, त्यांना आपण दिलेला शब्द मोडला म्हणून देवाचा आपल्यावर कोप होईल.
त्यांना जिवंत राहू द्या, पण आपले दास म्हणून ते आपले लाकूडतोडे. पाणक्ये म्हणून राहतील.” अशातऱ्हेने पंचांनी त्या लोकांना दिलेले शांततेचे अभिवचन पाळले.
यहोशवाने गिबोनच्या लोकांना बोलावले व तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आमच्याशी खोटे का बोललात? तुमचा प्रदेश तर आमच्या छावणीच्या जवळच आहे. पण आपण दूरदेशाहून आल्याचे तुम्ही आम्हाला सांगितलेत.
“तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”
यावर गिबोनचे लोक म्हणाले, “तुम्ही आम्हाला ठार कराल या भीतीने आम्ही खोटे बोललो. आम्ही असे ऐकले की हा देश तुम्हाला द्यायची परमेश्वराने मोशे या आपल्या सेवकाला आज्ञा केली आहे, तसेच येथे राहाणाऱ्या सर्वांना ठार करायला ही देवाने तुम्हाला सांगितले आहे. म्हणून आम्ही खोटे बोललो.
आता आम्ही तुमचे दास आहोत. आमच्याबाबतीत तुम्हाला योग्य वाटेल ते करा.”
अशाप्रकारे गिबोनचे लोक दास झाले पण यहोशवाने त्यांना जीवदान दिले. इस्राएल लोकांपासून त्यांना वाचवले.
यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.

10

त्यावेळी यरूशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आय चा पाडाव ते पूर्ण उध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरीहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाश्यांनी इस्राएलांशी शांतीचा करार केल्याचे ही त्याच्या कानावर आले. आणि ते तर यरूशलेमच्या जवळच होते.
तेव्हा अदोनीसदेक व त्याचे लोक फार घाबरले. कारण गिबोन काही आयसारखे छोटे नगर नव्हते. ते एखाद्या राजधानीचे असावे तसे मोठे शहर होते. तेथील लोक चांगले लढवय्ये होते. साहाजिकच राजा अदोनीसदेक घाबरला.
त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
“गिबोन ने यहोशवा व इस्राएल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे. तेव्हा गिबोनवर हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा,” अशी मदतीची याचना त्याने केली.
तेव्हा यरूशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा तसेच एग्लोनचा राजा या अमोऱ्यांच्या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले. सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली.
ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
तेव्हा यहोशवा आपल्या सर्व सैन्यानिशी गिलगालमधून बाहेर पडला. त्याच्याबरोबर खंदे लढवय्ये होते.
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्याचां पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”
यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोंचले. यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती. म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकिक झाले.
परमेश्वराने इस्राएलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली. इस्राएल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोनपासून बेथ-होरोनच्या वाटेपर्यंत इस्राएलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला, आणि अजेका व मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले.
इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.
इस्राएल लोकांच्या हातून परमेश्वराने त्यादिवशी अमोऱ्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्राएल लोकांसमोर उभा राहून म्हणाला, “हे सूर्या गिबोनावर स्थिर राहा. हे चंद्रा, स्थिर राहा तू. अयालोनच्या खोऱ्यावर.”
तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला, चंद्र ही थांबून राहिला. याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे. सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता.
असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर ही कधी घडले नाही. परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले. परमेश्वर खरोखरच त्यादिवशी इस्राएलच्या बाजूने लढत होता.
यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला.
भर युध्दात त्या पाचही राजांनी पळ काढून मक्केदा जवळच्या गुहेत आसरा शोधला होता.
पण कोणी तरी त्यांना तेथे लपलेले पाहिले. ते यहोशवाच्या कानावर आले.
तो म्हणाला, “गुहेचे तोंड प्रचंड दगड लावून बंद करा. तिथे माणसांचा पाहारा बसवा
पण तुम्ही स्वत:तेथे थांबून राहू नका. शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्यावर मागून हल्ला करत राहा. शत्रूला त्यांच्या नगरात परतू देऊ नका. कारण तुमच्या परमेश्वर देवाने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे.”
यहोशवा व इस्राएल लोक यांनी शत्रूला ठार केले पण त्यातील काही कसेबसे सुटून नगरात जाऊन लपले. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.
लढाई थांबल्यावर सर्व लोक मक्केदा येथे यहोशवाकडे परत आले. पण इस्राएल लोकांविरुध्द एकही शब्द काढण्याचे धैर्य कोणाचे झाले नाही.
यहोशवा म्हणाला, “आता ते गुहेच्या तोंडावरचे दगड हलवून त्या राजांना माझ्याकडे आणा.”
तेव्हा यरुशलेम. हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोनच्या त्या राजांना यहोशवाच्या माणसांनी बाहेर काढले.
व यहोशवासमोर हजर केले. यहोशवाने आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावले. आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तो म्हणाला “पुढे व्हा आणि या राजांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा अधिकाऱ्यांना जवळ येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
यहोशवा आपल्या लोकांना म्हणाला, “खबीर राहा आणि हिंमत धरा, घाबरु नका इथून पुढे तुम्ही ज्यांच्याशी लढाल त्या शत्रूचे परमेश्वर काय करुन टाकील ते मी तुम्हाला दाखवतो आहे.”
मग यहोशवाने त्या पाच राजांना ठार केले. त्यांची प्रेते पाच झाडांना लटकावली. संध्याकाळपर्यंत ती तशीच लटकत ठेवली.
सूर्यास्ताच्या वेळी त्याने ती झाडावरुन उतरविण्यास सांगितली. ज्या गुहेत ते राजे लपले होते तिथे ती यहोशवाच्या माणसांनी टाकून दिली आणि गुहेचे तोंड मोठमोठे दगड लोटून बंद केले. ती प्रेते त्या गुहेत आजतागायत आहेत.
त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.
मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले व त्या नगरावर त्यांनी हल्ला केला.
परमेश्वराच्या कृपेने, हे नगर आणि त्याचा राजा यांचा इस्राएल लोकांनी पराभव केला. तेथील सर्वजण प्राणाला मुकले. कोणीही त्यातून जिवंत राहिला नाही. आणि यरीहोच्या राजाचे केले तसेच इस्राएल लोकांनी या राजाचेही केले.
मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक लिब्ना येथून निघून लाखीशला आले. त्या नगराभोवती वेढा देऊन मग त्यांनी चढाई केली.
परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली.
गेजेरचा राजा होराम लाखीशच्या मदतीला आला होता पण यहोशवाने त्याच्या सैन्यासही पराभूत केले. त्यांच्यापैकीही कोणी वाचू शकला नाही.
मग लाखीशहून निघून सर्व इस्राएल लोक व यहोशवा एग्लोन येथे आले. एग्लोन भोवती तळ देऊन त्यांनी त्या शहरावर हल्ला केला.
त्याच दिवशी त्यांनी ते शहर काबीज करून सर्व लोकांना ठार केले. लाखीशमध्ये जसे झाले तसेच येथेही झाले.
एग्लोनहून ते पुढे हेब्रोनला गेले व हेब्रोनवर चढाई केली.
हेब्रोन शहर आणि त्याच्या भोवतालची छोटी गावे त्यांनी काबीज केली. नगरातील सर्वांचा इस्राएल लोकांनी संहार केला. एकूण एक लोक प्राणाला मुकले. एग्लोन प्रमाणेच येथेही त्यांनी शहर उध्वस्त केले व लोकांना ठार केले.
मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली.
3त्यांनी ते नगर व त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे व तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर व त्याच्या राजाचीही केली.
अशाप्रकारे यहोशवाने डोंगराळ प्रदेश नेगेव. पश्चिमेकडील व पूर्वेकडील डोंगर उताराचा भाग येथील सर्व शहरांचा व राजांचा धुव्वा उडवला. इस्राएलच्या परमेश्वर देवाने यहोशवाला सर्व लोकांचा संहार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे यहोशवाने कोणाला ही जिवंत ठेवले नाही.
कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंत सर्व नगरे यहोशवारने काबीज केली. मिसरमधील गोशेन प्रांतापासून गिबोन पर्यंतच्या कक्षेतील सर्व नगरे जिंकून घेतली.
एकाच मोहिमेत सर्व राजे व सर्व नगरे काबीज केली. इस्राएलचा देव परमेश्वर इस्राएलच्या बाजूने लढत असल्यामुळेच यहोशवाने हे केले.
त्यांनंतर यहोशवा सर्व इस्राएलसह आपल्या गिलगालच्या छावणीत परतला.

11

या सर्व घटना हासोराचा राजा याबीन याने ऐकल्या. तेव्हा त्याने अनेक राजांच्या फौजा एकत्र आणण्याचे ठरवले. मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचा राजा, अक्षाफाचा राजा.
तसेच उत्तरेत डोंगराळ प्रदेशात व वाळवंटी भागात राज्य करीत असलेले राजे यांना याबीनने त्याप्रमाणे कळवले. किन्नेरोथ, नेगेव येथील व पश्चिमेकडील डोंगर उत्तरणीच्या भागातील राजांनाही निरोप पाठवले. पश्चिमेकडील नाफोत दोर येथील राजाला तसेच
पूर्व व पश्चिमेच्या कनानी लोकांच्या राजांनाही कळवले. अमोरी, हित्ती, परिज्जी व डेंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना तसेच हर्मोन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मिस्पा जवळील हिव्वी लोकांनाही खबर दिली.
तेव्हा या सर्व राजांच्या फौजा एकत्र आल्या. अगणित योध्दे जमा झाले. घोडे, रथ बहुसंख्य होते. ती एक अतिविशल सेना होती असंख्य माणसांचा समुदाय समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांसारखा पसरला होता.
हे सर्व राजे मेरोम या लहानशा नदीजवळ भेटले. त्या सर्वांनी तेथेच तळ ठोकला आणि ते इस्राएलविरुध्द लढाईची आखणी करू लागले.
तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याला घाबरू नको. मी तुमच्याहातून त्यांचा पराभव करवीन. उद्या या वेळेपर्यंत तुम्ही त्या सर्वांचा संहार केलेला असेल. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडा व रथांना आगी लावा.”
यहोशवा व त्याचे सैन्य यांनी शत्रूला विस्मयचकित केले. मेरोम नदीपाशीच त्यांनी शत्रूवर हल्ला केला.
इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पराभव केला परमेश्वरानेच त्यांना हे बळ दिले. इस्राएलने त्यांचा सीदोन महानगरापर्यंत तसेच मिस्त्रपोथ-माईमापर्यंत व पूर्वेकडील मिस्पाच्या खोऱ्यापर्यंत पाठलाग केला. शत्रुसैन्यातील सर्वांचा संहार होईपर्यंत इस्राएल लोकांनी लढा दिला.
परमेश्वराने सांगितले होते तसेच यहोशवाने केले. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडले व रथ अगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.
मग मागे वळून यहोशवाने हासोर घेतले. हासोरच्या राजाला त्याने ठार केले. (इस्राएलविरुध्द लढणाऱ्या सर्व राज्यांचे नेतृत्व हासोरने केले होते.)
इस्राएल सैन्याने या नगरातील सर्वांना ठार केले. सर्वांचा समूळनाश केला. जिवंतपणाची खूण म्हणून शिल्लक ठेवली नाही. नंतर नगराला आग लावली.
यहोशवाने ही सर्व नगरे घेतली तेथील सर्व राजांना ठार केले. या नगरांमधील सर्वच्या सर्व गोष्टींचा विध्वंस केला. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे केले.
पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले व त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले.
या नगरांमध्थे मिळालेली लूट इस्राएल लोकांनी स्वत:करता ठेवली. तसेच तेथील जनावरेही घेतली. पण तेथील लोकांना मारले कोणालाही जिवंत ठेवले नाही.
परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.
अशाप्रकारे यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशातील सर्व लोकांचा पराभव केला. डोंगराळ प्रदेश, नेगेव, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमेकडील डोंगरपायथा, यार्देनचे खोरे. इस्राएलचा व त्याच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश यावर त्याने ताबा मिळवला.
सेईर जवळच्या हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनच्या खोऱ्यातील बालगाद पर्यंतचा सर्व प्रदेशही यहोशवाने हस्तगत केला. तेथील सर्व सजांना बंदी करून त्यांना ठार केले.
अनेक दिवस या राजांशी त्याने हा लढा दिला होता.
या सर्व प्रदेशातील फक्त एकाच नगराने इस्राएल लोकांशी शांततेचा करार केला. ते म्हणजे गिबोन मधील हिव्वी. इतर सर्व नगरांचा युध्दात पाडाव झाला.
आपण समर्थ आहोत असे त्यांना वाटावे अशी परमेश्वराचीच इच्छा होती. जेव्हा ते इस्राएलविरुध्द लढायला उभे राहतील. तेव्हा त्यांच्यावर दया न दाखवता संहार करता येईल. मोशेला परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे, यहोशवा त्यांचा धुव्वा उडवेल (अशीच ती योजना होती)
हब्रोन, दबीर, अनाब व यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा व नगरांचा संपूर्ण संहार केला.
इस्राएलाच्या देशात एकही अनाकी माणूस शिल्लक उरला नाही. गज्जा, गथ व अश्दोद येथे मात्र काही अनाकी लोक जिवंत राहीले.
परमेश्वराने मोशेला फार पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे यहोशवाने सर्व इस्राएल देश ताब्यात घेतला. परमेश्वराने कबूल केल्या प्रमाणे हा प्रदेश इस्राएल लोकांना दिला. यहोशवाने इस्राएलाच्या वंशांप्रमाणे त्यांची हिश्श्यांमध्ये वाटणी केली. अखेर युध्द संपले आणि शांतता नांदू लागली.

12

यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.
हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अधर्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती.
यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.
बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता
तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी व माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.
परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला हेता.
यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय.
डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:
यरीहोचा राजा बेथेल1 जवळील आयचा राजा1
यरुशलेमचा राजा1 हेब्रोनाचा राजा1
यर्मूथाचा राजा1 लाखीशाचा राजा1
एग्लोचा राजा1 गेजेराचा राजा1
दबीराचा राजा1 गेदेराचा राजा1
हर्माचा राजा1 अरादाचा राजा1
लिब्नाचा राजा1 अदुल्लामाचा राजा1
मक्के दाचा राजा1 बेथेलचा राजा1
तप्पूहाचा राजा1 हेफेराचा राजा1
अफेकाचा राजा1 लशारोनाचा राजा1
मादोनाचा राजा1 हासोराचा राजा1
शिम्रोन-मरोनाचा राजा1 अक्षाफाचा राजा1
तानखाचा राजा1 मगिद्दोचा राजा1
केदेशाचा राजा1 कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1
दोर पर्वतावरील दोराचा राजा1 गिलगाल येथील गोयीमचा राजा1
तिरसाचा राजा1 असे एकंदर राजा31

13

यहोशवा आता वृध्द झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आता वय झाले आहे पण अजून बराच प्रदेश काबीज करायचा राहिला आहे.
पलिष्टी आणि गशूरी यांचा प्रांत अजून घ्यायचा आहे.
मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.
कनानी भूमीच्या दक्षिणेकडील अव्वी लोकांनाही पराभूत करायचे आहे.
गिबली लोकही अजून राहिले आहेत. पूर्वेकडील. हर्मीन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथ येथे जायच्या ठिकाणापर्यंत सर्व लबानोन हा सुध्दा आहेच.
“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर.
आता, नऊ वंश आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्यात या देशाचे भाग कर.”
रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या उरलेल्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा जमिनीतील वाटा पूर्वीच मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडील भाग त्यांचा दिला.
आर्णीन खोऱ्या नजीकच्या अरोएर पासून त्यांचा प्रदेश सुरु होतो. तो खोऱ्याच्या मध्यावरील गावापर्यंत मेदबापासून दिबोनपर्यंतचे सलग पठार त्यात मोडते.
अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या आधिपत्याखाली असलेली सर्व गावे या प्रदेशात होती. हा राजा हेशबोनहून राज्य करत होता. अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सर्व नगरे
तसेच गिलादांचे नगर व गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता.
बाशानमध्ये राज्य करीत असलेल्या ओगची राजधानीही त्यात येत होती. पूर्वी तो अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करत असे ओग रेफाई लोकांपैकी होय. मोशेने पूर्वी या लोकांचा पराभव करून त्यांची भूमी काबीज केली होती.
तरी इस्राएल लोकांनी गशूरी माकाथी यांना घालवून दिले नाही. ते लोक आजही इस्राएल लोकांमध्ये राहात आहेत.
फक्त लेवी वंशाला तेवढा जमिनीत वाटा मिळालेला नाही त्याऐवजी, इस्राएलांच्या परमेश्वर देवाला अग्नीतून केलेली अन्नार्पणे त्यांना मिळतात. परमेश्वरानेच त्यांना तसे कबूल केले आहे.
रऊबेनी वंशाला त्यांच्यातील कुळाप्रमाणे मोशेने जमीन दिली. त्यांना मिळालेली जमीन अशी.
आर्णोन खोऱ्यानजीकच्या अरोएर पासून मेदबा नगरापर्यंत, खोऱ्यामधले नगर व पठारी प्रदेश यात येतो.
तसेच हेशबोनपर्यंतची जमीन व पठारावरील सर्व नगरे या मुलखात मोडतात. ही नगरे म्हणजे दीबोन, बामोथ-बाल बेथ-बालमोन,
याहस, कदेमोथ, मेफाथ,
किर्या-थईम, सिन्मा व खोऱ्यातील पहाडावरील सरेथ शहर,
बेथ-पौर, पिसगाची उतरणी आणि बेथ-यशिमोथ.
म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
बौराचा पुत्र बलाम यालाही इस्राएल लोकांनी पराभूत केले. (हा बलाम जादूटोणा करून भविष्य सांगत असे.) इस्राएल लोकांनी लढाईत पुष्कळ लोकांना ठार मारले.
रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे व त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.
गाद वंशालाही त्याच्या कुळांप्रमाणे मोशेने जमिनीत वाटा दिला तो असा:
2याजेर आणि गिलादातील सर्व शहरे राब्बा जवळच्या अरोएरापर्यंतचा अम्मोनी लोकांचा अर्धा प्रदेशही मोशेने त्याना दिला.
हेशबोनपासून रामाथ मिस्पापर्यंत व बतोनीम आणि महनाईमापासून दबीर पर्यंत.
बेथहाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा बाकीचा भाग. एवढा यार्देनच्या पूर्वेकडील खोऱ्याचा भाग त्यांचा होता. गालील सरोवराच्या टोकापर्यंत या जमिनीची हद्द होती.
गाद वंशातील सर्व कुळांना मोशेने वर वर्णन केलेली नगरे व गावे यांच्यासकटचा प्रदेश दिला.
मनश्शाच्या अध्या वंशाला मोशेने दिलेली जमीन अशी;
महनाईमापासून बाशानचा राजा ओग याच्या अधिपत्याखालील सर्व भूभाग, याईराची बाशानमधील सर्व नगरे (सगळी मिळून ती साठ होती.)
अर्धा गिलाद, अष्टारोथ व एद्रई (ओग राजाने या तिन्ही शहरात वास्तव्य केले होते.) मनश्शेचा मुलगा माखीर याच्या कुळाला ही जमीन मिळाली. म्हणजेच त्या अर्ध्या वंशाला ही जमीन मिळाली.
यार्देनच्या पलीकडे. यरीहोच्या पूर्वेला मवाबाच्या पठारावर या सर्वांचा तळ असताना मोशेने त्यांना हा प्रदेश दिला.
लेवींना मोशेने जमिनीत वाटा दिला नाही. खुद्द इस्राएलाचा देव परमेश्वर हेच त्यांचे इनाम, हा परमेश्वराचा शब्द होता.

14

एलाजार याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएलमधील सर्व वंशांचे प्रमुख यांनी जमिनीच्या वाटण्या कशा करायच्या ते ठरविले.
परमेश्वराने मोशेला याविषयी पूर्वीच आज्ञा दिली होती. तिला अनुसरुनच साडेनऊ वंशांच्या लोकांनी चिठ्ठ्या टाकून वाटे केले.
अडीच वंशातील लोकांना मोशेने आधीच यार्देन नदीच्या पूर्वेकडील जमीन दिली होती. पण लेवींना इतरांप्रमाणे जमिनीत वाटा नव्हता.
अशाप्रकारे बारा वंशातील लोकांना आपापल्या हिद्दद्दयाची जमीन मिळाली. योसेफच्या वंशाची विभागणी मनश्शे व एफ्राईम अशा दोन वंशात झाली होती. त्यांनाही प्रत्येकी काही जमीन मिळाली. परंतु लेवीच्या वंशातील लोकांना जमिनीत हिस्सा मिळाला नाही. त्यांना राहण्याकरता काही गावे दिली गेली. प्रत्येक वंशाच्या वाठ्याच्या जमिनीत वस्तीसाठी गावे आणि गुराढोरांसाठी गायराने असा हिस्सा त्यांना मिळाला.
परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली तसेच याबाबतीत इस्राएल लोकांनी केले.
एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यकुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते.
परमेश्वराचा सेवक मोशे याने देशाची टेहेळणी करायला मला पाठवले होते. मी तेव्हा चाळीस वर्षांचा होतो. मला त्या देशाविषयी काय वाटते ते मी परत आल्यावर मोशेला सांगितले.
माझ्याबरोबर आलेल्यांनी लोकांना असे काही सांगितले की लोक घाबरुन गेले. पण परमेश्वर आपल्याला हा देश देणार आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता.
तेव्हा मोशेने मला त्यादिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, “तू जेथे पाऊल ठेठलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुलेबाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन.’
“आता परमेश्वराने शब्द दिल्याप्रमाणे मलाही पंचेचाळीस वर्षें जिवंत ठेवले आहे. एवढचा कालावधीत आपण वाळवंटात भटकलो. आज मी पंच्याऐंशी वर्षांचा आहे.
पण मोशेने मला पूर्वी कामगिरीवर पाठवले तेव्हा इतकाच आजही मी धडधाकट आहे. लढण्याची माझ्यात ताकद आहे.
तेव्हा परमेश्वराने त्यावेळी कबूल केलेला डोंगराळ प्रदेश आता मला दे. मजबूत बांध्याचे अनाकी लोक तेथे राहतात, त्याची शहरे खूप मोठी असून चांगली सुरक्षित आहेत हे तू ऐकले आहेसच. पण परमेश्वराची साथ मला असेल तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आजही हुसकावून लावू शकेन.”
यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले.
आजही ते शहर कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब याच्या वंशजांचेच आहे. कारण त्याने इस्राएलच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली व त्याच्यावर विश्वास ठेवला.
पूर्वी या शहराचे नाव किर्याथ-आर्बा असे होते. आर्बा हा अनाकी लोकांमधीक सर्वात थोर पुरुष. त्याच्यावरून हे नाव पडले होते. नंतर या देशात शांतता नांदू लागली.

15

यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता.
दक्षिणेची सीमा क्षारसमुद्राच्या दक्षिणे कडील टोकाशी सुरु होत होती.
ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन ककर्ाकडे जाते.
तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.
यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द. यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते.
बेथ-हाग्लाच्या चढणीवरुन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत ती जाते.
तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो.
तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्चा दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे.
तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते.
मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते.
मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो.
भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले.
यकुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता)
शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले.
मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.)
कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभकरील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.
कनाज याचा मुलगा अथनिएल याने हे शहर घेतले. तेव्हा कालेबने त्याचा अखसाशी विवाह करुन दिला.
अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”
अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.
यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे; कबसेल, एदेर, यागूर,
कीना, दीमोना, अदादा,
केदेश, हासोर, इथनान,
जीफ, टेलेम, बालोथ,
हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन म्हणजेच हासोर.
अमाम, शमा, मोलादा,
हसर-गादा, हेष्मोन व बेथ-पेलेट,
हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा,
बाला, ईयीम, असेम,
एल्तोलाद, कसील व हर्मा,
सिकलाग, मदान्ना सन्सन्रा,
लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन. पश्चिमेकडील डोंगरपायथावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.
एष्टावोल, सरा, अषणा.
जानोह, एन-गन्रीम, तप्पूहा, एनाम,
यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका,
शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन.
शिवाय ही गावे सनान, हदाशा, मिग्दल गाद,
दिलान, मिस्पा, यकथेल,
लाखीश, बसकाथ, एग्लोन,
4कब्बोन, लहमाम, किथलीश,
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर.
लिब्ना, एथेर, आशान
इफताह, आष्णा, नसीब,
कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली.
आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
आणि डोंगराळ प्रदेशातील शामीर, यत्तीर, सोखो,
दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर)
अनाब, एष्टमो, अनीम,
गोशेन, होलोन व गिलो ही अकारा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली.
अराब, दूमा, एशान,
यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका,
हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली.
मावोन कर्मेल जीफ, यूटा,
इज्रेल, यकदाम, जानोह,
काइन, गिबा तिम्रा ही दहा नगरे व आसपासची गावे,
हल्हूल, बेथ-सूर, गदोर,
माराथ, बेथ-अनोथ, एलतकान ही सहा नगरे व त्या जवळची गावे ही सुध्दा मिळाली.
राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली.
त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा,
निबशान, क्षारनगर व एन-गेदी ही सहानगरे व त्यांच्या भोवतालची खेडी.
तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात.

16

योसेफच्या वंशजांच्या वाटचाची जमीन अशी: तिची हद्द यरीहो जवळ यार्देन नदी पासून सुरु होते व यरीहोच्या पूर्वेकडील जलाशयापर्यंत जाते. तेथून ती बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत चढत जाते.
मग ती बेथेल (लूज) पासून अकर्लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते.
मग ती पश्चिमेला वळून यफलेटी लोकांच्या सीमेजवळून लोअर बेथ-होरोन जवळ व तेथून गेजेर कडून भूमध्य समुद्राशी येऊन ठेपते.
योसेफची मुले : मनश्शे व एफ्राईम यांच्या वंशजांना मिळालेली जमीन अशी :
एफ्राईमचा वाटा; अप्पर-बेथ-होरोन जवळच्या अटारोथ अद्दार येथे पूर्वेकडील हद्द सूरु होते.
मिखथाथ जवळ पश्चिम हद्द सुरु होते. पूर्वेला ती तानथशिलोजवळ वळून तशीच पुढे पूर्वेकडे यानोहा येथपर्यंत जाते.
यानोहापासून अटारोथ व नारा येथपासून खाली येऊन यरीहोला पोचून यार्देन नदीशी थांबते.
तप्पूहापासून ही सीमा पश्चमेला काना ओढ्यापर्यंत जाते व समुद्राशी तिचा शेवट होतो. ही एफ्राईमच्या लोकांना दिलेली जमीन सर्व कुळांना त्यात वाटा मिळाला.
एफ्राईमाची हद्दीलगतची बरीचशी गावे तशी मनश्शेच्या हद्दीतील होती. पण एफ्राईम लोकांना ती मिळाली.
तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.

17

मनश्शेच्या वंशजांनाही जमिनीत वाटा मिळाला. मनश्शे हा योसेफचा मोठा मुलगा. आणि गिलादचा पुढारी माखीर म्हणजे मनश्शेचा मोठा मुलगा. माखीर हा मोठा लढवय्या होता. तेव्हा गिलाद आणि बाशान हे प्रदेश माखीर कुटुंबाला मिळाले.
मनश्शेच्या वंशातील इतर कुळांनाही जमिनीत वाटा मिळाला. अबीयेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.
सलाफहाद हा हेफेरचा पुत्र; आणि हेफेर गिलादचा, गिलाद माखीरचा पुत्र आणि माखीर मनश्शे याचा. सलाफहादला मुलगा नव्हता त्याला पाचही मुलीच होत्या. महला, नोआ, हाग्ला, मिल्का व तिरसा ही त्यांची नावे.
या मुली एलाजार हा याजक व नूनाचा पुत्र यहोशवा तसेच पंच यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाल्या, “आम्हाला आमच्या पुरुष नातेवाइकांइतकाच वाटा द्यायला परमेश्वराने मोशेला सांगितले होते.” तेव्हा एलाजारने परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्यांनाही जमिनीत हिस्सा दिला. त्यांच्या वडीलांच्या भावांना मिळाला असता तसाच हिस्सा या मुलींना मिळाला.
अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच.
मनश्शेच्या मुलींना मुलांप्रमाणेच वाटा मिळाला. मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
मनश्शेच्या जमिनी आशेरपासून मिखमथाथपर्यंत पसरलेल्या होत्या. हा भूभाग शखेम जवळचा. त्या सीमा दक्षिणेला एनʊतप्पूहा भागापर्यंत गेलेली होती.
तप्पूहा भोवतालची जमीन मनश्शेची होती, पण खुद्द तप्पूहा गाव त्याच्या अखत्यारीत नव्हते. ते मनश्शेच्या जमिनीच्या सीमेवर असून एफ्राईमाच्या वंशजाचे होते.
मनश्शेची हद्द तशीच पुढे दक्षिणेला काना नदीपर्यंत जात होती. हा भाग मनश्शेच्या वंशजांचा असला तरी नगरे एफ्राईमाच्या वंशजांच्या ताब्यात होती. नदीच्या उत्तरेला मनश्शेच्या जमिनीची हद्द असून ती पश्चिमेला भूमध्य समुद्रापर्यंत जात होती.
दक्षिणेकडील जमीन एफ्राईमची व उत्तरेकडूल मनश्शेची होती. भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेकडील मनश्शेची होती भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेला आशेरच्या जमीनीला आणि पूर्वेला इस्साखारच्या जमीनीला भिडलेली होती.
आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे व त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते.
मनश्शेच वंशज या शहराचा पाडाव करु शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक बाहेर न पडता तेथेच राहिले.
पण इस्राएल लोकाचे सामर्ध्य वाढले. तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपल्या कामाला जुंपले. असे असले तरी त्यांना इस्राएल लोकांनी घालवून दिले नाही.
योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, “तू आम्हाला जमिनीत एकच वाटा दिलेला आहेस पण आमची संख्या बरीच जास्त आहे. परमेश्वराने आम्हाला एवढी सगळी जमीन दिलेली असताना तू आम्हाला एकच हिस्सा का दिलास?”
यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”
योसेफचे वंशज म्हणाले, “एफ्राईसचा डोंगराळ प्रदेश फारसा मोठा नाही हे खरेच. पण तेथील कनानी लोकांकडे सामर्थ्यवान आयुधे आहेत, लोखंडी रथ आहेत. इज्रेलचे खोरे, बेथ-शान आणि आसपासची गावे यांवर त्यांची हुकमत आहे.”
तेव्हा योसेफ योसेफ पुत्र एफ्राईम व मनश्शे यांना यहोशवा म्हणाला, “पण तुम्ही तर संख्येने केवढेतरी आहात आणि तुमचे सामर्ध्यही मोठे आहे. तेव्हा तुम्हाला एका हिश्श्यापेक्षा जास्त भाग मिळायालाच हवा.
तुम्ही तो डोंगराळ प्रदेश काबीज करा. ते जंगलच आहे पण झाडे तोडून तुम्ही राहायला चांगली सपाट जागा करून ध्या. तो प्रदेश तुमच्या मालकीचा होईल. कनानी लोकांना तुम्ही तेथून घालवून द्याल. ते लोक दणकट असले आणि सशस्त्र सज्ज असले तरी तुम्ही त्यांना पराभूत कराल.”

18

सर्व इस्राएल लोक शिला येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते.
देवाने वचन दिल्या प्रमाणे इस्राएल वंशजातील सात कुळांना जमिनीचा हिस्सा अजून मिळाला नव्हता.
तेव्हा यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपली जमीन ताब्यात घ्यायला कोठवर थांबणार? तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने ती तुमच्या हवाली केली आहे.
आता प्रत्येक वंशातून तीन तीन जणांची निवड करा. त्यांना मी जमिनीची पाहणी करायला पाठवतो. त्यावरुन ते त्या जमिनीचे वर्णन काढतील व माझ्याकडे परत येतील.
त्यांनी जमीनीचे सात वाटे करावेत. दक्षिणे कडील भाग यहूदाच्या लोकांकडे आहे. तो तसाच राहील. आणि उत्तरकडील जमीन योसेफच्या लोकांकडे आहे ती तशीच राहील.
पण तुम्ही फक्त जमिनीचे वर्णन लिहून आणा आणि सात भाग पाडून माझ्याकडे या. कोणी कुठला वाटा घ्यायचा ते आपल्या परमेश्वर देवाच्या म्हणण्यानुसार ठरेल
लेवींना जमिनीत वाटा नाही. याजक म्हणून परमेशवराची सेवा करणे हाच त्यांचा वाटा. गादी, रऊबेनी आणि मनश्शाच्या अर्धा वंशातील लोक यांना त्यांचा वाटा मिळालेला आहेच. यार्देनच्या पूर्वेकडील भाग परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यापूर्वीच दिलेला आहे.”
तेव्हा या कामासाठी निवडलेली मंडळी जमिनीच्या पाहणीसाठी बाहेर पडली. त्या प्रदेशाचे वर्णन लिहून काढले व तो यहोशवाकडे परत आणण्यासाठी ती निघाली. यहोशवा त्या लोकांना म्हणाला, “जमिनीचे नीट निरीक्षण करुन त्यांचे वर्णन तयार करा. मग ते घेऊन शिलो येथे मला येऊन भेटा. तेथे मी चिठ्ठ्या टाकीन. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जमिनीचे वाटप होईल.”
तेव्हा हे लोक तिकडे गेले. त्यांनी नीट पाहणी करून यहोशवासाठी तिचे वर्णन लिहून काढले. प्रत्येक नगराचा अभ्यास करुन त्यांनी त्या प्रदेशाच्या सात वाटण्या केल्या. वर्णन घेऊन मग ते शिलो येथे यहोशवाला भेटायला आले.
यहोशवाने शिलोला परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकल्या. अशा प्रकारे जमिनीची विभागणी होऊन प्रत्येक वंशाला जमिनीत आपापला वाटा मिळाला.
यहूदा आणि योसेफ यांच्या मधला जमिनीचा हिस्सा बऱ्यामीनच्या वंशाला मिळाला. त्याच्या वंशातील प्रत्येक कुळाचा त्यात हिस्सा होता. त्यांना मिळालेली जमीन अशी.
तिची उत्तरेकडील हद्द यार्देन नदीशी सुरु होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने जाते. मग ती पश्चिमेला डोंगराळ प्रदेशात जाऊन बेथ-आवेनच्या पूर्वेला भिडते.
तेथून ती दक्षिणेला लूज (म्हणजेच बेथेल) कडे वळते व खाली अटारोथ अद्दार येथवर जाते. अटारोथ-अद्दार हे बेथ- होरोनच्या दक्षिणेकडील टेकडीवर आहे.
तेथे ही हद्द दक्षिणेला वळून टेकडीच्या पश्चिम बाजूने जाते. किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) येथे तिचा शेवट होतो. हे यहूदाच्या वंशजांचे नगर ही झाली पश्िचम बाजू.
दक्षिणेकडील हद्द किर्याथ-यारीम येथ सुरु होऊन नफ्तोह नदीपर्यंत जाते.
रेफाई खोऱ्याच्या उत्तरेकडील बेन हिन्नोमच्या खोऱ्यानजीकच्या डोंगर पायथ्याकडे ती उतरत जाते. तेथून यबूसी नगराच्या दक्षिणेला हिन्नोाम खोऱ्यात उतरुन एन-रोगेल कडे जाते.
तेथे उत्तरेला वळून एन-शेमेश कडे जाते. तशीच ती गलीलोथ पर्यंत जाते. (गलीलोथ हे पर्वतांमधल्या अदुम्मीम खिंडीजवळ आहे) रऊबेवाचा पुत्र बोहन याचे नाव दिलेल्या मोठचा थोरल्या खडकाकडे ही सीमा उतरते.
बेथ-अराबाच्या उत्तरेकडील प्रदेशात जाऊन मग ती अराबात खाली उतरते.
बेथ-हाग्लाच्या उत्तरेला जाऊन क्षार समुद्राच्या उत्तर किनाऱ्याशी तिचा शेवट होतो. येथे यार्देन नदी समुद्राला मिळते. ही झाली दक्षिण हद्द.
यार्देन नदी ही पूर्वेकडील हद्द. बन्यामिनाचा वंशजांना मिळाला तो भाग हा. आता सांगितली ती तिची सीमारेषा.
प्रत्येक कुटुंबाला जमीन मिळाली. त्यांची नगरे म्हणजे यरीहो, बेथ होग्ला, एमेक-केसास,
बेथ अराबा, समाराईम व बेथेल,
अव्वीम, पारा, आफ्रा,
कफर-अम्मोनी, अफनी, गेबा ही बारा नगरे व आसपासची गावे.
गिबोन, रामा, बैरोथ.
मिस्पा, कफीरा, मोजा
रेकेम, इपैल, तरला,
सेला, ऐलेक, यबूसी (म्हणजेच यरूशलेम गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.

19

नंतर शिमोन वंशजांच्या सर्व कुळांतील लोकांना यहोशवाने जमिनीतील हिस्सा दिला. यहूदाच्या वाटणीची जमिनी मध्येच यांचाही वाटा होता.
तयांना मिळालेला भाग असा; बैरशेबा (म्हणजेच शेबा), मोलादा,
हसर-शुवाल, बाला, असेम,
एलतोलद, बधूल, हर्मा,
सिकलाग, बेथ-मकर्बोथ, हसर-सुसा
बेथ-लबवोथ, शारुहेन ही तेरा नगरे व आसपासचा भाग.
अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली.
तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली.
शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती.
ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली.
तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ व पुढे याफीय येथपर्यंत गेली.
त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली.
नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्राथोनपर्यंत गेली व तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला.
कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे व आसपासची खेडी होती.
जबुलूनच्या वाटणीची शहरे व भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.
चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला.
त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम,
हफराईम, शियोन, अनाहराथ
रब्बीथ, किशोन, अबेस,
रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा आणि बेथ-पसेस.
त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळन सोळा नगरे व त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता.
इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.
पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते.
त्यांना मिळालेली जमीन ही; हेलकथ, हली, बटेन, अक्षाफ
अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन
पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली.
पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली.
मग दक्षिणेला रामा व तिथून सोर नामक भक्क म तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला. नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात.
हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.
सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.
त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब व यबनेल यांच्यामधून लक्क म वरुन यार्देन नदीला भिडते.
मग पश्चिमेला अजरोथ ताबोर यांच्यातून हुक्कोकशी थांबते. दक्षिणेची हद्द जबुलूनला लागून आहे आणि पच्श्रिम हद्द आशेरला. पूर्वेला ही सीमा यार्देन नदीपासच्या यहुदापर्यंत आहे.
या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
अदामा, राम, हासोर,
केदेश, एद्रई, एन-हासोर.
हरोन. मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेस. ही शहरे व त्याच्या आसपासचा भाग मिळून ही एकोणीस नगरे झाली.
नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.
सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला.
त्यांना मिळालेला
शालब्बीन, अयालोन, इथला,
एलोन, तिम्ना, एक्रोन,
एलतके गिब्बथोन, बालाथ,
यहूद, बने-बराक, गथ रिम्मोन,
मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.
आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले,
ही सर्व शहरे व भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.
अशाप्रकारे जमिनीची विभागणी आणि सर्व वंशांच्या लोकांना करायच्या वाटण्या हे काम प्रमुखांनी पार पाडले. ते झाल्यावर नूनीचा पुत्र यहोशवाला ही काही जमीन द्यायचे इस्राएलाच्या लोकांनी ठरवले. तशी परमेश्वराची आज्ञा होती.
त्याला ही जमीन मिळावी अशी परमेश्वराने आज्ञा दिली होती. तेव्हा त्यानी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्राथ-सेरह हे नगर यहोशवाला दिले. यहोशवाने ते नगर मागितले होते. तेव्हा ते नगर आणखी बळकट करुन तो तेथे राहू लागला.
अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्धारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.

20

मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
इस्राएल लोकांना सांग “मोशे मार्फत मी माझी आज्ञा तुमच्यापर्यंत पोचवली. मोशेने तुम्हाला सुरक्षिततेसाठी खास नगरे उभारायला सांगितले.
एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, व त्याचा खुनाचा उद्देश नसेल तर तो माणूस या नगरात आश्रयाला जाऊ शकतो.
“त्याने असे करावे. पळून जाऊन अशा नगराशी पोचल्यावर वेशीपाशी थांबावे. तेथे गावातील वडीलधाऱ्यांना झालेली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आत येऊ द्यावे. त्याला आपल्यात राहण्यासाठी जागा द्यावी
पण त्याचा पाठलाग करत येणारा माणूसही तेथे येऊन पोचेल तर तेव्हा या वडीलधाऱ्यांनी त्याला थोपवून धरावे. आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देऊ नये. त्यांनी त्याला संरक्षण द्यावे. कारण ज्याला मृत्यू आला त्याला या व्यक्तीने जाणून बुजून मारलेले नाही. ती चुकून योगायोगाने घडलेली गोष्ट होती. रागाच्या भरात. मारायचे ठरवून त्याने काही केले नाही. त्यावेळी ते चुकून झाले, इतकेच.
न्यायनिवाडा होईपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. किंवा तेथील मुख्य याजक हयात असेपर्यंत राहावे. नंतर जेथून आला त्या आपल्या स्वत;च्या नगरात, आपल्या घरी त्याने परत जावे.”
तेव्हा “आश्रयस्थाने” म्हणून इस्राएल लोकांनी काही नगरांची निवड केली. ती नगरे अशी; नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील, गालील मधले केदेश, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा (म्हणजेच हेब्रोन)
यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.
इस्राएल लोक किंवा त्यांच्यात राहणारे परकीय यांच्यापैकी कोणाच्याही हातून चुकून मनुष्यवध झाल्यास त्याने पळून जाऊन आश्रय घ्यावा म्हणून ही नगरे नेमली. म्हणजे त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल व तिचा पाठलाग करणाऱ्याच्या हातून ती व्यक्ती मारली जाणार नाही. मग त्या नगरातील न्यायसभेने निवाडा करावा.

21

मग लेवी घराण्याचे प्रमुख हे एलाजार याजक नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वेगवेगळ्या वंशाचे प्रमुख यांच्याशी बोलायला आले.
ही भेट कनान देशातील शिलो येथे झाली. लेवी प्रमुख त्यांना म्हणाले, “आम्हाला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या गुराढोरांना चरण्यासाठी कुरणे द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली आहे.”
तेव्हा इस्राएल लोकांनी ही परमेश्वराची आज्ञा पाळली. त्यांनी पुढील नगरे आणि गायराने लेवींना दिली.
कहाथी हे लेवी वंशातील एक कूळ, त्याच्यातील अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा शिमोन आणि बन्यामीन यांच्या वाटणीच्या प्रदेशातील तेरा नगरे मिळाली.
एफ्राईम, दान आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्या मालकीच्या प्रदेशातील दहा नगरे उरलेल्या कहाथी कुळांना मिळाली.
इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशानमधील मनश्शेचा अर्धा वंश यांच्या भूभागातून गेर्षोनच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
मरारीच्या वंशजांना रऊबेन गाद आणि जबुलून यांच्या वाटच्या प्रांतांतून बारा नगरे मिळाली.
परमेश्वराने मोशेला दिलेली आज्ञा इस्राएल लोकांनी पाळली व लेवी लोकांना पुढील नगरे व त्याभोवतालची शिवारे दिली.
यहूदा आणि शिमोनच्या वाटच्या प्रदेशातील नगरे दिली त्यांची नावे पुढे दिली आहेत.
चिठ्ठ्या टाकल्या त्यात पहिली चिठ्ठी कहाथी कुळातील लेवींची निघाल्यामूळे ही नगरे त्यांची.
किर्याथ-आर्बा त्यांना मिळाले (म्हणजेच हेब्रोन. अनाकचा पिता आर्बा याचे नाव या नगराला मिळाले होते.) त्याच्या आसपासची थोडी जमीनही गायरान म्हणून त्यांना मिळाली.
पण किर्याथ-आर्बांच्या भोवतालची शेते व खेडी यफुन्रेचा पुत्र कालेब याची होती.
तेव्हा त्यांनी हेब्रोन नगर अहरोनच्या वंशजांना दिले. (हेब्रोन हे आश्रयाचे नगर होते.) त्याखेरीज लिब्ना
यतीर, एष्टमोवा,
होलोन, दबीर,
अईन, युट्टा, आणि बेथ-शेमेश ही नगरे व गुरांसाठी शिवारे दिली. अशाप्रकारे ही नगरे त्या दोन वंशांना दिली.
बन्यामीनच्या प्रदेशातील नगरे अहरोनच्या वंशजांना मिळाली. ती म्हणजे, गिबोन, गेबा,
अनाथोथ, अलमोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.
अहरोनच्या वंशातील याजकांना त्यांनी ही तेरा नगरे व शिवारे दिली.
एफ्राईमच्या वाटच्या जमिनीतील नगरे कहाथी वंशातील उर्वरित लोकांना मिळाली. ती अशी :
एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम हे आश्रयाचे नगर, गेजेर,
किबसाईम व बेथ-होरोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.
दानच्या हिश्श्यातून एल एतके. गिब्बथोन,
अयालोन, गथ-रिम्मोन ही चार गावे व गुरांसाठी शिवार दिले.
मनश्शाच्या अर्ध्या वंशाच्या मालकीच्या प्रदेशातून तानख व गथ-रिम्मोन ही दोन नगरे व शिवारे दिली.
कहाथी वंशाला अशी एकंदर दहा नगरे व आसपासची गायराने मिळाली.
लेवी वंशातील गेर्षोन कुळाला ही काही नगरे मिळाली. ती अशी: मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्यांना बाशान मधील गोलान दिले (गोलान हे आश्रयस्थान होते.) बैश्तरा देखील दिले. म्हणजेच एकंदर दोन नगरे व शिवार दिली.
इस्साखारच्या वंशजांनी किश्शोन, दाबरथ
यर्मूथ, एलगन्रीम चार नगरे भोवतालची शिवारे दिली.
आशेरच्या वंशाजांनी मिशाल, अब्दोन,
हेलाकाथ, रहोब, ही चार नगरे गुरांसाठी भोवतालचे थोडे गायरान दिले.
नफतालीच्या कुळातील लोकांनी गालील मधले केदेश दिले. (केदेश हे आश्रयाचे नगर) नफतालींनी हम्मोथ दोर आणि कर्तान ही ही दिली. म्हणजे एकंदर तीन नगरे व गुरांना चरण्यासाठी भोवतालची शिवारे दिली.
गेर्षोन वंशजांना अशी एकंदर तेरा नगरे व गायराने मिळाली.
मरारी हे लेवी वंशातील एक कूळ, त्यांना मिळालेली नगरे अशी; जबुलूनच्या वंशजांनी यकनाम, कर्ता
दिम्ना नहलाल ही चार नगरे व शिवार दिली.
रऊबेनींनी बेसेर, याहस
कदेमोथ, मेफाथ ही चार नगरे व गायराने दिली.
गाद वंशातील लोकांनी गिलादमधील रामोथ (हे आश्रयाचे नगर) दिले. शिवाय महनाईम,
हेशबोन, याजेर अशी एकंदर चार नगरे व शिवारे दिली.
अशाप्रकारे मरारी या लेवी वंशातील शेवटच्या कुळाला बारा नगरे मिळाली.
म्हणजे लेवी वंशाजांना सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व गुरांना चारायला शिवारे मिळाली. इस्राएल लोकांमधील इतर सर्व वंशांच्या लोकांच्या मालकीतील ही शहरे आणि जमीन होती.
प्रत्येक गावाला गायरान होते. सर्वच नगराच्या बाबतीत हे खरे होते.
अशाप्रकारे इस्राएल लोकांना दिलेला शब्द परमेश्वराने खरा केला. कबूल केल्याप्रमाणे सर्व जमीन त्याने लोकांना दिली. लोकांनी ती ताब्यात घेतली व ते तेथे राहू लागले.
तसेच परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना शब्द दिल्याप्रमाणे, सगळीकडे सर्वत्र शांतता नांदू लागली. यांना कोणताही शत्रू नामोहरण करु शकला नाही. उलट परमेश्वराच्या करणीने शत्रूच इस्राएल लोकांच्या हाती आला.
अशाप्रकारे परमेश्वराने दिलेले प्रत्येक वचन पुरे झाले. काहीही पुरे व्हावयाचे शिल्लक राहिले नाही. प्रत्येक शब्द प्रत्यक्षात आला.

22

यहोशवाने मग रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोक यांना एकत्र बोलवले.
त्यांना तो म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हाला जे जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वागलात. माझ्याही सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात.
आजपर्यंत तुम्ही आपल्या इस्राएल बांधवांनाही पाठिंबा दिलात. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काटेकोरपणे पाळल्या आहेत.
सर्व कठीण प्रसंगातून शांतता देण्याचे तुमच्या परमेश्वर देवाने इस्राएल लोकांना वचन दिले होते. आणि परमेश्वराने आपला शब्द खरा केला आहे. तेव्हा आता तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेश परमेश्वराचा सेवक मोशेने तुम्हाला दिला आहे. तेथे तुम्ही आता जाऊ शकता.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोशेचे नियम पाळत चला. परमेश्वर देवावर प्रेम करा आणि त्याच्या आज्ञा पाळा. परमेश्वराच्या मार्गाने जा आणि मनोभावे त्याची सेवा करा.”
एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. ते आपल्या घरी परतले
बाशानची भूमी मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिली होती. उरलेल्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यार्देनच्या पश्चिमेकडील काही जमीन यहोशवाने दिली. त्यांना आशीर्वाद देऊन यहोशवाने निरोप दिला.
तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”
तेव्हा रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी इस्राएल लोकांचा निरोप घेऊन प्रस्थान केले. ते कनान देशातील शिलो येथे होते. तेथून निघून ते गिलाद कडे गेले. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जो प्रांत त्यांना द्यायला सांगितला होता तेथे म्हणजेच आपल्या वतनाकडे ते परत गेले.
रऊबेन, गाद आणि मनश्शे या वंशातील लोक गालीलोथ ठिकाणी आले. कनान देशातील यार्देन नदीच्या जवळ हे आहे. या ठिकाणी त्यांनी एक मोठी वेदी बांधली.
या तीन वंशांच्या लोकांनी ही वेदी बांधल्याची बातमी शिलो येथे असलेल्या इतर इस्राएल लोकांनी ऐकली. कनान देशाच्या सीमेजवळ गलिलोथ येथे ही वेदी बांधल्याचे त्यांच्या कानावर आले. इस्राएलांच्या भागात यार्देन नदी जवळ हे ठिकाण होते.
या बातमीने क्रुध्द होऊन सर्व इस्राएल लोकांनी एक होऊन या तीन वंशांच्या लोकांवर चढाई करण्याचे ठरवले.
इस्राएल लोकांनी रऊबेन, गाद व मनश्शे यांच्या वंशजांशी बोलणी करण्यास काही जणांना पाठवले. एलाजार याजकाचा मुलगा फिनहास हा त्यांचा प्रमुख होता.
त्याखेरीज, शिलो येथे असलेल्या इस्राएलांच्या प्रत्येक कुळातून एक अशा दहा जणांनाही पाठवले. हे दहाजण आपापल्या कुळाचे प्रमुख होते.
अशी अकरा माणसे गिलाद येथे गेली. रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांच्याशी बोलणी करताना ते म्हणाले,
“सर्व इस्राएल लोकांची विचारणा आहे की. परमेश्वराविरुद्ध असलेली ही गोष्ट तुम्ही का कलीत? तुम्ही हे बंड का केलेत? परमेश्वराच्या शिकवणी विरूध्द ही वेदी तुम्ही का बांधलीत?
पौराला काय झाले ते आठवते ना? त्या पापाचे फळ आपण अजून भोगत आहोत. त्या भंयकर पापाची शिक्षा म्हणू आपल्यावर आजारपण ओढवले. त्यातून आपण अजूनही पूर्णत: बरे झालो नाही.
आणि तरी तुम्ही तेच करतात! हे परमेश्वराविरुद्ध बंड आहे. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोहून देणार आहात काय? तुम्ही हे थांबवले नाहीत तर सर्व इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप होईल.
“परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.
“जेरहाचा मुलगा आखान आठवतो का? त्याने, नष्ट करुन टाकायच्या वस्तू विषयीची आज्ञा पाळायचे नाकारले. देवाची आज्ञा त्याने एकठचाने मोडली पण शिक्षा मात्र सर्व इस्राएल लोकांना झाली. आखान, त्याच्या पापामुळे मेला पण आणखीही बरीच माणसे मरण पावली.”
तेव्हा रऊबेन गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी या अकरा जणांना उत्तर दिले. ते म्हणाले,
“परमेश्वर हाच आमचा देव आहे. परमेश्वर हाच आमचा समर्य परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून ध्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका.
आम्ही देवाचा नियम मोडला असेल तर परमेश्वरानेच आम्हाला शिक्षा करावी.
आम्ही ही वेदी होमार्पण धान्यार्पणा किंवा शांति-अर्पण करण्यासाठी बांधली असे तुम्हाला वाटते का? नाही, आम्ही ती त्यासाठी बांधली नाही. मग का बांधली बरे? उद्या कदाचित् तुमचे वंशज आम्हाला आपल्यापैकीच एक म्हणून ओळखणार नाहीत अशी आम्हाला भीती वाटली. तुम्ही कोण इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवाची आराधना करणारे? असे कदाचित् ते विचारतील.
देवाने आम्हाला यार्देनच्या पलीकडच्या तीरावरची जमीन दिली आहे. नदीमुळे आपण वेगळे पडलो आहोत. उद्या तुमची मुले मोठी होऊन तुमच्या प्रदेशावर सत्ता गाजवू लागली की, आम्हीही तुमच्यापैकीच आहोत हे ती विसरतील मग ते म्हणतील, “हे रऊबेन आणि गाद इस्राएलांपैकी नव्हेत’ आणि तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराची आराधना करायला प्रतिबंध करतील.
“म्हणून ही वेदी बांधायचे ठरवले. पण यज्ञार्पणे किंवा होमार्पणे करण्याच्या हेतूने ती बांधली नाही.
तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे हे दाखवणे हा वेदी बांधण्यामागचा उद्देश होता. तुम्हा आम्हाला व पुढच्या पिढ्यांना ही वेदी साक्ष राहील की हा आपला परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराला यज्ञार्पणे, अन्रार्पणे, शांतिअर्पणे करु. तुमच्याप्रमाणेच आम्हीही इस्राएल लोकांपैकी आहोत हे तुमच्या वंशजांना कळावे अशी आमची इच्छा आहे.
आम्ही इस्राएल नाही असे उद्या तुमची मुले म्हणाली तर आमची मुले म्हणतील, “ही पाहा आमच्या वाडवडिलांनी बांधलेली वेदी. ही वेदी तंतोतंत परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानामधील वेदीसारखीच आहे. ही आम्ही यज्ञासाठी वापरत नाही. आम्ही ही इस्राएलचाच एक भाग आहोत याची ही साक्ष आहे.’
“परमेश्वराविरुद्ध बंड करावे असे खरोखरच आम्हाला वाटत नाही. त्याच्या मार्गाने जायचे आम्ही थांबवणार नाही. परमेश्वराच्या निवासस्थानासमोरची वेदी हीच खरी हे आम्हाला माहीत आहे. तीच परमेश्वर देवाची आहे.”
रऊबेनी, गादी आणि मनश्शेचे लोक काय म्हणाले ते फिनहास याजक व त्याच्या बरोबर आलेले इतर प्रमुख यांनी ऐकले. त्यांना ते पटले. या लोकांचे म्हणणे खरे आहे असे त्यांचे समाधान झाले.
तेव्हा फिनहास याजक त्यांना म्हणाला, “परमेश्वराची आपल्याला साथ आहे हे आता आपण जाणतो. तुम्ही त्याच्याविरुध्द बंड केले नाही हे आम्हाला कळले. आता परमेश्वर इस्राएल लोकांना शिक्षा करणार नाही, म्हणून आम्हाला आनंद वाटतो.”
मग फिनहास आणि सर्व प्रमुख आपल्या घरी परतले. रऊबेनी आणि गादी यांना गिलाद मध्ये सोडून कनान येथे आले. त्यांनी इस्राएल लोकांना सर्व हकीकत सांगितली.
इस्राएल लोकांचेही त्याने समाधान झाले. आनंद वाटून त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. रऊबेनी, गादी आणि मनश्शे या लोकांविरुद्ध चढाई न करण्याचे त्यांनी ठरवले. ते लोक जेथे राहात होते तो प्रदेश नष्ट न करण्याचे त्यानी ठरवले.
रऊबेनी आणि गादी यांनी या वेदीला नाव दिले, ते असे, “परमेश्वर हाच देव आहे असा आमचा विश्वास आहे ह्याची ही साक्ष.”

23

परमेश्वराने इस्राएल लोकांना भोवतालच्या शत्रूंपासून विसावा दिला. त्यांना सुरक्षित केले. अशी अनेक वर्षे लोटली, आता यहोशवा बराच वृध्द झाला होता.
तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो.
परमेश्वराने आपल्या शत्रूंची काय परिस्थिती करुन टाकली ते तुम्ही पाहीले. आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्याने ते केले. तुमचा परमेश्वर देव तुमच्यासाठी लढला.
यार्देन नदी आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र यांच्या मधली जमीन तुम्ही काबीज करू शकता हे मी तुम्हाला सांगितल्याचे तुमच्या लक्षात असेलच. ती भूमी तुम्हाला द्यायचे मी वचन दिले आहे, पण अजून तुम्ही ती ताब्यात घेतली नाही.
तेथील रहिवाश्यांना तुमचा परमेश्वर देव घालवून देईल. तुम्ही ती आपल्या ताब्यात घ्याल. तेथील. लोकांना परमेश्वर हुसकावून लावील. तुमच्यासाठी त्याने हे करायचे कबूल केले आहे.
“परमेश्वराने दिलेल्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. मोशेच्या नियमशास्त्रान जे जे लिहिले आहे त्या सर्वांचे पालन करा. त्याच्याकडे पाठ फिरवू नका.
इस्राएल नसले लीही काही माणसे अजून आपल्यात आहेत. ती त्यांच्या दैवतांची पूजा करतात. अशा लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्या दैवतांची सेवा किंवा पूजा करु नका.
आपल्या परमेश्वर देवाचीच उपासना करा. पूर्वी तुम्ही हे केले आहे व पुढेही करत राहा.
“परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करायला मदत केली आहे. त्याने त्या लोकांना बाहेर पडायला भाग पाडले. कोणीही तुम्हाला आतापर्यंत पराभूत करु शकले नाही.
परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे.
तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वरावरच प्रेम करत राहा.
“आपल्या परमेश्वराच्या उपासनेत खंड पडू देऊ नका. इस्राएली, खेरीज इतर लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्याशी लग्न संबंध ठेवू नका. पण या लोकांशी मैत्री ठेवलीत तर
शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.
“माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले.
परमेश्वर देवाने आपल्याला जी काही चांगली वचने दिली ती सर्व प्रत्यक्षात आली. पण तसेच त्याचे दुसरे वचनही प्रत्यक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपण चुकीने वागलो तर आपल्यावर संकटे ओढवतील असाही त्याने शब्द दिला आहे. त्याने दिलेली ही चांगली सुपीक जमीन सोडून आपल्याला जावे लागेल असेही त्याने शपथपूर्वक उच्चारले आहे.
तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाशी केलेल्या कराराचा भंग केलात तर असे घडेल. इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुम्ही या जमीनीला मुकाल. तेव्हा त्या इतर दैवतांची चुकूनसुध्दा पूजा करु नका. तसे केलेत तर आपल्या परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल. आणि मग त्याने दिलेल्या या चांगल्या प्रदेशातून तो तुमची हकालपट्टी करेल.”

24

यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.
मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.
पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला.
मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.
मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. त्यांच्यामार्फत मला माझ्या लोकांना मिसरमधून बाहेर काढायचे होते. त्यासाठी मी मिसरमधील लोकांना भयंकर त्रासदायक गोष्टींनी पिडले. आणि तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले.
अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला.
तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला. म्हणून मी मिसरमधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले. समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले. मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्व्यांनी पाहिलीच आहे. त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढलेत.
मग मी तुम्हाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील अमोरी लोकांच्या प्रदेशात आणले. त्यांनी तुमच्याशी युध्द केले पण मी तुमच्यामार्फत त्यांचा पराभव केला. त्यांचा संहार करायचे सामर्ध्य मी तुम्हाला दिले. मग तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले.
पण मी परमेश्वराने, बलामाचे म्हणणे ऐकायचे नाकारले. तेव्हा बलामाने तुम्हाला आशीर्वादच दिला. आणि मी तुमचे रक्षण करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले.
मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामूळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात.
तुमचे सैन्य चाल करून गेल्यावर मी त्याच्यापुढे गांधील माश्शा पाठवल्या. त्यांनी हैराण होऊन ते लोक चालते झाले. तेव्हा तलवार किंवा धनुष्य न वापरताच तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
मी परमेश्वराने, तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत-ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहात आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत.”
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.
“पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”
मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही.
आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले.
“तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे.”
त्यावर यहोशवा म्हणाला, “हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही.
तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील.”
तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.”
यहोशवा त्यांना म्हणाला, “एकदा प्रत्येकाने स्वत: कडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?” लोक उत्तरले, “होय नि;संशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे.”
तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”
लोक यहोशवाला म्हणाले, “आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू.”
मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले.
त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या करारची साक्ष होय.
मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, “आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील.”
एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.
यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते.
तिम्नाथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.
यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.
इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.
अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.

Lizenz
CC-0
Link zur Lizenz

Zitationsvorschlag für diese Edition
TextGrid Repository (2025). Christos Christodoulopoulos. Joshua (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A7D9-7